काँग्रेरस पक्षाला पूर्व वैभव हवे असेल तर पक्षात मने जोडण्याचे काम सातत्याने व्हायला हवे. कार्यकर्ते आणि नेते इतकेच नव्हे तर नेत्या-नेत्यात सलोखा निर्माण व्हायला हवा. मात्र, दुर्दैवाने हे आज घडत नाही. त्याचे परिणाम आपण बघतोच आहोत, अशी खंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित देशमुख यांनी व्यक्त केली.
रणजित देशमुख म्हणाले की, सरकार चालविणे हे पक्षातल्या काही लोकांचे काम असते. तिसर्यांनी पक्ष सांभाळायचा असतो, वाढवायचा असतो, त्यातून मन जोडायचे असतात, जनसामान्यांच्या समस्याची सोडवणूक करायची असते. आज दुर्दैवाने प्रत्येक जण सत्तेच्या राजकारणात गुंतला असल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
आपण आपली व्यथा पक्षाध्यक्षांजवळ मांडली आहे. जर पक्ष वैभवाच्या शिखरावर न्यायचा असेल तर मने जोडून सलोखा साधायला हवा आणि पक्षविस्तारात अगदी गावपातळीच्या नेत्यांपासून सर्वांना सामावून घेत विश्वास निर्याण करायला हवा, असे सूचविले आहे. त्या काम निर्णय घेतात आणि काम निर्देश देतात त्याप्रमाणे काम करू. एरव्ही एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडणारच, असे देशमख यांनी स्पष्ट केले.
२००७ च्या बंडखोरीबद्दल विचारले असता, पक्षात निष्ठावंतांना किंमत मिळावी म्हणून मी बंडखोरी केल्याचा दावा रणजितबाबूंनी केला. राजकारणातील तडजोड म्हणून एखादवेळी नव्यांना संधी देणे मी समजू शकतो. पण, निष्ठावंतांना कायम हमाली करायला सांगायची आणि उपर्यांना डोक्यावर घ्यायचे ही कुठली रीत झाली. म्हणून मी विरोध केला. माझ्या विरोधाचे परिणाम आज दिसताहेत. भविष्यात अजून स्पष्ट दिसतील आणि ते पक्षहिताचे असतील, असा विश्वास तंनी व्यक्त केला.
येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही. याबद्दल दुःख जरूर आहे. पण, त्याचा परिणाम आपल्या कामावर होणार नाही. पक्ष जे सांगेल ते काम या निवडणुकीत करणार, असे रणजितजींनी स्पष्ट केले. आघाडीत झालेल्या बंडखोरीबद्दल चिंता व्यक्त करीत त्याचा निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालून ही बंडखोरी संपविणे पक्षाच्या हिताचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील आघाडी सरकारने आजवर अनेक चुका केल्या असल्या तरी याही वेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचेच सरकार येणार, असा विश्वास देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.