पुरावे माझ्याकडे असून, खोटं बोलत असेन तर मला सभागृहातच फाशी द्या : रवी राणा

सोमवार, 7 मार्च 2022 (15:21 IST)
विधानसभेत अमरावतीचे आमदार रवी राणा चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. आमदार रवी राणांनी विधानसभेत पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या कारवाईवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. याचे पुरावे माझ्याकडे असून, खोटं बोलत असेन तर मला सभागृहातच फाशी द्या, असं म्हणत रवी राणांनी सभागृहातील वातावरण चांगलंच तापवलंय.
 
माझ्या घरात मध्यरात्रीच्या वेळी 150 पोलीस घुसले. वयोवृद्ध आई-वडिलांची काळजी न करता पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आला. मला अटक करण्यासाठी सरकारचा मोठा दबाव असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. याचे सगळे पुरावे माझ्याकडे असून, मी खोटं बोलत असल्यास मला या सभागृहात फासावर लटकवा, असं म्हणत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
 
तसेच त्यांच्यागुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दबाव आणल्याचंही त्यांनी सांगितलंय. तुम्ही जर वाझे तयार करणार असाल तर तुमची अवस्था देशमुखांसारखी होईल, असे म्हणत रवी राणांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले. सरकारकडून कारवाईसाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. माझी पत्नी खासदार नवनीत राणा यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांचा अपमान करण्यात आला होता, असा आरोपही सभागृहात आमदार रवी राणा यांनी केलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती