'मनसे'च्या उमेदवाराचा अर्ज बाद

शनिवार, 26 सप्टेंबर 2009 (13:32 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज जोरदार धक्का बसला. पक्षाचे चिंचवडचे उमेदवार एड. सुनील वाल्हेकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आहे. मुंबईतही पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेना उमेदवार संजय घाडी यांनी आक्षेप घेतला आहे.

वाल्हेकर यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दोनच अनुमोदकांच्या स्वाक्षर्‍या दिल्या होत्या. पण मनसेला राजकीय मान्यता अद्याप मिळाली नसल्याने दहा सूचक-अनुमोदकांच्या सह्या लागतात. याची कल्पना नसल्याने वाल्हेकरांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बाद ठरवला.

मुंबईत मागोठणे मदतारसंघात प्रवीण दरेकर यांनी अर्जासोबत दिलेल्या माहितीत काही माहिती न दिल्याचा आक्षेप शिवसेनेचे उमेदवार संजय घाडी यांनी घेतला आहे. त्यामुळे यावरून दरेकर यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थक उमेदवार आशा बुचके यांची उमेदवारीही धोक्यात आहे. या मतदारसंघात शिवसेनेने आधी पक्षाच्या अन्य एका कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म दिला होता. मात्र, श्री. पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या समर्थक बुचके यांनाही उमेदवारी व एबी फॉर्म दिला. दोघांना एबी फॉर्म दिल्यामुळे त्यापैकी एकाचा उमेदवारी अर्ज बाद ठरू शकतो. त्यावर जुन्नर येथील निवडणूक निर्णय कार्यालयात चर्चा सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा