करोना व्हायरसचा फैलाव झाल्यानं मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल ट्रेनचे डब्बे फिनाईलच्या पाण्याने धुण्याच्या निर्णय घेतला आहे. शुक्रवार रात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. प्रवासी सतत लोकल ट्रेन मधील स्टीलच्या दाड्यांना, सीट्सना,खिडक्या हात लावत असतात. या भागांना फिनाईलने पुसून साफ करणार आसल्याचे मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. हे सफाईचे काम रोज रात्री करण्यात येईल. यासाठी लायझॉलसारख्या निजंर्तुकाचा वापर केला जाणार आहे.
याआधी लोकल ट्रेन रात्री कारशेड मध्ये आणून फक्त झाडून स्वच्छ केल्या जात होत्या. १८ दिवसांनी लोकल पाण्याने धुवून घेतल्या जात.पश्चिम रेल्वेत एकूण ८४ लोकल तर मध्य रेल्वेत १६५ लोकल आहेत. यातील २४९ लोकलच्या दररोज ३००० फेऱ्या होतात. मात्र आता रोज रात्री निजंर्तुकांचा वापर करून लोकल ट्रेन स्वच्छ केल्या जाणार आहेत. दक्षिण रेल्वेनेही आपल्या ट्रेन अशाच प्रकारे साफ करण्याचा निर्णय घेतला असून मेट्रो रेल्वेही अश्याच प्रकारे डबे स्वच्छ करणार आहेत. लांबपल्याच्या ट्रेनही अशाच प्रकारे स्वच्छ केल्या जाणार असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.