विधानसभा निवडणुकीच्या निकालात विदर्भात भाजपा शिवसेना युतीला जबर फटका बसल्याचं दिसून आलं आहे. या निवडणुकीत भाजपला 62 पैकी फक्त 29 जागा वाट्याला आल्या आहेत. गेल्या वेळी भाजपाने एकट्याने लढून त्यांना 44 जागांवर विजय मिळाला होता. मात्र यावेळी अर्ध्याही जागा महायुतीच्या वाट्याला आल्या नाहीत.
त्यामुळे वैदर्भीय जनतेने भाजपा शिवसेनेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मताधिक्यही कमी झालं आहे. त्यामुळे विधानसभेत विजय मिळाला असला तरी भाजपसाठी विदर्भाचा निकाल ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
नागपूर शहरात सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी चार जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. नागपूर ग्रामीण भागात भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विदर्भाच्या इतर भागातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व असलेल्या विदर्भात पराभवाचा सामना करावा लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नाराजीचा फटका
विविध जातींमधील नाराजीचा फटका भाजपला पडल्याचं लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे म्हणाले.
ते सांगतात,"ओबीसी वर्ग दुरावला आहे. ओबीसी वर्ग हा विदर्भात महत्त्वाचा आहे. ऐनवेळी चंद्रशेखर बावनकुळे आदी लोकांचं तिकीट कापलं त्यामुळे तेली समाज दुरावला. तसंच माळी समाजाने या सरकारने फारसं लक्ष दिलं नाही. शेवटच्या काही महिन्यात त्यांनी अतुल सावेंना मंत्री केलं. माळी समाज नाराज होता. तो वंचित बहुजन आघाडीकडे गेला आणि त्यामुळे लोकसभेत भाजपला फटका बसला होता. त्यामुळे काँग्रेसपासून दुरावलेला वर्ग पुन्हा काँग्रेसकडे गेला आहे. त्यामुळे काँग्रेसला अनेक मतं मिळाली हे आकडेवारी पाहिल्यास लक्षात येतं. याच कारणामुळे विजयी जागांवर भाजपचं मताधिक्य कमी झालं आहे."
'गडकरींना डावललं'
विधानसभा निवडणुकीच्या वेळी गडकरी फारसे कुठे प्रचारात दिसले नाही. गडकरींचे समर्थक असलेल्या बावनकुळेंना तिकीट नाकारण्यात आलं त्याचाही फटका भाजपला बसला.
"विदर्भात मुख्यत: गडकरींचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे. कारण फडणवीस हे लोकनेते नाहीत. त्यामुळे गडकरींना डावलण्याचा फटका भाजपला पडला आहे." असं देवेंद्र गावंडे सांगतात.
उत्तर नागपूरचे भाजपचे पराभूत उमेदवार डॉ.मिलिंद माने यांनी बीबीसी मराठीशी बातचीत केली. त्यांच्या पराभवाची कारणमीमांसा केली. ते म्हणाले, "या निवडणुकीत बसपाची सगळी मतं काँग्रेसकडे वळल्याने पराभव झाला. पारंपरिकरित्या माझा मतदारसंघ भाजपचा नाही. तरी आम्ही विजय खेचून आणला. मात्र यावेळी लोकांनीही मतदानासाठी अजिबात उत्साह दाखवला नाही. जोडून सुट्या आल्यामुळे लोक सुटीसाठी गेले. त्याचाही फटका आम्हाला पडला."
चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट नाकारल्याचा फटकाही मिलिंद मानेंना पडल्याचं ते सांगतात. त्यांना तिकीट नाकारल्यामुळे भाजपला धडा शिकवायचं ठरवलं आणि त्याचमुळे माझा पराभव झाल्याचं मानेंनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचं अपयश
"या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. ज्या पद्धतीने ज्येष्ठ नेत्यांना डावललं त्यावरून फडणवीसांमध्ये असलेली मग्रुरी दिसून आली", असं मत पत्रकार पवन दहाट व्यक्त करतात.
गेली पाच वर्षं व्यक्तीकेंद्रित सत्ता भाजपने चालवली. फडणवीसांनी नागरी विकासात काम झालं. मात्र समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना या काळात घडल्या. त्यातच मुख्यमंत्रीच गृहमंत्रीही होते. पण असं असताना नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीसांचा पूर्णपणे एकछत्री अंमल होता. या सगळ्यांचा फटका भाजपला बसल्याचं ते सांगतात.
काँग्रेसला सुगीचे दिवस
विदर्भ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. पण 2014ला आघाडी सरकारला लोक कंटाळलेले होते. त्यांची 15 वर्षांची अॅंटी इन्कंबन्सी होती त्याचा निश्चितच फायदा भाजपला झाला. त्यात चारही पक्ष वेगवेगळे लढले. शिवसेनेची विदर्भात ताकद नाही त्याचाही फायदा त्यांना त्यावेळी झाला.
यावेळी ग्रामीण भागातल्या लोकांची सरकारवर काही प्रमाणात नाराजी होती. कारण जे विकासाचं राजकारण भाजपने केलं तो ग्रामीण भागात पसरला नाही. ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवर नाराजी आहे तिथं काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व सक्रिय झालं आणि त्यांना मतदान झालं. पण ज्याप्रमाणे ही निवडणूक भाजपनं एक पक्ष म्हणून लढली तशी निवडणूक काँग्रेसनं पक्ष म्हणून लढली नाही. अन्यथा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं असं हर्डीकर पुढे म्हणाले.
असं असलं तरी निवडणुकीत काँग्रेस प्रचंड प्रमाणात निरुत्साही होती. तरीही काँग्रेसने विदर्भात लक्षणीय कामगिरी केली आहे. नागपूरबरोबरच अमरावती, चंद्रपूर गोंदिया या भागातही काँग्रेसला यश मिळालं आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांच्यामते विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला आहेच. पण त्याचवेळी विदर्भाच्या मतदारांना स्वभावाने नम्र नेतृत्व आवडतं आणि नेमक्या याच गोष्टीचा अभाव भाजपाच्या नेत्यांमध्ये होता त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत.
"त्यांची संघटना पूर्ण खिळखिळी झाली होतीय तरीही तरीही निव्वळ लोकांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला विजय मिळाल्याचं", पवन दहाट सांगतात. पक्षाचा पाठिंबा मिळाला असता तर पक्षाला आणखी जागा मिळाल्या असत्या असंही ते म्हणाले.
"काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही विदर्भात चांगली कामगिरी केली आहे. शरद पवारांचा प्रचार या कामी आला. भाजपने शरद पवारांवर टीकेचा भडिमार केला तरी शेवटी शरद पवार हे महाराष्ट्राच्या जनतेचा हळवा कोपरा आहेत. त्यामुळे जे विकासाने कमावलं ते पवारांवरच्या टीकेने गमावलं", असं श्रीपाद अपराजित सांगतात.