कोल्हापूर :प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाहू महाराजांना काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. केवळ काँग्रेसने आपल्या सात उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसने शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी सुरूच आहे. त्यापूर्वीच आता प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर बोलत होते.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने ज्या सात जागा जाहीर केल्या आहेत, त्या त्यांनी आम्हाला सांगाव्यात. आम्ही त्यांना इतर जागांवर पाठिंबा देणार नाही. येत्या २६ तारखेला आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत. भाजपला सत्तेतून खाली खेचणे, हेच आमचे लक्ष्य आहे.
शाहू महाराजांनी मानले आभार
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचे मला आत्ताच कळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं. अशा शब्दांत शाहू छत्रपतींनी आंबेडकरांचे आभार मानले.