महाराष्‍ट्रातील एक्झिट पोल

लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यातील मतदान संपल्‍यानंतर कॉंग्रेस व भाजप आघाडीने राज्यातील 48 जागां संदर्भातील निवडणूक निकाल पूर्व अंदाज जाहीर केले असून दोन्‍ही पक्षांनी कमी अधिक फरकाने आपल्‍याला सर्वाधिक जागा मिळण्‍याचा दावा केला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपने आपल्‍याला 27 जागा मिळण्‍याचा दावा केला आहे. तर कॉंग्रेसने 26 जागांवर आपण विजयी होऊ असा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम समजल्‍या जाणा-या निवडणुकीच्‍या निकालावरून राज्यातील पुढील निवडणुकांचे चित्र स्‍पष्‍ट होणार असल्‍याने त्‍या संदर्भात मतदारांसह राजकीय पक्षांमध्‍येही मोठी उत्सुकता आहे. शेवटच्‍या टप्‍प्‍यातील निवडणुका झाल्‍यानंतर भाजप व कॉंगेसने आपापले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. भाजपच्‍या एक्झिट पोलनुसार भाजप- 14 जागांवर तर शिवसेना 13 जागांवर विजयी होण्‍याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसला 11 व राष्‍ट्रवादी व आरपीआय आघाडीला 10 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्‍यात आला आहे.

तर कॉंग्रेसने जाहीर केलेल्‍या एक्झिट पोलनुसार राज्‍यातील 48 पैकी 13 जागांवर पक्षाला तर 13 जागांवर आघाडीतील महत्‍वाचा घटक पक्ष समजल्‍या जाणा-या राष्‍ट्रवादी-रिपाई आघाडीला 13 जागा मिळण्‍याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमध्‍ये भाजपला 12 आणि शिवसेनेला 10 जागा मिळतील अशी शक्यता वर्तविली आहे.

यावेळच्‍या निवडणुकामध्‍ये मतदानाची टक्‍केवारी कमी असल्‍याने कमी झालेले मतदान कुणाच्‍या पथ्‍यावर पडते याबद्दलही उत्सुकता आहेच.
मतदानाचा शेवटचा टप्‍पा पार पडल्‍यानंतर आता आगामी 16 मे रोजी होणा-या मतमोजणीनंतर खरे चित्र स्‍पष्‍ट होणार असले तरीही जर या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीला राज्यातून अधिक जागा मिळविता आल्‍या तर विधानसभेच्‍या मध्‍यावधी निवडणुका घेतल्‍या जाण्‍याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा