तर मराठा समाज पुन्हा पूर्ण ताकदीने रस्त्यांवर उतरेल

सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:36 IST)
मराठा आरक्षणाच्या सुनावणीत वारंवार सरकारची उदासिनता दिसून येते आहे. सरकारची अशीच उदासीन भूमिका राहिली तर मराठा समाज पुन्हा पूर्ण ताकदीने रस्त्यांवर उतरेल. त्यावेळी संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने देण्यात आला.
 
मुंबईत ‘मराठा जोडो’ अभियानाची सुरुवात लालबाग येथून करण्यात आली. या अभियानाच्या निमित्ताने मुबई ते ठाणे अशी यात्रा काढण्यात आली. लालबाग येथील भारतमाता चौकातून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यात्रेत शेकडो मराठा तरुण मोटारसायकल आणि अन्य वाहने घेऊन सहभागी झाले होते.
 
यावेळी घोषणांनी लालबाग परिसर दुमदुमला होता. कुर्ला येथील सर्वेश्‍वर मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमात मराठा बांधवांना आरक्षणासंदर्भात माहिती देण्यात आली. दुपारी बारा वाजता चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे यात्रेचे आगमन झाले. तेथे जोरदार स्वागत करण्यात आले.
 
यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्‍त करण्यात आली. पंढरपूर येथून मंत्रालय येथे पायी दिंडी यात्रा निघणार आहे. त्याचे मुंबईमध्ये स्वागत करण्यात येईल आणि त्यात सर्वजण सहभागी होतील, असे समन्वयकांच्या वतीने सांगण्यात आले. ठाण्यात यात्रेचा समारोप करण्यात आला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती