AI Healing: तरुणांच्या मानसिक आजारांवर आता कृत्रिम बुद्धिमत्ता उपचार करतेय
गुरूवार, 11 जानेवारी 2024 (17:43 IST)
- जो टाइडी
हॅरी पॉटर, इलॉन मस्क, बियॉन्से, सुपर मारिओ आणि व्लादिमीर पुतिन.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंजेलिजन्स (एआय) सोबत जोडलेल्या काही लाखो व्यक्तिमत्त्वांपैकी ही काही निवडक नावं आहेत, ज्यांच्याशी तुम्ही 'कॅरेक्टर.एआय' (character.ai) वर बोलू शकता.
हे एक लोकप्रिय व्यासपीठ आहे, जिथे कुणीही काल्पनिक किंवा खऱ्या लोकांच्या नावाने चॅटबॉट्स तयार करू शकतं.
character.ai देखील चॅटबॉट चॅटजीपीटीसारखं आर्टिफिशियल इंजेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करतं. परंतु चॅटजीपीटीवर वेळ व्यतित करण्याच्या तुलनेत ही वेबसाइट अधिक लोकप्रिय आहे.
इथे वर नमूद केलेल्या चॅटबॉटपेक्षा 'सायकॉलॉजिस्ट' नावाचा चॅटबॉट अधिक लोकप्रिय आहे.
'सायकॉलॉजिस्ट' कोणी तयार केलंय?
'सायकॉलॉजिस्ट' हे 'ब्लॅझमॅन 98' नावाच्या युजरने सुमारे एक वर्षापूर्वी तयार केलेलं. या चॅटबॉटवर आतापर्यंत 7.8 कोटी संदेश शेअर करण्यात आले आहेत. त्यापैकी 1.8 कोटी संदेश नोव्हेंबर महिन्यानंतर आलेले आहेत.
कॅरेक्टर.एआय ने या चॅटबॉटचे किती वापरकर्ते आहेत हे उघड केलेलं नाही, परंतु संदेशांचा विचार करता दररोज 35 लाख लोक त्याच्या वेबसाईटला भेट देतात.
'आयुष्यातील अडचणींमध्ये मदत करणारी व्यक्ती' अशी या चॅटबॉटची ओळख करून देण्यात आली आहे.
सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरिया मधील एका कंपनीने त्याच्या लोकप्रियतेबाबत प्रश्नचिन्ह उभं करत म्हटलंय की, त्यांचे वापरकर्ते खोटी माहिती सांगून मनोरंजनासाठी याचा वापर करतात.
रायडेन शोगुनसारखे कार्टून किंवा संगणक गेममधील पात्र ही सर्वांत लोकप्रिय चॅटबॉट आहेत. त्यांना 282 दशलक्ष संदेश पाठवण्यात आलेले आहेत.
त्याच्या लाखो पात्रांपैकी काही मोजकेच 'सायकॉलॉजिस्ट' इतके लोकप्रिय आहेत. त्यावर एकूण 475 चॅटबॉट्स आहेत, ज्यांच्या नावामध्ये 'थेरपी', 'थेरपिस्ट', 'सायकियाट्रिस्ट' किंवा 'सायकॉलॉजिस्ट' आहे. ते विविध भाषेत संवाद साधू शकतात.
यापैकी काहींचं वर्णन तुम्ही 'हॉट थेरपिस्ट' सारख्या मनोरंजक किंवा काल्पनिक पात्रांसारखं करू शकता. परंतु मानसिक आरोग्य सहाय्यक सारखे चिकित्सक त्यावर सर्वाधिक लोकप्रिय आहेत, त्याचे 12 दशलक्ष संदेश आहेत. याशिवाय, 'आर यू फीलिंग ओके' सारखे चॅटबॉट्स देखील आहेत, ज्यांना 16.5 दशलक्ष संदेश मिळाले आहेत.
वापरकर्ते 'सायकॉलॉजिस्ट'वर खूश
'सायकॉलॉजिस्ट' हा आतापर्यंतचा सर्वांत लोकप्रिय मानसिक आरोग्याचा बॉट आहे. त्याच्या अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडिया साइट रेडिटवर त्याबाबत चांगली परीक्षणं लिहिली आहेत.
एका यूजरने लिहिलंय, "हा एक जीवरक्षक आहे." दुसर्या यूजरने लिहिलंय, "याने मला आणि माझा प्रियकर अशा दोघांनाही आमच्या भावना व्यक्त करण्यास आणि त्या समजून घेण्यास मदत केली."
मूळचा न्यूझीलंडचा रहिवासी असलेला 30 वर्षीय सॅम झिया हा ब्लेझमॅन98 चा निर्माता आहे.
तो म्हणजे “हे इतकं लोकप्रिय होईल याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती, मी कधीही असा विचार केला नव्हता की इतर लोकं त्याचा टूल म्हणून वापर करतील."
"मग मला अनेक लोकांकडून संदेश आले की त्याच्या सकारात्मक गोष्टींपासून ते प्रभावित झाले आहेत आणि उपाय शोधण्यासाठी म्हणून ते त्याचा वापर करतात,” असं झिया म्हणाले.
मानसशास्त्राच्या या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की त्याने बॉटशी बोलून, त्याच्या अभ्यासादरम्यान मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग नैराश्य आणि चिंता यांसारख्या सामान्य मानसिक आरोग्य समस्यांवर उत्तरं तयार करण्यासाठी केला.
जेव्हा त्याचे मित्र त्यांच्या कामात व्यग्र होते आणि त्याला त्यांची गरज होती तेव्हा त्याने हे स्वतःसाठी तयार केलेलं.
'सायकॉलॉजिस्ट'च्या यशाने अचंबित झालेला सॅम 'एआय थेरपीची वाढणारी लोकप्रियता आणि त्याचं तरुणांना का आकर्षण आहे' या विषयात पीचडी करतोय.
charecter.ai वरील बहुतांश वापरकर्ते 16 ते 30 वयोगटातील आहेत.
सॅम म्हणतो, "मला संदेश पाठवणारी बरेच लोक म्हणतात की जेव्हा त्यांना विचार करता येत नाही तेव्हा ते हा बॉट वापरतात, उदा. मध्यरात्री 2 वाजता जेव्हा ते एखादा मित्र किंवा चिकित्सकासोबत बोलू शकत नाहीत तेव्हा ते याचा वापर करतात.”
सॅमचा असाही अंदाज आहे की त्याच्या चॅटबॉटच्या उत्तरांच्या स्वरूपामुळेही तरुणांना ते अधिक आपलसं वाटतं.
त्यांना असं वाटतं की, फोनवर किंवा समोरासमोर बोलण्यापेक्षा संदेशांद्वारे बोलणं, हे सर्वात सोपं काम आहे.
खऱ्या मानसशास्त्रज्ञाचं काय म्हणणं आहे?
थेरेसा प्ल्यूमन या एक व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात की, या प्रकारची चिकित्सा तरुण पिढ्यांमध्ये लोकप्रिय आहे याचं त्यांना आश्चर्य वाटलं नाही, परंतु त्याच्या उपयुक्ततेबाबत त्यांना शंका आहे.
त्या म्हणतात, "बॉटपाशी सांगण्यासारखं खूप काही आहे. तो झटपट गृहितकं बनवतो, जसं की जेव्हा मी विचारलं, की मला खूप उदास वाटतंय तर मला नैराश्याविषयी सल्ला मिळू शकेल का. परंतु हे तसं नाहीए, जे माणसासारखी प्रतिक्रिया देऊ शकेल.
थेरेसा म्हणतात की, 'मानवाला हवी असलेली सर्व माहिती गोळा करण्यात बॉट अपयशी ठरतो. तो एक चांगला डॉक्टर नाही. पण त्या म्हणतात की त्यांना ताबडतोब आणि उत्स्फुर्त मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी तो उपयुक्त ठरू शकतो.'
त्या म्हणतात की, 'बॉटचा वापर करणाऱ्यांची संख्या ही चिंतेची बाब आहे'. याबाबतीत त्या मानसिक आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि सार्वजनिक साधनसंपत्तीच्या अभावाकडे त्या अंगुलीनिर्देश करतात.
character.ai च्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "लोकांनी आणि समुदायाने तयार केलेल्या पात्रांतर्फे लोकांना चांगला पाठिंबा आणि प्रेम मिळतंय, याचा आम्हाला आनंद आहे, परंतु वापरकर्त्यांनी योग्य सल्ला आणि मार्गदर्शनासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे."
कंपनी म्हणते की, वापरकर्त्यांचे चॅट लॉग खाजगी ठेवण्यात येतात, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव गरज भासल्यास त्यांचे कर्मचारी चॅट लॉग वाचू शकतात.
यावरील प्रत्येक संभाषणाच्या आधी लाल अक्षरात इशारा दिला जातो. त्यात लिहिलेलं असतं की, "लक्षात ठेवा, पात्रांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट काल्पनिक आहे."
हे एक प्रकारचं स्मरणपत्र आहे, ज्यामध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाला लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) म्हटलं जातं, ते मानवाप्रमाणे विचार करत नाही.
एआयवर आधारित इतर सेवा कशा आहेत?
एलएलएमवर आधारित रेप्लिका (Replika) सारख्या वेबसाइटदेखील आहे, तीसुद्धा कॅरेक्टर.एआय सारखी सेवा देते. परंतु त्याचं स्वरूप लक्षात घेऊन त्याला केवळ प्रौढांसाठीची मान्यता देण्यात आलेय.
सिमिलरवेब या विश्लेषण कंपनीच्या डेटानुसार कॅरेक्टर.एआय वेबसाइटवर व्यतित केलेला वेळ आणि दिलेल्या भेटींइतकी रेप्लिका ही लोकप्रिय नाही.
Earkick आणि Woebot हे एआय चॅटबॉट्स देखील आहेत जे आधीच मानसिक आरोग्य जोडीदार म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. या दोन्ही कंपन्यांचा दावा आहे की त्यांनी केलेल्या संशोधनातून असं दिसून आलंय की ही दोन्ही अॅप्स लोकांसाठी उपयुक्त ठरत आहेत.
काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, 'एआय बॉट्स रुग्णांना वाईट सल्ला देऊ शकतात. हे बॉट्स वंश किंवा व्यक्तीच्या लिंगाच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित असू शकतात, अशी चिंता त्यांना वाटते. परंतु वैद्यकीय जगात हळूहळू या चॅटबॉट्सला उपकरणाच्या स्वरूपात स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.'
लिंबिक ॲक्सेस (Limbic Access) नावाच्या एआय सेवेला गेल्या वर्षी ब्रिटिश सरकारने वैद्यकीय उपकरण म्हणून प्रमाणपत्र दिलेलं. हे प्रमाणपत्र मिळवणारा हा पहिला मानसिक आरोग्य चॅटबॉट आहे.
अनेक राष्ट्रीय आरोग्य सेवा ट्रस्टमधील रूग्णांचं वर्गीकरण आणि उपचारासाठी प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी आता त्याचा वापर केला जातो.