राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज वादळी सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु ठेवले आहे. आज पहिल्याच दिवशी या संघर्षाची झलक पहायला मिळाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी गदारोळ केला आणि नंतर सभागृहाच्याबाहेर विधानभवनाच्या आवारामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान राज्यपालांचा विरोध करण्यासाठी एका शिवसेना आमदाराने चक्क शीर्षासनही केलं.
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी सुरु असल्यामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपतं घ्यावं लागलं. विरोधकांनी यावेळी राज्यपाल… राज्यपाल… खाली डोकं वर पाय अशा घोषणा दिल्य तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन निषेध दर्शवला. खाली डोकं वर पाय या घोषणेला अनुसरुन दौंड यांनी शीर्षासन केलं.
राज्यपाल बोलायला उभं राहिल्यानंतर शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी झाली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सुरुवातीला दिल्या गेल्या. नंतर गोंधळ, घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच आपलं भाषण सुरू ठेवण्याचा राज्यपालांनी प्रयत्न केला. मात्र, नंतर ते निघून गेले. अभिभाषणाची प्रत त्यांनी पटलावर ठेवली.