एक्झिट पोलमुळे कर्नाटकात राजकीय नाट्याला सुरुवात

बुधवार, 22 मे 2019 (15:43 IST)
लोकसभा निवडणुकीच्या निकालाअगोदरच कर्नाटकात राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांचे सरकार संकटात येण्याची चिन्हे आहेत. या बदलत्या राजकीय घडामोडी पाहता कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामींनी त्यांचा दिल्ली दौराच रद्द केला आहे.
 
मतदानादरम्यान इव्हीएममध्ये गडबड झाल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचे नेते निवडणूक आयोगाबरोबर बैठक करणार होते. ज्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी दिल्लीला जाणार होते. मात्र, कर्नाटकातील बिघडलेली राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी बंगळुरूत राहणेच पसंत केल्याचे दिसत आहे. तर, कर्नाटकात काही सत्ताधारी नेत्यांकडूनच बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस महासचिव व कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. एका एक्झिट पोलनुसार कर्नाटकात भाजपला 28 जागांपैकी 21 ते 25 जागामिळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर, काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या पदरात केवळ 3 ते 6 जागा येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पाहणीनुसार राज्यात भाजपला 49 टक्के मते मिळतील व काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती