बँक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा बंद

गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (09:34 IST)
गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही फायदा होत नसल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शहरी भागातील 51 शाखा लवकरच बंद होणार आहेत अशी माहिती बँकेच्या मुख्यालयातर्फे कळविण्यात आली आहे. या शाखांची माहिती बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यामध्ये नऱ्हे, विंझर, सेल्फ हेल्प ग्रुप, पुणे पेन्शन पेमेंट ससून रस्ता शाखा आदी शाखांचा समावेश आहे.
 
बँक ऑफ महाराष्ट्र या राज्यातील प्रमुख बँकेच्या देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे 1 हजार 900 शाखा सध्या कार्यरत आहेत. यापैकी शहरी भागामध्ये असणाऱ्या सुमारे 51 शाखांमध्ये बँकेला गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही फायदा झालेला नाही. अशा शाखा लवकरच बंद करण्यात येणार आहेत. बंद करण्यात येणाऱ्या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड बंद करण्यात येणार आहेत. तसेच या शाखांमध्ये असलेली चालू खाती आणि अन्य सर्व प्रकारची खाती इतर शाखांमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत.
 
बँकेने शहरी भागामध्ये ज्या 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्या बँकांमध्ये ज्या ग्राहकांची खाती आहेत, तसेच जे ग्राहक या खात्यांचे चेकबुक वापरत आहेत अशा ग्राहकांनी आपले चेकबुक येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेमध्ये जमा करावे असे बँकेतर्फे ग्राहकांना कळविण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती