आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भारतात नोकऱ्या जाऊ शकतात का? ही भीती किती खरी?
रविवार, 29 ऑक्टोबर 2023 (17:18 IST)
दिल्लीतील एका कायदा संस्थेमध्ये (लॉ फर्म) कायदेशीर सहाय्यक म्हणून काम करणारे 38 वर्षीय विजय (नाव बदलले आहे) हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल्स क्षणाचाही विलंब न लावता कायदेशीर भाषेत मजकूर कसा तयार करू शकतात, हे पाहून आश्चर्यचकित झाले.
बीबीसीचे सहयोगी पत्रकार आदर्श राठोड यांना त्यांनी सांगितलं की, "जेव्हा मी चॅट जीपीटी (ChatGPT) बद्दल ऐकलं, तेव्हा मी कार्यालयात गेलो आणि चॅट जीपीटीला वादी-प्रतिवादी यांची नावं, कायदेशीर कलम, संदर्भ आणि नुकसानीची रक्कम नमूद करून मानहानीची नोटीस लिहायला सांगितली."
“काही क्षणात माझ्यासमोर कायदेशीर नोटीस तयार होती. खरं सांगायचं तर त्याची भाषा आणि शैली माझ्यापेक्षाही चांगली होती.
“ते वाचून मला आनंदही झाला आणि थोडं अस्वस्थसुद्धा वाटलं."
सहा वर्षांपासून लंडनमधील एका मोठ्या सल्लागार कंपनीत काम करणा-या 34 वर्षीय क्लेअरलाही एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजस टूल्सचा असाच अनुभव आहे.
बीबीसी वर्कलाइफवर प्रकाशित झालेल्या लेखानुसार, 'क्लेअरला तिची नोकरी आवडते आणि तिला चांगला पगारही मिळतो, पण गेल्या सहा महिन्यांपासून तिला तिच्या करिअरच्या भविष्याची चिंता सतावू लागलेय.'
क्लेअर म्हणते, “सध्या कोणतंही एआय टूल माझ्या कामाच्या गुणवत्तेशी बरोबरी करू शकत नाही, परंतु चॅट जीपीटी ज्या वेगाने विकसित होतंय ही चिंतेची बाब आहे. काही वर्षांत असे चॅट बॉट्स माझ्यासारखं काम करू लागतील. तेव्हा माझ्या नोकरीचं काय होईल या विचारानेच मला भीती वाटते.”
चिंतेत वाढ
अलिकडच्या काळात रोबोट आणि एआयमुळे मानवी नोकर्या जाण्याशी संबंधित बातम्या वर्तमानापत्रांचे मथळे बनू लागल्यात.
या वर्षी जुलैमध्ये एक बातमी आलेली होती की, बंगळुरूच्या एका स्टार्टअपने त्यांच्या 90 टक्के कर्मचा-यांना नारळ देऊन त्याजागी एआय चॅट बॉट्सची वर्णी लावलेय.
या कंपनीचे संस्थापक सुमित शाह यांनी ट्वीट केलेलं की, ग्राहकांचा प्रतिसाद वाढलेला असला तरी खर्च 85 टक्क्यांनी कमी झालाय.
पहिलं ओपन एआय टूल चॅट जीपीटीने रातोरात वर्तमानपत्रांच्या मथळ्यांची जागा घेतली आणि आता अनेक कंपन्या विविध क्षेत्रांसाठी खास एआय टूल्स विकसित करताहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.
चॅट जीपीटी सारखी एआय साधने ज्या सहजतेने उपलब्ध झालेत, त्यामुळे अनेकांना प्रश्न पडू लागला आहे की भविष्यात अशा क्षमतेच्या लोकांसाठी नोकऱ्या शिल्लक राहतील की नाही?
एलिस मार्शल यांनी बीबीसी वर्कलाइफच्या लेखिका जोसी कॉक्सला सांगितलं: “मला वाटतं की बरेच क्रिएटिव्ह लोक काळजीत आहेत. आम्ही फक्त हीच आशा करू शकतो की ग्राहक आमचं मूल्य समजून घेतील आणि एआय साधनांपेक्षा माणसांना प्राधान्य देतील.”
एकोणतीस वर्षीय अॅलिस मार्शल या इंग्लंमधील ब्रिस्टल येथे कॉपी रायटर म्हणून काम करतात.
एआयपासून किती धोका आहे?
