मराठा समाजाकडून १७ सप्टेंबरला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेराव

मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (08:10 IST)
मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकारने योग्य ती बाजू न्यायालयात मांडावी यासाठी, मराठा समाज १७ सप्टेंबर रोजी, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. 
 
यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले की,  समाजातील तरुणवर्ग चिंतेत पडला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. मात्र त्या दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा न करता गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
 
ते पुढे म्हणाले की, न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी जी प्रवेश आणि नियुक्त्यांबाबत निवड जाहीर झालेली आहे. त्या सर्व संरक्षित करण्यात याव्यात. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे, ते शासनाने होऊ देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश जाहीर झाल्यावर, तो आदेश न्यायालयाच्या वेबसाईटवर आला नसताना. शिक्षण विभागाने मराठा समाजाच्या प्रवेशावर तातडीने स्थगिती देऊन चुकीचे केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
आता या आरक्षणाच्या स्थगितीबाबत मराठा समाज गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी यांना घेराव घालून निषेध करणार आहे. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती