तिसर्‍या आघाडीची भूमिका महत्त्वाची-बर्धन

लोकसभा निवडणुकीनंतर तिसरी आघाडी महत्त्वाच्या भूमिकेत असेल असे भाकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. बी. बर्धन यांनी वर्तवले आहे. त्याचवेळी सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसला पाठिंबा दिला जाणार नाही, हेही त्यांनी निक्षून सांगितले आहे.

निवडणुकीनंतर आमची ताकद सगळ्यांना कळून येईलच. शिवाय राष्ट्रपतींनीही सत्ता स्थापनेसाठी आम्हाला संधी द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तिसरी आघाडी एकजूट असून तेलंगाणा राष्ट्र समिती राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याने काहीही फरक पडत नाही, असा दावाही त्यांनी केला.

जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची काल भेट घेतली होती. त्याविषयी विचारले असता, कुमारस्वामी तिसर्‍या आघाडीबरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा