राज्यातील मतमोजणीची तयारी पूर्ण

बुधवार, 22 मे 2019 (17:36 IST)
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. आता उद्या दुपारी राज्यातील कल येण्यास सुरुवात होईल आणि संध्याकाळी ४ पर्यंत निकाल येतील, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
राज्यात चार टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत एकूण ९८,४३० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर करण्यात आला.  राज्यातील ३८ ठिकाणी ४८ केंद्रावर मतमोजणी होईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत राज्यातील कल हाती येण्यास सुरुवात होतील आणि संध्याकाळी ४ पर्यंत निकाल येतील, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. राज्यातील एवढ्या जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल असे चार टप्प्यांत मतदान झाले. राज्यांत ८६७ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात गेल्या २०१४ मधील निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी किचिंत अधिक म्हणजे ६०.८० टक्के मतदानाची नोंद झाली.
 
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालघर आणि भिंवडीत मतमोजणीच्या सर्वाधिक प्रत्येकी ३५ फेऱ्या होतील. त्यानंतर भंडारा- गोंदियात ३३ आणि बीड, शिरुरमध्ये ३२ फेऱ्यांत मतमोजणी होईल. हातकणंगलेत सर्वात कमी १७ फेऱ्या होतील. अमरावती आणि सांगलीत प्रत्येकी १८ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती