गुजरात आणि देशात भाजपाचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. याचपार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मॅच फिक्सिंगचा आरोप करत भाजपावर ट्विटरच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे.
लोकशाही कशी धोक्यात आहे याची क्रोनोलॉजी समजून घ्या, असे म्हणत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुरतमध्ये काँग्रेसचे पहिले उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर सुरतमधून काँग्रेसच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला.
यानंतर भाजपा उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले (की मागे घेण्यास भाग पाडले गेलं?) आणि मग सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोग वारंवार सांगतो की, सर्वांना समान संधी आणि न्याय मिळाला पाहिजे, परंतु तेदेखील सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले झाले आहेत. अन्यथा ही परिस्थिती उद्भवली नसती, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.