'मुंबई सेंट्रल'चे नाव बदलणार

शुक्रवार, 13 मार्च 2020 (12:48 IST)
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर मुंबई सेंट्रल टर्मिनसचे 'नाना शंकरशेठ मुंबई सेंट्रल टर्मिनस' असे नामकरण होणार असल्याचे समजते. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
 
मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी मुंबईतील लाखो नानाप्रेमी, दैवज्ञ समाजोन्नती परिषद आणि नाना शंकरशेठ प्रतिष्ठानने लावून धरली होती. मुंबई ते ठाणे ही देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात नाना शंकरशेठ यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी होत होती.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यायलाच हवे, असे सांगितले होते. शिवसेनेसाठी तो मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्ष नामांतर करता येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती