विशाल जहाजांसह आकाशात उडणार्या विमानांना स्वतःकडे ओढून जलसमधी देणार्या अटलांटिक महासागरातील बर्मुडा ट्रँगल सगळ्यांनाच माहीत असेल. असाच एक रहस्यमयी त्रिकोण जपाननजीकच्या प्रशांत महासागरातही आहे. या भागाला ड्रॅगन्स ट्रँगल किंवा मग डेविल्स सी या नावाने ओळखले जाते. बर्मुडा ट्रँगलप्रमाणेच या भागातही अनेक विमाने व जहाजे गायब झाले आहेत. त्यानंतर ड्रॅगन्स ट्रँगलसंबंधी अनेक प्रकारच्या कहाण्या प्रचलित झाल्या. हा परिसर किती मोठा आहे यावर तज्ज्ञांमध्ये एकमत नाहीच, पण तिथे जहाजे गायब होण्यामागच्या कारणांचाही आजवर उलगडा होऊ शकलेला नाही. 1952-54 दरम्यान या परिसरात जपानची पाच लष्करी जहाजे गडप झाली होती. त्यात 700हून अधिक लोकांना प्राणास मुकावे लागले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी जपान सरकारने शंभर शास्त्राज्ञांचे एक पथक पाठविले होते, पण त्यांचेही जहाज ड्रॅगन्स ट्रँगलने गिळंकृत केले होते. तेव्हापासून हा भाग धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी तिथे हजारोमच्छिारांच्या नावाही गायब होत होत्या. 1989मध्ये चाल्स बेरलिट्स यांनी या भागाचे अध्ययन करून द ड्रॅगन्स ट्रँगल हे पुस्तक लिहिले आहे. लॅरी कुशचे यांनीही तिथे संशोधन केले असून समुद्रात ज्वालामुखीच्या स्फोटामुळे तिथे जहाजे गायब झाली असावीत, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. मात्र गायब झालेली विमाने व जहाजे कुठे गेली हे आजवर समजू शकलेले नाही.