राष्ट्रवादीला मोठा धक्का, शरद पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बसला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लॉंडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.
 
याआधीच अजित पवार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यास हायकोर्टाने बजावलं होतं. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांचं नाव आघाडीवर असताना, आता शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यामुळे निवडणुकीत शरद पवार यांची प्रतिमा मालिन होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती