सुंदर दिसण्यासाठी !

बुधवार, 18 जून 2014 (11:38 IST)
‘ही क्रीम वापरा आणि फक्त सात दिवसांत उजळ गोरेपणा मिळवा’ अशी जाहिरात पाहून कित्येक महिला, पुरुष, तरुण ही क्रीम विकत घेतात. सात दिवस आपल्या चेह-यावर चोपडतात; पण गोरे काही होत नाहीत. एक तर पैसा वाया जातो आणि आपला भ्रमनिरास होतो. पश्चाताप होतो. पुन्हा अजून दुस-या चकचकीत सुंदर, गो-यापान दिसणा-या नटीकडून अशाच प्रकारची जाहिरात होते आणि पुन्हा आम्ही या जाहिरातीच्या मायाजालात फसत जातो. आम्ही आपल्या सुंदर दिसण्यापोटी किती रक्कम मोजली असेल याचे गणित नाही. आमची सद्सद्विवेकबुद्धी जाहिरात पाहताना नष्ट होत जाते आणि या जाहिराती आमच्या मनावर वेळोवेळी अधिराज्य गाजवतात. सुंदर दिसण्यासाठी भरपूर प्रकारची क्रीम्स, अनेक नामांकित उत्पादने बाजारात विक्रीसाठी असतात. ही उत्पादने महागडी असतात पण तरीही आम्हाला गोरे दिसायचे, छान दिसायचे, डागविरहित, तुकतुकीत त्वचा मिळवायची म्हणून अगदी अट्टाहासाने आम्ही पैसे खर्चून क्रीम विकत घेतो आणि फसतो ते इथेच! जाहिराती ग्राहकांची खूप दिशाभूल करत आहेत. आकर्षक वेष्टने, आकर्षक पॅकिंग, सुंदर नट-नट्यांची चित्रे इत्यादींचा भरपूर प्रमाणात वापर करून हे लोक आपला माल बाजारात खपवतात व आम्हाला भरपूर लुटतात. 
 
वर्तमानपत्रांत, टीव्हीवर, बाजारातील पोस्टर्सवर या जाहिरातींचा प्रचार व प्रसार होतो. आम्ही नट-नट्यांप्रमाणे सुंदर दिसण्यासाठी, त्यांच्यासारखे होण्यासाठी अक्षरश: रात्रंदिवस धडपडत असतो, मात्र आम्हाला हे कळत नाही की त्या शोभेच्या बाहुल्या असतात. पैसे कमवण्यासाठी काहीपण करतात. 
 
त्यांची दिनचर्या जनसामान्यांपेक्षा कितीतरी वेगळी असते.त्यांचे आरोग्य, डायटिंग, व्यायाम, खानपानाच्या पद्धती आमच्यापेक्षा खूप निराळ्या असतात. मग हा अट्टाहास कशासाठी? तर फक्त सुंदर दिसण्यासाठी. टक्कल पडल्यावर पुन्हा केस येतात का हो? नाही, तरीपण जाहिरातींच्या भूलथापांना बळी पडून अमुक तेलामुळे, अमुक उत्पादनामुळे दाट केस येतात... फक्त सहा महिन्यांत फरक पाहा. अशा गोष्टींवर साधा माणूस फसतो. पैशांचा पाऊस पडतोय जाहिरातींच्या जगात. हा पैसा कष्टाचा आहे, तरीपण आपण वाया घालतो फक्त सुंदर दिसण्यासाठी! 
 
-मीनाकुमारी व्यंकटराव सूर्यवंशी 

वेबदुनिया वर वाचा