FaceApp: फेसअॅप द्वारे एका झटक्यात म्हातारं दिसण्याची हौस पडू शकते महागात?

- क्रिस बरानिउक
भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. आपल्या नोकरीचं, लग्नाचं, आरोग्याचं भाकित दररोज पेपरांमधून जाणून घेणाऱ्यांमध्ये कदाचित तुम्ही-आम्हीही असू.
 
या संकल्पनेचा एक अद्ययावत अवतार सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. नाव आहे फेसअॅप आणि त्यातून तुम्ही भविष्यात कसे दिसाल, याचं अगदी भरवसा करता येणारं चित्र दिसतं.
 
लाखो लोक या अॅपवर आपले फोटो अपलोड करत आहेत, आणि त्यावर मग त्यांचा म्हातारा किंवा तरुण अवतार तयार होतो. असे लाखो फोटो सामान्यांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
 
गेल्या काही दिवसांमध्ये हे फेस-एडिटिंग टूल व्हायरल झालेलं असलं तरी काहींनी या अॅपच्या सुरक्षिततेविषयी, आणि अॅप घालत असलेल्या अटी-शर्थींविषयी शंका उपस्थित केल्या आहे.
 
युजर्सच्या डेटाबाबत कंपनी काळजी घेत नसल्याचा आरोप होतोय. तर यापैकी बहुतेक इमेजेस या अपलोड केल्याच्या 48 तासांमध्ये सर्व्हरमधून डिलीट करण्यात येत असल्याचं फेसअॅपने एका निवेदनामध्ये म्हटलं आहे.
 
शिवाय युजर्सनी एडिटिंगसाठी निवडलेलेच फोटो अपलोड करण्यात येत असून फोनमधल्या गॅलरीतले इतर दुसरे फोटो सर्व्हरवर अपलोड होत नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
 
फेसअॅप (FaceApp) काय आहे?
फेसअॅप खरंतर नवीन नाही. दोन वर्षांपूर्वी हे अॅप पहिल्यांदा चर्चेत आलं होतं त्याच्या 'एथनिसिटी फिल्टर्स'मुळे.
 
आपण दुसऱ्या वंशाचे असतो तर कसे दिसलो असतो, हे या फिल्टरच्या माध्यमातून युजर्सना पाहता येत होतं. पण यावर टीका झाल्यानंतर हा फिल्टर काढून टाकण्यात आला.
 
पण हे अॅप तुमच्या मख्ख किंवा वैतागलेल्या चेहऱ्याचं रूपांतर हसऱ्या चेहऱ्यात करू शकतं आणि तुमचा मेक-अपही बदलू शकतं.
 
आर्टिफिशय इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने हे करण्यात येतं. एक अल्गोरिदम तुमच्या चेहऱ्याच्या तपशीलाची नोंद घेतं आणि उपलब्ध असणाऱ्या इतर फोटोंच्या मदतीने तुमच्या फोटोत बदल करतं.
 
म्हणूनच मग तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बदलून त्याजागी दात दाखवणारं हसू येऊ शकतं, किंवा जिवणीजवळच्या सुरकुत्या, हनुवटी आणि गालांवर 'नॅचरल लुक' मिळवता येतो.
 
अडचण काय?
फेसअॅप लोकांच्या स्मार्टफोन्समधले अनेक फोटो परवानगीशिवाय अपलोड करत असल्याचं ट्वीट जोशुआ नोझ्झा या अॅप डेव्हलपरने केल्यानंतर सगळ्यांनी भुवया उंचावल्या.
 
इलियट अल्डरसन या टोपणनावाने काम करणाऱ्या एका फ्रेंच सायबर सिक्युरिटी अभ्यासकाने नोझ्झी याच्या दाव्यांचा अभ्यास केला.
 
तेव्हा अशा प्रकारे भरमसाठ फोटो फेसअॅपवर अपलोड होत नसून युजर्सनी जे फोटो देण्याचा निर्णय घेतलेला आहे तेच फोटो फेसअॅप घेत असल्याचं त्यांना आढळलं. तर फेसअॅपनेही बीबीसीला हेच सांगितलं की युजर्स जे फोटो अपलोड करत आहेत, तेच जमा होत आहेत.
फेशियल रेकग्निशनचं काय?
फेसअॅप युजर्सनी दिलेल्या फोटोचा वापर फेशियल रेकग्निशनसाठीच्या अल्गोरिदमसाठी करेल, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.
 
आणि फोटोज डिलीट झाल्यानंतरही हे होऊ शकतं, कारण एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याची वैशिष्ट्यं, ठेवण यांचं मोजमाप घेतलं जातं, आणि त्याचा वापर फेशियल रेकग्निशनसाठीच्या अल्गोरिदमसाठी होऊ शकतो.
 
मात्र, "नाही, आम्ही फोटोजचा वापर फेशियल रेकग्निशन ट्रेनिंगसाठी करत नाही, फक्त फोटो एडिट करण्यासाठी करतो," फेसअॅपचे चीफ एक्झिक्युटिव्ह यारोस्लाव्ह गाँचरोव्ह यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
 
अजून काय?
गोष्टी इथेच संपत नाहीत. जेव्हा फोटोज स्मार्टफोनवरच प्रोसेस करून (एडिटिंग करून) अपलोड करणं शक्य असताना ते अॅपच्या क्लाऊड सर्व्हरकडे पाठवणं का गरजेच आहे, हा सर्वांत जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे.
 
युजर्सचे फोटोज स्टोअर करणारा फेसअॅपचा हा सर्व्हर अमेरिकेमध्ये आहे. तर फेसअॅपही रशियन कंपनी असून सेंट पीटर्सबर्गमध्ये त्यांचं ऑफिस आहे.
 
असं केल्याने फेसअॅपला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा काहीशी आघाडी मिळत असल्याचं जेन मँचुंग वाँग या सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टने ट्वीट केलं आहे. कारण असं केल्याने फेसअॅपसारखीच इतर अॅप्स डेव्हलप करणाऱ्यांना फेसअॅपचे अल्गोरिदम कसे काम करतात याची कल्पना येणार नाही.
 
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे स्टीवन मरडॉक याला दुजोरा देतात.
 
"फोनवरच हे फोटो प्रोसेस करणं प्रायव्हसीच्या दृष्टीने चांगलं असलं तरी कदाचित हा पर्याय काहीसा मंद ठरला असता. यामुळे मोबाईलची बॅटरी जास्त वापरली गेली असती, आणि फेसअॅपचं तंत्रज्ञान चोरलं जाणंही सोपं झालं असतं," बीबीसीला त्यांनी सांगितलं.
 
तर फेसअॅप या फोटोंचा वापर स्वतःच्या जाहिरातींसाठी आणि इतर व्यावसायिक गोष्टींसाठी करू शकतं, असं अॅपच्या टर्म्स अॅण्ड कंडिशन्स (अटी-शर्ती)मध्ये म्हटलं असल्याचं अमेरिकन वकील एलिझाबेथ पोट्स वेनस्टीन यांचं म्हणणं आहे.
 
पण हीच अट ट्विटरही घालत असल्याचं 'लाईफवायर' या टेक्नॉलॉजी वेबसाईटचे मुख्य संपादक लान्स उलानॉफ यांनी निदर्शनास आणून दिलंय.
 
युजर्सना हे माहीत आहे का?
काहींसाठी हे तर फक्त हिमनगाचं वर दिसणारं टोक आहे. काही युजर्सचा डेटा हा जाहिराती टार्गेट करण्यासाठी ट्रॅक करण्यात येण्याची शक्यता असल्याचं फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये म्हटलंय, असं प्रायव्हसी अॅडव्होकेट पॅट वॉल्श सांगतात.
 
यासोबतच युजर्सपर्यंत गुगल अॅड्स पोहोचवणाऱ्या गुगल अॅडमॉबची पेरणीही हे अॅप करतं. आणि हे "नेहमीच्या पद्धतीने करण्यात येत नसल्याचं" वॉल्श यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.
 
तर फेसअॅपची प्रायव्हसी पॉलिसी सर्वांसारखीच असल्याचं गाँचरोव्ह यांनी म्हटलंय. जाहिराती टार्गेट करण्यासठी कंपनी कोणताही डेटा शेअर करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
याऐवजी कंपनी प्रीमियम फीचर्ससाठीच्या फीमार्फत पैसे मिळवत असल्याचं ते सांगतात.
 
"फेसअॅपच्या अटी अशा आहेत की त्यामुळे कंपनीला युजर्सचे फोटो हवे तसे वापरण्याची मुभा मिळते. हे चिंताजनक असलं तरी असं नेहमीच केलं जातं," डॉ. मरडॉक म्हणतात.
 
"जवळपास कोणीही प्रायव्हसी पॉलिसी वाचत नाही, हे कंपन्यांना माहित असतं. म्हणून ते जास्तीत जास्त गोष्टी यामार्फत विचारून घेतात. कारण कदाचित त्यावेळी त्या परवानग्यांची गरज नसली तरी नंतर त्याचा फायदा होऊ शकतो."
 
फेसअॅपने आणखी काय सांगितलं?
गाँचरोव्ह यांनी कंपनीच्या तर्फे एक निवेदन प्रसिद्ध केलं ज्यामध्ये असं म्हटलं आहे की फेसअॅप फक्त युजर्सनी एडिट करण्यासाठी निवडलेले फोटोंचं अपलोड करतं आणि इतर कोणत्याही इमेजेस ट्रान्सफर करण्यात येत नाहीत.
 
"अपलोड करण्यात आलेला फोटो कदाचित आम्ही क्लाऊडमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो."
 
"युजरने तोच फोटो पुन्हा पुन्हा एडिट करण्यासाठी अपलोड करू नये म्हणून आम्ही असं करतो."
 
"बहुतेक फोटो अपलोड केल्यापासून 48 तासांमध्ये डिलीट केले जातात."
 
आपले फोटो डिलीट करावेत, अशी विनंती युजर्सनी केल्यास आपण ती स्वीकारत असल्याचं फेसअॅपने म्हटलं असलं तरी सध्या कंपनीची सपोर्ट टीम 'ओव्हरलोडेड' असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
फेसअॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन, सपोर्टमध्ये 'रिपोर्ट अ बग' मध्ये 'प्रायव्हसी' असं सब्जेक्टमध्ये लिहून हे करता येईल.
 
युजर्सचा हा डेटा रशियाला पाठवण्यात येत नसल्याचंही या निवेदनामध्ये म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती