श्री कोळेश्वर मंदिर कोळथरे

Koleshwar Mandir Kolthare श्री देव कोळेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे या गावात असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात मुख्य देवता भगवान शिव आहे. हे देवस्थान महाराष्ट्रातील प्राचीन हिंदी शिवमंदिरांच्या श्रेणीतील आहे. या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवारी मोठी गर्दी असते. पुजार्‍यांच्या मते मंदिरातील तीर्थ अनेक रोग आणि आजार बरे करण्यासाठी शक्तिशाली आहे. कोळेश्वर हे त्रिगुणात्मक देव आहे. यांच्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही तत्त्वे आहेत.
 
सण-उत्सव
सर्व महत्त्वाचे, शुभ धार्मिक दिवस येथे साजरे केले जातात. या मंदिरात साजरे होणारे काही महत्त्वाचे सण म्हणजे पौर्णिमा, नवीन वर्षाचा दिवस, वैकुंठ एकादशी, अमावस्या, ओंजल उत्सव, नवरात्रोत्सव, जानेवारीतील मकर संक्रांती, महाशिवरात्री, सप्तमी पूजा आणि मासी उत्सव. श्रीदेव कोळेश्वराचा वार्षिक उत्सव कार्तिक शुद्ध 11 पासून कार्तिक कृष्ण 1 पर्यंत साजरा केला जातो.
 
कोळथरे स्थित श्री कोळेश्वर महादेव अनेक "कोकणस्थ ब्राह्मणांचे" कुलस्वामी व ग्रामदैवत आहे. कोळथरे गाव दापोली-दाभोळ या मुख्य स्त्यापासून आत समुद्रकिनार्‍यावर वसलेला आहे. श्री कोळेश्वर बर्वे, माईल, छत्रे, भावे, वाड, कोल्हटकर, बापये, बोरकर, पिंपळखरे, महाजन, लोणकर, वर्तक, लाटे, शेठे, शोचे, शेंड्ये, जोशी, लागू, दातीर, सोमण, गोमरकर, बाम, पेठे, जोगदंड, दातार, भागवत, अग्निहोत्री, खंगले, खंडाजे, खाजणे, बाळ, जोगदेव, गानू, पर्वते, विनोद, कर्वे, डोंगरे, माटे, जोगदंड, गद्रे, मोडक, कुंटे अशा कोकणस्थ ब्राह्मण घराण्यांचा कुलस्वामी आहे.
 
श्री देव कोळेश्वर देवास्तानचे भक्तनिवास आहे ते आता नंदू दातार बघतात तसेच शरद सोमण येथील मुख्य पुजारी आहेत.
 
एका आख्यायिकेप्रमाणे येथे भातासाठी शेत नांगरत असताना एका कोळ्याला पाणी लाल झालेले दिसून आले तर त्याला नांगराच्या फाळालाही रक्त लागले दिसले. त्याला काही कळले नाही म्हणून त्याने गावातील लोकांना गोळा केले. या घटनेबद्दल कोणाचाही काहीही लक्षात येत नसल्याने ते सर्व परतले. मात्र रात्री कोळ्याला झोपेत भगवान शंकराने स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि स्वत: प्रगट झाल्याचे सांगितले. तेव्हा कोळी सकाळी लवकर उठून गावकऱ्यांना घेऊन तिथेच गेला तेव्हा त्याला तिथं स्वयंभू शिवलिंग दिसले. तिथेच सर्वांनी साष्टांग नमस्कार करून छोटेसे शिवालय उभारले. कोळ्याचा ईश्वर म्हणजे कोळेश्वर या नावाने सर्व संबोधू लागले. या कोळी घराण्यातील व्यक्ती इथं बुरोंडीहून दर फाल्गुनमासी बळी घेऊन येते आणि ग्रामस्थ तिचा सन्मान करतात अशी नोंद मी देवालयाच्या पुस्तिकेत वाचली.
 
येथे जवळच जाखाई काळेश्रीचे देऊळ आहे. श्री विष्णू-लक्ष्मी, श्री गणेश आणि हनुमानाची मंदिरे ही आहेत. मंदिराच्या बाजूला एक ओढा आहे. येथून मंदिरात पोहचताना परिसरातील झाडांची सावली वेगळाच अनुभव देते. समुद्र किनार्‍यावर वसलेले कोळथरे गाव अगदी शांत आणि रम्य आहे. येथील समुद्राला समांतर घरांची रांग, बागा असे सुंदर चित्र बघायला मिळतात. विशेष म्हणजे येथील देवळांना नियमित रंगरंगोटी केली जाते त्यामुळे सौंदर्य वेगळचं दिसून येतं.
 
कोळथरे कसे पोहचाल - 
जवळचे विमानतळ रत्नागिरी आहे.
जवळचे रेल्वे स्थानक खेड आहे.
दापोलीहून कोळथरे सुमारे 20 किमी अंतरावर आहे.
दापोली मुंबईहून 240 किमी अंतरावर आहे.
फोन - न :- (02358)285304
09819018734

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती