छत्रपती शिवाजी महाराजांनी याच जलदुर्गाच्या पाठबळावर कोकण किनारपट्टीवर स्वराज्य भक्कम केलं. मुरुड, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, उंदेरी अशा अप्रतिम जलदुर्गाची नावे दुर्गवेडय़ांना नवीन नाहीत.
पुण्याहून निघाल्यानंतर पेणमध्ये चहा नाश्ता घेऊन थळच्या दिशेने जाणे सोयीचे असते. थळला पोहोचायला सकाळचे 11 वाजतात. अलिबागमार्गे थळ 5 कि.मी. अंतरावर आहे. थळमध्ये आल्यानंतर आर.सी.एफ. खत कंपनीच्या बाजूने दोन रस्ते जाताना दिसतात. डाव्या बाजूच्या रस्त्याने थळचा किनारा गाठता येतो. त्यानंतर थळचा किल्ला पाहता येतो.
इंग्रजांच्या विरोधाला न जुमानता तसेच जंजिर्याच्या सिद्दी आणि एकूणच ब्रिटिश सत्तेला आवर घालण्यासाठी इ.सन. 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच आज्ञेने सायनाक भंडारी यांनी सहकार्यांच्या साथीनं खांदेरी बांधून घेतला. केवळ सहा महिने 150 सहकार्यांसह आणि फक्त चार तोफा सोबत घेऊन हा किल्ला सायनाक भंडारी यांनी भर पावसाळाच्या दिवसात जिद्दीनं उभा केला.
खांदेरीवर पोहोचल्यावर तेथील एकेक भाग पाहणे सोयीचे होते. समुद्राच्या अफाट उसळणार्या लाटांचा मारा सहन करीत ही तटबंदी दिमाखदारपणे उभी आहे. फक्त दगड एकमेकांवर रचून तयार केलेली ही तटबंदी मात्र काही भागात ढासळली आहे. उत्तरेकडील एका बुरुजावर एक तोफ चांगल्या अवस्थेतील तोफ गाडय़ावर उभी आहे. पोलादी आणि चारचाकी तोफ प्रेक्षणीय आहे.