महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न- अजित पवार
गुरूवार, 9 मार्च 2023 (17:47 IST)
राज्याचा अर्थसंकल्प आज 9 मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "या अर्थसंकल्पात सगळ्याच घटकांचा समावेश केला आहे. या अर्थसंकल्पात नमो शेतकरी ही योजना सादर केली, ही ऐतिहासिक योजना आहे. या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. आम्ही महिलांचा सन्मान केला आहे. लेक लाडकी ही योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आहे.
असंघटित कामगारांचं हातावर पोट आहे. त्यांच्या परिवाराचं शिक्षण, याबद्दल काळजी घेतली आहे. ज्येष्ठांना एसटीत 50 टक्के सूट दिली आहे.
अर्थसंकल्पाचे निकाल येत्या काळात तुम्हाला पहायला मिळतील. आम्ही निदान गाजर हलवा तरी दिला त्यांनी लोकांना उपाशी ठेवलं आहे. आकडे फुगवण्यासाठी आम्ही केलं नाही. आम्ही कोरडी आश्वासनं दिली नाही. या अर्थसंकल्पाद्वारे देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "महापुरुषांच्या नावाने अनेक घोषणा केल्या, पण ठोस तरतूद केली नाहीये, असं अजित पवार यांनी म्हटलं.
पुरंदरचं विमानतळ आम्ही करणार असं अर्थसंकल्पात म्हटलं, पण करणार म्हणजे काय करणार? असा सवाल त्यांनी केला.
शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. एका शेतकऱ्याच्या घरात किमान पाच लोक आहेत असं गृहीत धरलं तर तुम्ही त्यांना तीन रुपये दररोज देत आहात. तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करत आहात का?' असं ते म्हणाले.
हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
तर "आमच्या सरकारच्या काळात कोरोनाचं संकट होतं, केंद्र सरकार आमच्या बाजूचं नव्हतं. कायम जीएसटीची थकबाकी होती. महाशक्तीचा पाठिंबा असलेला सरकार कारभार कसा करताहेत ते माहिती आहे. अद्यापही त्यांच्या बांधावर पंचनामा करायला एकही अधिकारी गेलेला नाही.
अर्थसंकल्प म्हणजे मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न आहे. गाजर हलवा असं एका शब्दात मी या अर्थसंकल्पाचं वर्णन करेल. बाळासाहेबांचा दवाखाना ही आमचीच घोषणा आहे." अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शिवराज्याभिषेकासाठी 350 कोटींच्या निधीची घोषणा केली आहे.
फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा करताना म्हटलं की, जून 2015 मध्ये मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मागेल त्याला फळबाग, शेततळे इत्यादी देण्यात येईल. त्यासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणा
शाश्वत शेती समृध्द शेती. या योजनेसाठी एकूण 29163 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महायोजना
प्रतिवर्ष केंद्र सरकार 6 हजार देतं त्यात अजून 6 हजार यांची भर घालतो. याचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार
पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्याला फक्त 1 रूपया भरावा लागेल. शेतकऱ्याच्या वतीचा हफ्ता सरकार भरेल.
महाकृषी विकास अभियान जाहीर
एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी सौरऊर्जा पंप देण्यात येतील
'लेक लाडकी' योजना नव्या स्वरूपात
लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची... असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी 'लेक लाडकी' योजना नव्या स्वरूपात मांडली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आहे.
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
अकरावीत 8000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
महिलांसाठी योजना
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण करुन केंद्राच्या मदतीने 'शक्तीसदन' ही नवीन योजना.
या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
या योजनेत 50 नवीन 'शक्तीसदन' निर्माण करणार
नोकरी करणाऱ्या महिलांना 10000 वेतन असल्यास professional tax भरावा लागतो. ती मर्यादा आता 25000 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे
पायाभूत क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा
१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं राज्याचं लक्ष्य आहे. यासाठी सिंदखेड राजापासून ते शेगावपर्यंत चार पदरी रस्ता बांधणार.
पुण्यात २७ हजार कोटी खर्चून रिंग रोडचं काम सुरू आहे.
१४२२५ कोटी रूपये रस्ते व पुलासाठी देण्यात येतील.
सार्वजनिक बांधकाम विभागास १९४९१ कोटी रूपये देण्यात येतील
सर्वांसाठी घरे... या एका नवी घोषणा जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रस्तावित आहे.
इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची 'मोदी आवास घरकुल योजना' राबवण्यात येईल.
प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे (2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)
शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)
इतर मागासवर्गीयांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये.
सार्वजनिक वाहतूक आणि हवाई सेवा क्षेत्रातील तरतुदी
शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी खर्चून उभारणार
छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे
मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला.
मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी, मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये.
मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये.
नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी.
पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर.
अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये.
नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार.
सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल.
100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी.
युवकांसाठी अर्थसंकल्पात काय?
लॉजिस्टिक पार्क धोरण लवकरच
नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
वस्त्रोद्योग, खणिकर्म क्षेत्रासाठी नवीन धोरण
स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था
नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिर्यांच्या उद्योगाला चालना
मांघर (महाबळेश्वर)च्या धर्तीवर 'मधाचे गाव' हा उपक्रम राज्यभर राबविणार
500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहरांकडे ओढा थांबणार
मुंबईतील 200 महापालिका, जि.प.शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण
500 आयटीआयची दर्जावाढ/2307 कोटी रुपये
75 आयटीआयचे आधुनिकीकरण/610 कोटी रुपये
75,000 शासकीय नोकरभरतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध
बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार
पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान
नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये
पर्यावरण क्षेत्रासाठी तरतुदी
राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार