मतदानाचा अंतिम टप्पा बुधवारी

गेला महिनाभर सुरू असलेल्या लोकसभेच्या रणसंग्रामाचा अखेरचा अध्याय बुधवारी सात राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशात पार पडणार आहे. ८६ जागांवरील १४३२ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी निश्चित होईल. यानंतर सोळा मेस पडदा वर होऊन दिल्लीच्या राजकीय मंचावर कोणाचे सरकार स्थापन होईल, हे स्पष्ट होईल.

दरम्यान, पाचव्या व अंतिम टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पाच लाख मतदान कर्मचारी व २५४ पर्यवेक्षक मतदान निर्वेधपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नरत रहातील.

या टप्प्यात एकूण ९३ महिला उमेदवार आहेत. दहा कोटी ७८ लाख मतदार आहेत. एक लाख २१ हजार ६३२ मतदार केंद्रे आहेत. एक लाख ८६ हजार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स आहेत.

पाचव्या टप्प्यात गृहमंत्री पी. चिदंबरम (शिवगंगा), पंचायती राज मंत्री मणिशंकर अय्यर (मयलादुतुरै) मेनका गांधी (आंवला) त्यांचे चिरंजीव वरुण गांधी (पीलीभीत), माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू (अमृतसर) माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन (मुरादाबाद), जयाप्रदा (रामपूर) हे प्रमुख उमेदवार भाग्य आजमावत आहेत.

या टप्प्यात हिमाचल प्रदेशातील चार, जम्मू- काश्मीरमधील दोन, पंजाबच्या नऊ, तमिळनाडूतील सर्व ३९, उत्तर प्रदेशातील १४, उत्तराखंडातील पाच, पश्चिम बंगालमधील ११, चंडीगड व पुदुच्चेरीतील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल.

वेबदुनिया वर वाचा