विदर्भ जनआंदोलन समितीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कलावती बांदुरकर या विधवा शेतकरी महिलेने अखेर माघार घेतली असून तिच्याऐवजी आता बेबीताई बैस या निवडणूक लढविणार आहेत. बैस यांच्या शेतकरी पतीनेही आत्महत्या केली आहे.
राहूल गांधी यांनी केलेल्या मदतीमुळे प्रकाशझोतात आलेल्या कलावतींनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया कॉंग्रेसकडून उमटली होती. त्यामुळे ही निवडणूक लढवावी की नाही, या द्वंद्वांत कलावतीबाई सापडल्या होत्या. याच्याच ताणामुळे त्यांना छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले होते. काल अर्ज भरण्यासाठीही त्या एम्ब्युलन्समधूनच आल्या होत्या. मात्र, अखेरीस त्यांनी आज आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही निवडणूक लढवत नसल्याचे जाहीर केले. त्यांच्याऐवजी आता बेबीताई बैस या निवडणूक लढवतील असे विदर्भ जनआंदोलन समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी जाहिर केले.