आता पीएमसीतून सहा महिन्यात दहा हजार काढता येणार

शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (09:45 IST)
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेधारकांना आज थोडासा दिलासा मिळाला आहे. सहा महिन्यातून एकदाच एक हजार रुपये काढण्याचे लादलेले आर्थिक निर्बंध आज अखेर अंशत: मागे घेतले आहेत. आता सहा महिन्यातून एकदा एक हजाराऐवजी दहा हजार रुपये काढण्याची मुभा पीएमसी बँकेने ग्राहकांना दिली आहे. मात्र बँकेच्या या निर्णयावरही ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
 
आरबीआयने नोटिफिकेशनमध्ये म्हटले की, बचत आणि करंट खात्यातून बँकेच्या खातेदारांना १०,००० रुपये काढता येतील. यापूर्वी जर कोणी १,००० रुपये बँकेतून काढले असतील तर त्या खातेदारालाही नव्या मर्यादेप्रमाणे पैसे काढता येतील. आरबीआयच्या या आदेशानंतर बँकेचे ६० टक्के खातेधारक आपले पूर्ण पैसे काढू शकतील.
 
दरम्यान, पीएमसी बँकेच्या अनेक खातेधारांनी आज पोलिसांत सामुहिक तक्रार दाखल केली. बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी जनतेचा पैसा लुटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच ज्या लोकांची नावे तक्रारीत आहेत त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात यावेत, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती