वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघः गजानन कीर्तिकर विरुद्ध अमोल कीर्तिकर संघर्ष पाहायला मिळणार का?

रविवार, 10 मार्च 2024 (10:41 IST)
मुंबई वायव्य किंवा मुंबई उत्तर पश्चिम नावाने ओळखला जाणारा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून विशेषतः सुनील दत्त यांचं युग संपल्यानंतर शिवसेना-भाजपाचा गड झाला आहे. असं असलं तरी आजवरच्या इतिहासाकडे पाहाता इथल्या मतदारांनी दोन्ही बाजूंना संधी दिल्याचं लक्षात येतं.
 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गजानन कीर्तिकर हे सध्या शिंदे गटात आहेत. तेव्हा थेट पिता-पुत्रामध्येच निवणुकीचा संघर्ष पाहायला मिळणार का याबाबत आता चर्चा रंगली आहे.
 
अद्याप शिंदे गट-भाजप-अजित पवार गटाकडून उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे नेमकं काय होईल याचा अंदाज याच क्षणी घेणं कठीण आहे पण तत्पूर्वी आपण या मतदारसंघाची रचना कशी आहे आणि येथील राजकीय समीकरण कसं आहे हे पाहू.
 
या मतदारसंघाची रचना पाहायला गेलं तर यामध्ये मुंबईच्या पश्चिमेचे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम असे हे सहा मतदारसंघ आहेत.
 
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर, दिंडोशीमध्ये सेनेचेच सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके विजयी झाले होते.
 
रमेश लटके यांचं परदेशात निधन झाल्यानंतर त्याजागी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी ऋजुता लटके या विजयी झाल्या. सध्या हे तिन्ही आमदार शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत.
 
उर्वरित गोरेगाव आणि वर्सोवा, अंधेरी पश्चिम या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी झाले.
 
गोरेगावमध्ये 2014 पासून भाजपाच्या विद्या ठाकूर आणि वर्सोव्यातून भाजपाच्या भारती लवेकर 2014 पासून विजयी होत आहेत. अंधेरी पश्चिममध्ये भाजपाचे अमित साटम विजयी झाले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये हा भाग मोठ्या बदलाच्या आणि पायाभूत प्रकल्पांच्या टप्प्यातून जात आहे. मेट्रो तसेच नवे रस्ते, पूल, उड्डाणपुल असे प्रकल्प मुंबईत सुरू आहेत.
 
वर्सोवा आणि आसपास असणाऱ्या मच्छिमार वस्ती, कोळीवाडे यांच्याही विकासाचा प्रश्न आणि कोळी बांधवांचे प्रश्न अधूनमधून चर्चेत येत असतात.
 
आतापर्यंत काय झालं?
मुंबई वायव्य मतदारसंघामध्ये आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी शिवसेना भाजप आणि काँग्रेस आघाडी अशा दोन्ही बाजूंना कौल दिलेला दिसतो.
 
1967 साली काँग्रेसचे शांतीलाल शहा आणि 1971 साली काँग्रेसचेच हरी रामचंद्र गोखले विजयी झाले होते. मात्र आणीबाणीनंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाची लाट आली होती. त्यावेळेस जनता पक्षाकडून राम जेठमलानी यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
 
1980 साली इंदिरा गांधी यांनी जोरदार पुनरागमन केलं असलं तरी या मतदारसंघात जेठमलानी यांच्याच पारड्यात लोकांनी आपलं दान टाकलं.
 
1984 साली इंदिरा गांधी यांच्याहत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मोठी लाट देशभरात होती.
यावेळेस काँग्रेसने या मतदारसंघात अभिनेते सुनील दत्त यांना संधी दिली. 1984 साली दत्त या मतदारसंघातून लोकसभेत गेले आणि त्यांनी हीच किमया 1989 आणि 1991 साली साधली.
 
परंतु 1996 साली शिवसेनेचे मधुकर सरपोतदार इथून विजयी झाले. 1998 सालीही सरपोतदार यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.
 
1999 च्या निवडणुकीत र सरपोतदार यांना पराभूत करण्यात दत्त यशस्वी झाले आणि ते चौथ्यांदा खासदार झाले.
 
2004 साली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत आले असतानाही त्यांना ही संधी मिळाली ते केंद्रात मंत्रीही झाले. मात्र पुढच्याच वर्षी त्यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक घ्यावी लागली.
 
या पोटनिवडणुकीत दत्त यांची कन्या प्रिया दत्त विजयी झाल्या. 2009 साली काँग्रेसच्या बाजूने मतदारांचा कल असताना दत्त यांनी आपला मतदारसंघ बदलला. तेव्हा या मतदारसंघात गुरुदास कामत यांचा विजय झाला. तर प्रिया दत्त मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात विजयी झाल्या.
 
2019 साली काय झालं?
2014 साली मोदी लाटेत या मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर विजयी झाले. 2019 सालीही कीर्तिकर यांना पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.
 
2014 साली त्यांनी गुरुदास कामत यांना पराभूत केलं होतं तर 2019 साली त्यांनी संजय निरुपम यांना पराभूत केलं. आता कीर्तिकर शिवसेनेच्या शिंदेगटात आहेत.
 
पुढे काय? या निवडणुकीत कोणते घटक महत्त्वाचे ?
गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटपावरुन शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये अद्याप बोलणी झालेली नाहीत. त्यातच कीर्तिकर यांनी जागावाटपावर आपल्याला काहीच सांगितलं जात नाही, आपलं मत विचारलं जात नाही अशी जाहीर खंत व्यक्त केली आहे.
 
शिंदे गटाच्या वाट्याला फक्त 12 जागा येणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यावर कीर्तिकर यांनी आम्ही भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाहीत असं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
 
या निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला मुंबईतील जागा कमी येतील अशा चर्चा झाल्यामुळे ही अस्वस्थता दिसून येत आहे.
 
खासदार गजानन किर्तीकर यांनी पुढील राजकीय प्रवासासाठी उद्धव ठाकरेंचा हात सोडून एकनाथ शिंदेंचा हात पकडला असला, तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहिले आहेत.
अमोल कीर्तिकर हे युवासेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते आहेत.
 
त्यामुळे येत्या जागावाटपामध्ये ही जागा शिंदे गटाकडे राहाते की भाजपाकडे हे महत्त्वाचं असेल.
 
तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्राथमिक चर्चांच्या फेऱ्या अजून सुरू झालेल्या नाहीत. परंपरेप्रमाणे काँग्रेसकडेच हा मतदारसंघ आला तर काँग्रेस कोणाला संधी देते हे पाहाणं गरजेचं आहे.
 
गुरुदास कामत आता हयात नाहीत, प्रिया दत्त उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढतात. मुंबईतले माजी खासदार मिलिंद देवरा पक्ष सोडून शिंदे गटात जाऊन राज्यसभेत गेले आहेत.
 
बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी पक्ष सोडला नसला तरी पक्षावर थेट टीका सुरू केली आहे.
 
अशा स्थितीमध्ये काँग्रेस कोणत्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहावं लागेल.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती