शाहू महाराज जेव्हा दिल्लीत येऊन म्हणाले होते, 'आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा'
गुरूवार, 21 मार्च 2024 (10:31 IST)
21 आणि 22 मार्च 1920 ला कोल्हापुरातील माणगावमध्ये भरलेल्या बहिष्कृत वर्गाच्या परिषदेला आज 104 वर्षं पूर्ण होत आहेत.माणगाव परिषदेच्या निमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज हे एका व्यासपीठावर आले होते. 100 वर्षांपूर्वी भरलेल्या या परिषदेच्या आठवणी लोक आजही जपतात. माणगाव परिषदेनिमित्त कार्यक्रम आयोजित करत असताना अनेकांना नागपूर आणि दिल्लीमध्ये झालेल्या परिषदांचा विसर पडतो किंवा त्याबद्दल फारसं भाष्य कुठे दिसत नाही. किंबहुना, माणगाव सोडून इतरत्र कुठे अशा काही परिषदा झाल्या होत्या, हेच अनेकांना ठाऊक नाहीय. नागपूर आणि दिल्लीतल्या परिषदांची चर्चा होणं आवश्यक आहे. हे मी म्हणतोय, हे तुम्हाला अधिक कळण्यासाठी या दोन्ही परिषदांमागची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आयुष्यात येण्यापूर्वी सत्यशोधक चळवळ आणि विशेष म्हणजे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गात अनेक चळवळी सुरू होत्या. मात्र, त्या सर्व चळवळींना अनेक भौगोलिक मर्यादा आणि मर्यादित दृष्टिकोन सुद्धा होता. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे एकत्रितपणे या दोन्ही मर्यादांच्या पलिकडे जाऊन चळवळ उभी करताना दिसतात. बी. सी. कांबळे यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या चरित्रात लिहिलंय की, बाबासाहेब जेव्हा लंडनहून परतले, तेव्हा बॉम्बे प्रातांत अनेक परिषदा झाल्या. मात्र, त्यांनी अशा परिषदांमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. माणगाव परिषदेला मात्र ते स्वत: पुढाकार घेताना दिसले. बाबासाहेबांचा हा पुढाकार चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता आणि तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.
नेतृत्वाचा शोध घेणारे शाहू महाराज
शाहू महाराजांनी 1902 साली जाहीर केलेलं आरक्षण आणि माणगावमध्ये 1920 साली भरलेल्या परिषेदेच्या घटनांमध्ये दोन दशकांचं अंतर दिसतं. या दोन दशकांचा आणि शाहू महाराजांच्या कामाचा आढावा घेतला असता, असं दिसून येतं की, शाहू महाराज ब्राह्मणेतर म्हणजेच आजचे अनुसूचित जाती आणि जमाती, भटके-विमुक्त, बारा-बलुतेदार, मराठा आणि मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी काम करताना दिसतात. त्याचवेळेस शाहू महाराज अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींकडे विशेष लक्ष देतानाही दिसतात. आपलं काम शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीपुरतं मर्यादित न ठेवता, या समुदायातून स्वतंत्र आणि स्वावलंबी चळवळ व नेतृत्व उभं राहायला हवं, असं शाहू महाराजांना पदोपदी वाटत होतं, हे लक्षात येतं. खरंतर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गात अनेक मंडळी काम करत होती. यात प्रामुख्यने विठ्ठल रामजी शिंदेंचं नाव घेता येईल. त्यांनी अनेक शाळा आणि वसतिगृहेही काढली होती. मात्र, विठ्ठल रामजी शिंदेंच्या कामाचा प्रवाह काँग्रेसकडे जाणारा होता. पर्यायानं, स्वतंत्र आणि स्वावलंबी चळवळींमध्ये हा फार मोठा अडथळा आहे, असं शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही वाटत होतं. म्हणूनच की काय, शाहू महाराज हे जोतिराव फुले यांना आपले आदर्श व्यक्तीमत्व मानून, स्वतंत्र आणि स्वावलंबी चळवळीचे पाठीराखे बनू पाहत होते. या सगळ्या त्यांच्या भूमिकांमुळेच ते नव्या नेतृत्वाच्या शोधात होते, असं एकूण शिवतकर मास्तर आणि शाहू महाराज यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारातून दिसून येतं. शिवतकर मास्तर हे चांभार समाजातील होते. अस्पृश्य निवारणाच्या कामात ते आधीपासूनच सक्रीय होते. पुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामातही हातभार लावला. या अनुषंगाने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या एका लेखात दिलेला पत्रव्यवहार फार महत्त्वाचा आहे. दिनांक 6 सप्टेंबर 1919 रोजी शिवतकरांना पाठवलेल्या पत्रात शाहू महाराज लिहितात की, जर बडोद्याचे सयाजी गायकवाड, हैदराबादचे निजाम किंवा विठ्ठल रामजी शिंदे मदत करत असतील, तर ती घ्यावी. परंतु, या सर्व मंडळींना पुढारी मानू नका. असा सल्ला देत शाहू महाराज पुढे लिहितात की, आपण पुढारी असा कोणाचंच घेऊ नये. सल्लागार म्हणून घ्यावं. पुढारी म्हणून घेतला की लगेच त्यांनी आपली अंमलबजावणी करून घेतलीच. माझं न ऐकाल तर तुमचे संस्थेशी माझा संबंध राहणार नाही. याच अनुषंगाने ते पुढे लिहितात, “पशूदेखील आपल्या जातीशिवाय पुढारी स्वीकारत नाहीत. मग मनुष्यानी का स्वीकारावा? हरणाच्या कळपात डुक्कर पुढारी नसतो. मग मनुष्याच्या कळपात दुसऱ्या जातीचे पुढारी का असावेत? याचे कारण थोडक्यात आहेत हे की, पुढारीपण घेतलं की बकऱ्यासारखी किंवा ढोरासारखी अवस्था होते. मोडका-तोडका आपल्या जातीचाच पुढारी घ्यावयास पाहिजे आहे. ब्राह्मणास जर आमचा पुढारीपणा घेणेस पाहिजे असेल, तर जातीभेद मोडून त्यांनी रोटी-बेटी व्यवहार कारावास पाहिजे. तरच त्यांना पुढारी मानू, नाहीतर माझ्यासारखी मंडळी दूर राहून यथाशक्ती सल्ला व द्रव्याद्वारे मदत करतील. सल्ला पाहिजे त्याचा घ्यावा, पण आपल्या मानला वाटेल ते करावे. अशा मंडळीस मी सल्ला आणि द्रव्यद्वारे मदत देण्यास तयार आहे. गाई-बैलासारखे दुसऱ्या जातीवर अवलंबून राहणाऱ्या लोकांशी संबध सुद्धा ठेवणे मला इष्ट वाटत नाही आणि मीही ठेवणार नाही.” शाहू महाराजांच्या या पत्रातून तीन गोष्टी ठळकपणे दिसतात. एक म्हणजे नेतृत्व करणारी व्यक्ती अस्पृश्य समाजातीलच असायला हवी, दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक मदत आणि सहाय्यक बनायला तयार आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते नेतृत्व म्हणून स्वत:ला पुढे करत नाहीत किंवा स्वत:ला लादत नाहीत.
...आणि शाहूंना बाबासाहेब भेटले
नेतृत्वाच्या शोधात असताना शाहू महाराजांना बाबासाहेब भेटले, ते दत्तोबा पवार, शिवतकर मास्तर आणि दत्तोबा दळवी या तीन व्यक्तींमुळे. यातील दत्तोबा पवार आणि शिवतकर हे चांभार समाजातील कार्यकर्ते होते, तर दत्तोबा दळवी हे मुंबईतील जे. जे. आर्ट कॉलेजमध्ये शिकायला होते. नंतर या दळवींनी कोल्हापूर संस्थांनात कामही केलं. दत्तोबा दळवी यांच्या कुटुंबाने प्रसिद्ध केलेल्या पत्रातून हे दिसून येते की, शाहू महाराज हे बाबासाहेबांना भेटण्यासाठी फार आतुर होते. मात्र, बाबासाहेबांना तेवढी आतुरता नव्हती, असं दिसून येतं. मात्र, पुढे दत्तोबा दळवींच्या पुढाकाराने बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांची भेट झाली आणि त्यानंतर ते कायमचे चळवळीतले सहकारी, तसंच व्यक्तिगत आयुष्यात मित्र बनले.
माणगाव परिषद : स्वतंत्र आंदोलन आणि नेतृत्व
शाहू महाराजांना अपेक्षित असलेला नेतृत्वाचा शोध बाबासाहेबांच्या रूपानं लागलेला होता. मात्र, हे नेतृत्व जनमानसात जावं, असंही त्यांना वाटत होतं. त्यासाठी काही घटना घडत गेल्या आणि काही घटना घडवल्या गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं कोल्हापुरातील आगमन आणि सत्कार असो, किंवा मग पुढे माणगावची बहिष्कृत वर्गाची परिषद असो, या सर्व घटना बाबासाहेबांना नेतृत्व म्हणून पुढे आणण्यास पूरक ठरत गेल्या. यातली महत्त्वाची घटना म्हणजे, अर्थातच माणगाव परिषद. ही बहिष्कृत वर्गाची परिषद कोल्हापुरात व्हावी, अशी मुळात बाबासाहेबांची इच्छा होती. मात्र, शाहू महाराज आणि सत्यशोधक चळवळीत काम करणारी अनेक मंडळींना वाटत होतं की, ही परिषद कोल्हापूरबाहेर व्हावी. त्यांची अशी का इच्छा होती, याचं ठोस असं कारण कुठे सापडत नाही. अखेर कोल्हापूरच्या दक्षिणेकडील माणगाव हे गाव शाहू महाराजांच्या सूचनेनुसार परिषदेच्या आयोजनासाठी ठरवण्यात आलं. विशेष म्हणजे, माणगावात अनुसूचित जातींची लोकसंख्या फार कमी होती. जैन समाज मोठ्या प्रमाणात होता. या गावचे पाटील हे सुद्धा जैन समाजाचे होते. मात्र, ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांनीच या परिषदेच्या नियोजनाची जबाबदारी घेतली होती. शाहू महाराजांच्या मदतीनेच सुरू झालेल्या मूकनायक वृत्तपत्रातील वृत्तानुसार, या सभेला (माणगाव परिषद) फार विरोध झाला होता. या सभेला बाटल्या लोकांची सभा म्हणून उद्देशित केले गेले. विशेषत: जी मंडळी स्वतःला या वर्गाचे हितचिंतक आणि उद्धारक म्हणून मिरवायचे त्यांनी मात्र या सभेपासून स्वतःला दूर ठेवले.
माणगाव परिषदेत नेमकं काय झालं?
परिषदेच्या पहिल्या दिवशी बाबासाहेबांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलं. त्यानंतर आपल्या भाषणात मांडणी करताना त्यांनी सामाजिक संरचना कशा स्वरूपाची आहे, याची मांडणी केली. या भाषणात बाबासाहेब म्हणतात, “सर्वाज जन्माने श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो. दुसरा वर्ग, ज्याची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे, असा जो वर्ग, तो ब्राह्मणेतर वर्ग. तिसरा जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो वर्ग तो आपला बहिष्कृत वर्ग होय.” बाबासाहेब पुढे म्हणतात, “ब्राह्मणेतर जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही. म्हणून ते आज मागे राहिले आहेत. तरीपण विद्या व द्रव्य मिळवण्याचे मार्ग मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांच्या जवळ आज नसतील, तरी त्यांना ती उद्या मिळणार आहेत. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे.” या सभेत बाबासाहेब जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यावर ताशेरे ओढतात. दुसऱ्या दिवशी शाहू महाराज बोधगयाहून परत येऊन या सभेला संबोधित करतात. शाहू महाराज आपल्या भाषणात बाबासाहेबांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देतात आणि बाबासाहेब हे कसे समस्त मागासवर्ग समूहाचा विचार करतात, याबद्दल आनंद व्यक्त करतात. तसंच, नेतृत्वाबद्दल शिवतकर मास्तरांना लिहिलेल्या पत्रातील सार ते या भाषणात पुन्हा मांडताना दिसतात. शाहू महाराज पुढे आपल्या भाषणात म्हणतात की, “आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहोचण्याचे कारण, आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवतात. पशू-पक्षीदेखील आपल्या जातीचा पुढारी करतात. पक्ष्यांत कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीच पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरं यांत मात्र धनगर पुढारी असतो. त्यामुळे त्यांना शेवटी कसाबखान्यात जावे लागते.” माणगाव परिषदेतल्या शाहू महाराजांच्या भाषणाचे मुद्दे पाहिल्यास आपल्याला लक्षात येतं की, वर्षभरापूर्वी शिवतकर मास्तरांना पत्रात त्यांनी नेतृत्वाबद्दल लिहिलं होतं, तेच त्यांनी इथं मांडलं. याचा अर्थ बहिष्कृत वर्गातून नेतृत्व उभं राहावं, याचा विचार त्यांच्या डोक्यात प्रदीर्घ काळापासून होता. याही पुढे जाऊन शाहू महाराज म्हणतात की, “मी लवकरच सेल्फ गव्हर्नमेंट थोड्या प्रमाणावर देणार आहे. त्याचा फायदा सर्वाना व विशेषत: अस्पृश्य मानलेल्यांना मिळावा म्हणून मी रिप्रेझेंटेशनही देणार आहे.” या परिषेदेत एकूण 15 ठराव संमत केले गेले. विशेष म्हणजे शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा व्हावा, असाही ठराव इथं मांडला गेला.
माणगाव परिषदेनं काय साध्य केलं?
जे बाबासाहेब आंबेडकर केवळ बॉम्बे प्रांतातील सत्यशोधक आणि बहिष्कृत वर्गामधील शिक्षित वर्गापुरते परिचयाचे होते, ते माणगाव परिषदेनंतर दक्षिणेकडेही प्रसिद्ध होऊ लागले. शिवाय, ते केवळ शिक्षित व्यक्ती म्हणूनच नव्हे, तर सामाजिक भान असलेले नेते म्हणून मान्यता पावलेले नेतृत्व म्हणून पुढे आले. पुढे माणगाव परिषदेच्या 19 वर्षांनी म्हणजे 1939 साली कोल्हापुरात काँग्रेस प्रजा परिषद भरली होती. या काँग्रेस प्रजा परिषदेचा शाहू महाराजांना काही कारणास्तव विरोध होता. त्याचा उल्लेख बाबासाहेब असा करतात की, “प्रजा परिषदेचा हेतू प्रजेचे कल्याण करणे हा नसून कोल्हापूरकरांचा द्वेष करणे हा होता.” या प्रजा परिषदेला उत्तर देण्यासाठी बाबासाहेबांनी कोल्हापुरातच 30 सप्टेंबर 1939 रोजी परिषद भरवली. त्यात ते म्हणाले, “माझ्या सार्वजनिक आयुष्याचा श्रीगणेशा कै. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या माणगावच्या परिषेदत मी गिरवला होता. त्यांना आणि मला प्रिय असलेल्या समतेच्या प्रचारसाठी रुपये 2500 देऊन त्यांनी मला सदैव ऋणी केले.” याचच अर्थ, त्यांनी केवळ बाबासाहेबांना सार्वजनिक आयुष्यमध्ये पुढे केले नाही, तर त्यांना लागणारे आर्थिक बळसुद्धा पुरवले. माणगाव परिषदेचा असाही एक परिणाम झाला की, ही परिषद आयोजित करणाऱ्या अप्पासाहेब पाटलांना त्यांच्या समाजानं कायमचं बहिष्कृत केलं होतं. या परिषदेत शाहू महाराजांच्या आवाहनानुसार अनेक लोकांनी त्यांचे जातीआधारित व्यवसाय सोडले होते. मात्र, त्याचा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मकही झाला. कारण जातीआधारित व्यवसाय सोडल्यानं त्यांना बहिष्काराला सामोरं जावं लागलं. तिसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे मराठा समाजातील पुरोगामी मंडळी आधी सत्यशोधक चळवळीशी जोडली गेली होती, ती मोठ्या प्रमाणात या आंदोलनाशीही जोडली जाऊ लागली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित असलेलं नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपानं मिळालं! आता आपण अशा दोन परिषदांकडे येऊ, ज्यांची माहिती फारशी कुणाला असलेली दिसत नाही किंवा त्यांचा उल्लेख फारसा कुठे होताना दिसत नाही.
बाबासाहेब शाहूंना म्हणतात, आम्ही तुमचे लेकरे नव्हेत काय
माणगावची परिषद ही बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये सामाजिक जीवनाची पायाभरणी होती. त्यापाठोपाठ 30 मे आणि एक जून, 1920 ला दुसरी परिषद नागपूरला शाहू महाराजांच्या अध्यक्षेत भरवण्यात आली. ही परिषदसुद्धा अनेक अंगांनी फार महत्त्वाची होती. नागपूर हे मध्य भारतात वसलेलं शहर. खरंतर नागपूर हा बाबासाहेबांच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेरचा भाग. या भागात किसन फागुजी बनसोड आणि विठ्ठल रामजी शिंदे यांचा बराच प्रभाव होता. नागपूरची ही परिषद होण्यापूर्वीच शाहू महाराजांच्या कन्या आजारी पडल्या. त्यामुळे शाहू महाराज उपस्थित राहू शकणार नाहीत, असा संदेश बाबासाहेबांना पाठवण्यात आला. ही परिषद होणार की नाही, याची काळजी सर्वांना होऊ लागली. विशेषत: बाबासाहेबांना अधिकच काळजी होऊ लागली होती. चळवळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मध्य भारतातील ही फार महत्त्वाची घटना ठरणार होती. त्यामुळे शाहू महाराजच येणार नसतील, तर सभा कशी होणार? असं एकूण संकट या सभेवर येऊन ठेपलं होतं. शाहू महाराज येऊ शकणार नसल्याचं कळल्यावर बाबासाहेबांनी त्यांना पत्र लिहिलं. पत्रात ते लिहितात, “नागपूरच्या परिषेदेस हुजुरचे येणे झाले नाही, तर आमचा सर्वनाश होणार, यात तीळमात्र शंका नाही. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार किंवा टेकू मिळाला नाही तर काय उपयोग? अक्कासाहेबांची तब्येत नादुरुस्त आहे, याबाबद्दल मला फार वाईट वाटत आहे. घरी अपत्य आजारी असता आपल्यावर सभेस गळ घालणे हे कठोरपणचे लक्षण आहे, असं मला वाटते. पण काय करावे? अक्कासाहेबाप्रमाणे आम्ही लेकरे नव्हेत काय? आपल्याशिवाय आमचा कोणी वाली आहे काय? आणि आम्ही आज किती काळापासून आजारी आहोत, हे आपल्याला सांगायला नको. मला वाटते आमचा परामर्श यावेळी आपण घेतलाच पाहिजे. नाहीतर आपल्यावर बोल नाही, रुसवा राहील. म्हणून माझी सविनय प्रार्थना आहे की, अन्य सर्व गोष्टींकडे कानाडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान आपण मंडीत करून या आपल्या लडिवळ अस्पृश्य लेकास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर त्याची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना काढणं अशक्य होईल.” बाबासाहेबांच्या या पत्राला शाहू महाराजांनी उत्तर दिलं आणि उत्तरात त्यांनी आश्वस्त केलं की, मुलीची प्रकृती ठीक नसली, तरीही नागपूरच्या परिषदेला हजर राहू. या परिषदेच्या उपस्थितांच्या नावांवर लक्ष टाकल्यास दिसतं की, अस्पृश्य समाजातील मंडळींनीच आयोजन केलं होतं. तसंच, सत्यशोधक समाजातील मंडळीही हजर होती. विशेष म्हणजे, नागपूरचे भोसले घराणे हे शाहू महाराज यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले नव्हते. अशी माहिती सत्यशोधक चळवळीचे नेते बाबुराव यांनी नमूद करून ठेवलीय. या बाबुराव यांनीच मराठा समाजाला आवाहन केलं होतं की, अस्पृश्य वर्गाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. मूकनायकनं त्यावेळी वृत्तांकनानुसार, नागपूरच्या परिषदेतही शाहू महाराज पुन्हा नेतृत्वाबद्दल भाष्य करतात. नागपुरात शाहू महाराज म्हणाले होते, “वास्तविक बघता मी कोणाचा पुढारी नाही; व पुढारी होऊही इच्छित नाही. मला पुढारी समजून माझ्या मागे कोणी येऊ लागल्यास त्यास आपण माझ्या मागे येऊ नका, असे नम्रतापूर्वक सांगतो.” याचाच अर्थ की, शिवतकर मास्तरांसोबतचा पत्रसंवाद, त्यानंतर माणगाव परिषद आणि आता नागपूर परिषदेतही शाहू नेतृत्व उभारणीवरच भर देताना दिसतात आणि त्यासाठी आग्रहीसुद्धा दिसतात. नागपूरच्या या परिषदेत शिवराम कांबळा, रा. बर्वे, शिवतकर यांचीही भाषणं झाली. चळवळ उभी राहावी म्हणून बॅरिस्टर बक यांनी निधी उभारण्याचं आवाहन केल्यानंतर शाहू महाराज यांनी 5,000 रुपये आणि कालिचरन यांनी 1 हजार रुपये देणगी दिली.
बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाचा उदय
नागपूरच्या परिषदेत अस्पृश्य समाजाच्या राजकीय वाटचालीसंदर्भात महत्त्वाची भाषणं झाली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेचा विरोध करण्यात आला. कारण शिंदेंच्या मते, डिप्रेस क्लासमधून उमेदवार निवडावे. मात्र, शिंदेंची ही मांडणी नागपूर परिषदेत खोडून काढण्यात आली आणि शिंदेंच्या डिप्रेस क्लास मिशनवर अविश्वास दाखवण्यात आला. आमची मंडळी आम्हीच निवडणार हा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे शिंदेंचा प्रभाव कमी करण्यात फार मोठं काम या परिषदेनं केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मध्य भारतातात पोहोचलं. या परिषदेनंतर ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य वर्गातील नेते मंडळींनी विठ्ठल रामजी शिंदे आणि काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली. महत्त्वाचं म्हणजे, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेलं काम या परिषेदेत पूर्ण झाल्याचं निदर्शनास येतं. नागपूरची परिषदेमुळे विठ्ठल रामजी शिंदेंच्या प्रभावाचा काहीसा अस्त होऊन, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. आता आपण तिसऱ्या परिषदेकडे म्हणजे दिल्लीतल्या परिषदेकडे येऊ. ही परिषद बॉम्बे प्रांताच्या बाहेर होतीच, मात्र उत्तर भारताच्या केंद्रस्थानी होती.
शाहू म्हणतात, लोकांनो, आंबेडकर तुमचे नेते आहेत
तिसरी परिषद 16 फेब्रुवारी 1922 रोजी दिल्लीत भरली होती. अनेकांना माणगाव आणि नागपूरला झालेल्या परिषदेबद्दल माहिती असते. मात्र, दिल्लीच्या परिषदेबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतात. ज्या मंडळींनी नागपूर परिषद आयोजित केली होती, त्यांनीच दिल्लीतली परिषद आयोजित केली होती. दक्षिण प्रांतात (माणगाव), मध्य प्रांतात (नागपूर) आणि आता उत्तर भारतात (दिल्ली) असंही या परिषदेचं आयोजन होतं. दिल्लीतल्या या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र उपस्थित राहू शकले नव्हते. ते शिक्षणासाठी लंडनला होते. त्यांच्या अनुपस्थित या सभेला शाहू महाराजांनी अध्यक्षस्थान भूषविलं. दिल्लीतल्या या परिषदेत शाहू महाराज दोन गोष्टी प्रामुख्यानं मांडताना दिसतात. एक म्हणजे ते बाबासाहेबांबद्दल सांगतात की, आंबेडकर हे शिक्षण घेत आहेत आणि माझ्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहेत. दुसरे म्हणजे शाहू महाराज उत्तर भारतातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना उद्देशून सांगतात की, तुम्ही बाबासाहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एकूणच या तिन्ही परिषदा पाहिल्यास असं लक्षात येतं की, राजर्षी शाहू महाराज हे स्वतंत्र आंदोलन आणि नेतृत्व उभारणीसाठी अत्यंत आग्रही होते. दुसरं म्हणजे बाबासाहेब या परिषेदेनंतर बहिष्कृत समजल्या जाणाऱ्या वर्गाचे राष्ट्रीय नेते म्हणून उदयाला आले. पुढेही बाबासाहेब लंडनला शिकायला असताना आणि शाहू महाराज त्यांच्या शेवटच्या काळातापर्यंत, चळवळीत कुठेच खंड पडू देताना दिसत नाहीत. शिवाय, आंबेडकर तुमचे नेते आहेत हे लोकांनाही सांगायलाही शाहू विसरले नाहीत.