गोल्डमन सॅक्सने मार्चमध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता ज्यात म्हटले होते की AI भविष्यात 300 दशलक्ष नोकर्या काढून घेऊ शकते.
प्राइसवॉटरहाऊस कूपर्स (PwC) या जागतिक व्यावसायिक सेवा कंपनीने गेल्या वर्षी केलेल्या वार्षिक 'ग्लोबल वर्कफोर्स सर्व्हे'मध्ये असे आढळून आले की येत्या तीन वर्षांत तंत्रज्ञानामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती एक तृतीयांश लोकांना वाटत होती.
अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू), दिल्ली येथील वनशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक जोशी लोहानी म्हणतात की AI मुळे भारतात नोकऱ्या गमावल्याचा कोणताही पुरावा दिसत नाही.
आदर्श राठोड यांच्याशी बोलताना त्या म्हणतात की, “सध्याची परिस्थिती पाहता एआयमुळे नोकऱ्या जाणार असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. याचे कारण असे की एआय अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे आणि ते मानवांची जागा घेईल असे म्हणणे खूप मोठी गोष्ट आहे. होय, यामुळे ऑटोमेशनला गती मिळेल आणि काही नोकर्या कमी होऊ शकतात.
कॅरोलिन मॉन्ट्रोज न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात करिअर प्रशिक्षक आणि व्याख्याता आहेत. वेगवान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे होत असलेल्या बदलांची भीती वाटणे स्वाभाविक आहे, असे तिचे मत आहे.
बीबीसी वर्कलाइफमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, मॉन्ट्रोस म्हणतात, "एआयमुळे धोका वाटणे स्वाभाविक आहे कारण ते वेगाने चांगले होत आहे आणि त्याचा कुठे काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही."
परंतु ते असेही म्हणतात की याबद्दल काळजी करणे किंवा न करणे हे लोकांच्या नियंत्रणात आहे आणि काळजी करण्याऐवजी त्यांनी शिकण्यावर आणि त्यांच्या फायद्यासाठी वापरण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
एआयसोबत मैत्री करणं गरजेचं
पीडब्लूसी मधील 'ट्रस्ट अँड टेक्नॉलॉजी' या विषयाचे तज्ज्ञ स्कॉट लिकेन्स म्हणतात की, प्रगत होत जाणा-या तंत्रज्ञानामुळे कामाची प्रक्रिया स्वयंचलित आणि सुलभ करण्यात मदत झालेय आणि योग्य कौशल्याच्या मदतीने या बदलाशी जुळवून घेता येऊ शकतं.
जोसी कॉक्सशी बोलताना ते म्हणतात, “लोकांना तंत्रज्ञानाकडे आपला कल वाढवावा लागेल. कामाच्या गरजेनुसार त्यांनी एआयचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलं पाहिजे. यानिमित्ताने त्यांना एक नवीन कौशल्य देखील शिकता येईल. "एआयपासून दूर पळण्याऐवजी कर्मचार्यांनी ते स्वीकारण्यावर आणि शिकण्यावर भर दिला पाहिजे."
लिकेन्सच्या म्हणण्यानुसार, काही नवीन गोष्टींमुळे उद्योग क्षेत्रात बदल घडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, आपण वेळोवेळी त्या बदलांशी जुळवून घेण्याचे मार्ग शोधलेत.
अनेकदा काही लोकांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदाही झालाय.
कॅरोलिन मॉन्ट्रोज यांना वाटतं की, अलिकडच्या काळात झालेल्या प्रगतीतून ब-याच चांगल्या गोष्टी साध्य झाल्यात.
पुढे त्या म्हणतात, “तंत्रज्ञानातील बदलांनी समाजाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेय. एआय भविष्यातही अस्तित्वात असेल, ही चांगली गोष्ट आहे. पण जर लोकांनी ते शिकण्याऐवजी चिंता करत राहिले तर एआयमुळे जितकं नुकसान होणार नाही त्यापेक्षा ते स्वतःचं अधिक नुकसान करून घेतील.”
परिणाम कमी, चिंता जास्त'
तज्ज्ञ म्हणतात की, काही चिंता रास्त असू शकतात परंतु घाबरून जाण्यात अर्थ नाही.
काही संशोधनांचे निष्कर्ष असं सांगतात की, रोबोट्सद्वारे मानवी नोकर्या काढून घेतल्या जातील याची लोकांना जास्त धास्ती वाटते.
