देशात एकही रेल्वे धावणार नाही, रेल्वे सेवा आज मध्यरात्रीपासून बंद

रविवार, 22 मार्च 2020 (15:01 IST)
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं आतापर्यंतचा सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून देशात एकही रेल्वे धावणार नाही. देशातील अन्यधान्य आणि इतर वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मालवाहतूक मात्र सुरू राहणार आहे.
 
31 मार्चपर्यंत देशातील प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबईतील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत 31 मार्चपर्यंत एकही लोकल धावणार नाही. 
 
रेल्वे प्रवाशांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आल्याने हा निणर्य घेण्यात आला आहे. सर्व लॉकडाऊन होत असल्यामुळे महानगरांमधून गावी जाणाऱ्या लोकांनी रेल्वेमध्ये मोठी गर्दी केली आहे. 
 
रेल्वे मंत्रालयानं काढलेल्या पत्रकानुसार, करोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या मेल/एक्स्प्रेस, इंटरसिटी ट्रेन्स आणि सर्व पॅसेंजर ट्रेन्स 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती