शाओमी कंपनीने मी बनी चिल्ड्रन फोनवॉच 2 सी बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली असून नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल खास मुलांसाठी विकसित करण्यात आले आहे. शाओमीने आधीच मी बनी चिल्ड्रन फोनवॉच बाजारपेठेत सादर केले असून याचीच दुसरी आवृत्ती आता लॉन्च करण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच असून यामध्ये कॉलिंग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील सर्वात लक्षणीय फीचर म्हणजे यात जीपीएस हे इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यामुळे हे वॉच वापरणारे बालक कुठेही गेले तरी त्याचे अचूक लोकेशन त्याच्या पालकांना कळू शकते. सुरक्षेसाठी हे फीचर अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे ते अगदी पाण्यातदेखील सहजपणे वापरता येते. यामध्ये गोलाकार पीएओएलईडी डिस्प्ले देण्यात आलेला असून हे मॉडेल स्काय ब्ल्यू आणि ऑरेंज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
शाओमीच्या मी बनी चिल्ड्रन फोन वॉच 2 सी या मॉडेलमध्ये नॅनो सीमकार्ड टाकण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने कॉल करता येतील. तसेच याचा वापर करून व्हाईस मॅसेजदेखील पाठवता येणार आहेत. यामध्ये संबंधित यूजर आपल्या पालकांच्या क्रमांकासह एकूण 10 मोबाइल क्रमांक सेव्ह करून ठेवू शकतो. त्यांना आपत्कालीन अवस्थेत संदेश पाठविण्याची सुविधा यात करण्यात आली आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यू-टूथ आणि वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे. यात 300 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये सादर करण्यात आले आहे. नंतर याला भारतासह अन्य देशांमध्ये सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.