भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे जनक आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप (९१) यांचे सोमवारी रात्री नऊ वाजता पुण्यात निधन झाले आहे. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून डॉ. गोविंद स्वरुप यांना मानले जायचे. अशक्तपणा आणि इतर आजारामुळे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
अलाहाबाद मधून १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स पदवी संपादन करुन डॉ. स्वरुप यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आर. ओ. येथे खगोलशास्त्रविषयक कार्य सुरु केले. सिडनी जवळच्या पॉट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या Parabolic अँटेना उभारण्यात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. डॉ. गोविंद स्वरुप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातली पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबईजवळच्या कल्याणमध्ये उभारण्यात आली.