नोव्हेंबर 2012 मध्ये अमेरिकेतील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एरिक डहलीन यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आलं की रोबोट आणि एआय या दोन्हींमुळे लोकांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी नोकऱ्या गेल्या.
बीबीसी वर्कलाइफवर प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, त्यांच्या डेटावरून असं दिसून आलं की एकूण 14 टक्के लोकांना असं वाटलं की रोबोट त्यांच्या नोकऱ्या काढून घेतील परंतु वास्तविक परिस्थिती वेगळी आहे.
संशोधनादरम्यान दोन वर्गांशी संवाद साधण्यात आला. एक वर्ग अशा लोकांचा होता यांच्या नोकऱ्या रोबोट्समुळे गेल्यात आणि दुसरा वर्ग ज्यांच्या नोकऱ्या सुरक्षित होत्या.
नोकऱ्या गमावणा-यांचा अंदाज रोबोटमुळे प्रत्यक्षात गमावलेल्या नोकऱ्यांच्या संख्येपेक्षा तिप्पट होता. त्याचवेळी, नोकरी न गमावलेल्यांचा अंदाज देखील वास्तविक संख्येच्या दुप्पट होता.
प्राध्यापक डहलिन म्हणाले, "एखाद्या तंत्रज्ञानामध्ये अमुक गोष्टीसाठी वापरण्याची क्षमता आहे याचा अर्थ असा नाही की ते प्रत्यक्षात वापरलंच जाईल."
मानवी क्षमता
अर्न्स्ट अँड यंग (EY) सल्लागार कंपनीच्या पीपल अॅडव्हायझरी सर्व्हिसेस व्यवसायाच्या प्रमुख स्टेफनी कोलमन या जोसी कॉक्स यांच्याशी बोलताना म्हणाल्या की, भविष्यात मानव आणि रोबोट्स या दोघांचा मेळ साधणं गरजेचं आहे.
त्या म्हणतात, “मानवांसाठी नेहमी काही महत्त्वाची कामं अशी असतील जी रोबोट करू शकत नाहीत. अशा प्रकारच्या कामांदरम्यान, नातेसंबंध निर्माण करणं, भावना समजून घेणं आणि सर्जनशीलतेसारखे मानवी गुण आवश्यक असतात. कामाच्या बाबतीत माणसांचे हे गुण ओळखण्याची क्षमता मशीन्सकडे नसते.”
त्याचवेळी जेएनयूचे वनशास्त्र विभागाचे प्राध्यापक लोहानी जोशी म्हणतात की, घाबरून जाणं हा पर्याय नाही. आपल्या कामाची वाटणी करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी एआय तयार करण्यात आलंय. अशा परिस्थितीत अस्वस्थता किंवा भीती वाटल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल.
त्या म्हणतात, “भविष्यात एआयकडे सर्व काही सोपवलं जाण्याची शक्यता कमी आहे. पण जर एखाद्याला नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात असं वाटत असेल त्याला एआय शिकण्यावर भर द्यावा लागेल. त्याच्या मदतीने तो आपलं काम कसं सुधारू शकतो हे पाहायला हवं.
उद्योग क्षेत्राला बदलणा-या या तंत्रज्ञानाविषयी शिकायला सुरूवात करायचं, असं क्येलरने काही आठवड्यांपूर्वी ठरवलं.
ती म्हणते, “जिथे तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय अशा कामांची मला सुरूवातीला भीती वाटायची. पण आता मला जाणवलंय की असं करणं मूर्खपणाचं आहे. आता मला समजलंय की मला त्याबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितकी माझी भीती कमी होईल."
कायदेशीर सहाय्यक विजय हसत हसत सांगतो, "आता कधी कधी मी चॅट जीपीटीच्या मदतीने एखादा करार किंवा कराराचा मसुदा देखील तयार करतो आणि नंतर तो काळजीपूर्वक वाचतो आणि आवश्यक ते बदल करतो. यामुळे माझं काम सोप्प झालंय पण काळजीही वाटते की भविष्यात माझ्यासारख्यांच्या लोकांच्या नोकऱ्या यामुळे कमी होऊ शकतात."
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, लोकांनी एआयला धोक्याची घंटा न समजता उपयुक्त गोष्ट मानून त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. यामुळे त्यांची चिंता दूर होईल आणि ते स्वत:ला एक सक्षम कर्मचारी बनवू शकतील.