हैदराबादला पुन्हा एक ऑस्ट्रेलियन कर्णधार तारणार की कोलकाता 'कोरबो, लोरबो, जीतबो' म्हणणार?
रविवार, 26 मे 2024 (11:52 IST)
आयपीएल 2024 चा अंतिम सामना आज ( रविवार-26 मे) चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
या दोन्ही संघांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. एकीकडे हैदराबादच्या फलंदाजांनी संपूर्ण आयपीएलमध्ये धावांचा रतीब घातलाय, तर दुसरीकडे कोलकाताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात दमदार कामगिरी करून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
17 वा आयपीएल चषक जिंकण्यासाठी 26 मे रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी हे दोन्ही संघ मैदानात उतरतील. एकीकडे तरुण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा कोलकत्त्याचा संघ असेल तर त्यांना आव्हान द्यायला ऑस्ट्रेलियाच्या जगज्जेत्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणारा हैदराबादचा संघ मैदानात उतरेल.
कोलकाताच्या संघाने याआधी दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे तर सनरायजर्सने एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. एकेकाळी हैद्राबादचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डेक्कन चार्जर्सने देखील याआधी एकदा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे
पण असं म्हणतात ना की, कोणतंही आव्हान पेलण्यासाठी भूतकाळात तुम्ही काय केलंय ते महत्त्वाचं नसतं, तर मोक्याच्या क्षणी तुम्ही कशी कामगिरी करता यावर सगळं अवलंबून असतं.
अगदी त्याचप्रमाणे पाच-पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या, मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा असलेल्या संघांना पराभवाची धूळ चारून हे दोन्ही संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचले आहेत.
आता 26 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात नेमकं काय होतं? एकीकडे श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर ही कर्णधार प्रशिक्षकाची जोडी, तर दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्स आणि डॅनियल व्हिटोरी यांची जोडी आयपीएल जिंकण्यासाठी झुंजणार आहे.
या स्पर्धेत दोन्ही संघानी कशी कामगिरी केलीय?
आयपीएल 2024 च्या सुरुवातीला फारच कमी चाहत्यांनी आणि क्रिकेटच्या जाणकारांनी हैदराबाद आणि कोलकाता हे दोन संघ अंतिम सामना खेळतील, अशी शक्यता व्यक्त केली असेल.
हे सगळे अंदाज धुडकावून लावत हैदराबाद आणि कोलकाताच्या संघाने आयपीएलमधील मातब्बर संघांचा अगदी सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
आयपीएल 2024 च्या नॉक-आउट सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलेले नाहीत. याआधी झालेल्या क्वालिफायर-1 मध्ये कोलकाताने हैदराबादचा पराभव करून थेट अंतिम सामना गाठला होता.
साखळी फेरीत पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या संघांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी असतात आणि त्याचाच वापर करत पॅट कमिन्सच्या हैदराबादने क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
यावर्षीच्या कामगिरीचा विचार केला तर या दोन्ही संघानी एकमेकांच्या विरुद्ध दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाता संघाचं पारडं जड ठरलं आहे.
साखळी फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला तर क्वालिफायर-1 मध्येही कोलकाताने विजय मिळवला आहे.
आजवर आयपीएलमध्ये कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यांचा विचार केला, तर या दोन्ही संघानी एकमेकांविरुद्ध 27 सामने खेळले आहेत. त्यापैकी 18 सामन्यांमध्ये कोलकाताच्या संघाने विजय मिळवलाय तर 9 सामन्यांमध्ये हैदराबादच्या संघाची सरशी झालीय.
फक्त आकड्यांवर नजर टाकली तर अर्थातच कोलकाता संघाचं पारडं जड दिसत असलं, तरी पॅट कमिन्स हा अत्यंत आक्रमक आणि नॉक आउट सामने जिंकण्याचा अनुभव असलेला कर्णधार आहे.
तसेच, हैदराबादच्या संघाने या स्पर्धेत धावांचे डोंगर उभारले आहेत. अर्थात काही सामन्यांमध्ये हा संघ पूर्णतः ढेपाळला असला, तरीही आयपीएलच्या प्रथेप्रमाणे अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
हैदराबाद आणि ऑस्ट्रेलियन कर्णधारांचं नातं
सनरायजर्स हैदराबादपूर्वी हैदराबाद शहराकडून डेक्कन चार्जर्स नावाचा संघ आयपीएलमध्ये सहभागी व्हायचा.
2008 साली झालेल्या पहिल्या आयपीएल स्पर्धेनंतर पहिल्यांदाच आयपीएल भारताबाहेर खेळवली गेली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने डेक्कन चार्जर्सला आयपीएलचा विजेता बनवलं होतं.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गिलख्रिस्टच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवत आयपीएलचा चषक जिंकला होता. त्यानंतर 2013ला सनरायजर्स हैदराबाद हा संघ आयपीएलमध्ये आला.
2016च्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने हैदराबादला आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं. याहीवर्षी हैदराबादने अंतिम सामन्यात बंगळुरूचा 8 धावांनी पराभव केला होता.
त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये सनरायजर्सने बरेच कर्णधार बदलले.
केन विल्यम्सन, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, एडन मार्करम सारख्या खेळाडूंनी हैदराबाद संघाचं नेतृत्व केलं पण ते काही त्यांना विजेतेपद मिळवून देऊ शकले नाहीत.
2023च्या स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर हैदराबाद संघाच्या मालकांनी न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिटोरीला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आणि पुन्हा एकदा एका ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हातात संघाची धुरा दिली.
नुकताच एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकलेल्या पॅट कमिन्सने पहिल्याच सामान्यापासून संघाचं यशस्वीपणे नेतृत्व केलं आणि मियाभाईंचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद संघासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार यशस्वी ठरतो हा योगायोग पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला.
आता या स्पर्धेत पुन्हा एकदा एक ऑस्ट्रेलियन खेळाडू हैदराबादच्या चाहत्यांना विजयाचा आनंद देतो की, कोलकाताचा संघ हे मिथक मोडून काढतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
'कोरबो, लोरबो, जीतबो' होईल का?
पहिल्याच आयपीएल स्पर्धेपासून शाहरुख खानच्या मालकीचा हा संघ क्रिकेट रसिकांच्या आवडीचा राहिलेला आहे.
2008 च्या पहिल्याच स्पर्धेत कोलकाताने सौरव गांगुलीला कर्णधारपदी नियुक्त केलं. अनेक मातब्बर खेळाडूंना आपल्या संघात घेतलं पण पहिल्या चारही आयपीएल स्पर्धांमध्ये त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही.
2011 च्या पराभवानंतर कोलकाताच्या व्यवस्थापनाने संघात मोठे बदल केले. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताकडून महत्त्वाची कामगिरी केलेल्या गौतम गंभीरच्या हातात संघाची धुरा दिली आणि कोलकाता संघाचं नशीबच बदललं.
2012 च्या आयपीएलमध्ये कोलकाताने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आणि फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केला.
त्यानंतर 2014 मध्येही कोलकाताने अत्यंत चुरशीच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा 3 गडी राखून पराभव केला आणि गौतम गंभीरने शाहरुख खानला दुसरं विजेतेपद मिळवून दिलं.
2014नंतर 2021मध्ये इऑन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळताना कोलकाताने अंतिम फेरी गाठली पण चेन्नईने त्यांचा पराभव केला.
2024ची स्पर्धा सुरु होण्यापूर्वी दोनवेळा कोलकाताच्या चाहत्यांना विजेतेपदाचा आनंद देणारा गौतम गंभीर एका नव्या रूपात कोलकाता संघात आला.
यावर्षी श्रेयस अय्यरच्या तरुण खांद्यावर नेतृत्वाची धुरा असली तरी मैदानाबाहेर डगआउटमधून गौतम गंभीरही सामन्यात तेवढाच गुंतलेला दिसून आला.
आक्रमक सुनील नरीनला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवणं असो किंवा मग वैभव अरोरा किंवा हर्षित राणा या तरुण वेगवान गोलंदाजांवर टाकलेली जबाबदारी असो, कोलकाताच्या खेळावर असलेला हा 'गंभीर' प्रभाव कोलकाताच्या तिसऱ्या विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करतो का, हे आता सामना संपल्यावरच कळेल.
अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड विरुद्ध सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती
हैदराबादचा विचार केला तर त्यांच्याकडे आक्रमक फलंदाजांची एक मजबूत फळी दिसून येते.
अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या डावखुऱ्या फलंदाजांनी सलामीला उतरून गोलंदाजांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या आहेत.
त्यानंतर हेनरिक क्लासन, एडन मार्करम या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनीही आक्रमक फलंदाजीचा एक वस्तुपाठ घालून दिलाय.
हैद्राबादच्या फलंदाजांनी धावांचे डोंगर उभारले असले तरी काही सामन्यांमध्ये मात्र याच फलंदाजांनी नांगी टाकल्याचंही दिसून आलं.
त्यामुळे अंतिम सामन्यात हे खेळाडू कसे खेळतील यावर बरच काही अवलंबून असणार आहे.
कर्णधार आणि प्रशिक्षकाने दाखवलेला विश्वास सुनीलने सार्थ ठरवत जबरदस्त फलंदाजी केली आहे. अंतिम सामन्याआधी झालेल्या 13 सामन्यांमध्ये त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.
त्याचा जोडीदार फील सॉल्ट मायदेशी परतला असला तरी मधल्या फळीत कोलकाताकडे गुणवान खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल आणि नितीश राणा कोलकातासाठी मध्यक्रमात फलंदाजी करतील.
गोलंदाजीचा विचार केला तर हैदराबादकडे कर्णधार पॅट कमिन्ससह भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन हे चांगले भारतीय वेगवान गोलंदाज आहेत.
तर दुसरीकडे कोलकाताचे फिरकीपटू हैदराबादच्या फलंदाजांना अवघड प्रश्न विचारू शकतात. सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्ती या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.
ज्या मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे, तिथे फिरकी गोलंदाजांना चांगलीच मदत होते. चेन्नईच्या या मैदानात याच कारणामुळे कोलकाताचे फिरकीपटू प्रभावी ठरू शकतात पण क्वालिफायर-2मध्ये राजस्थानविरुद्ध शाहबाझ अहमद आणि अभिषेक शर्माने केलेली गोलंदाजी पाहता हेही खेळाडू कोलकाताच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयपीएलचा अंतिम सामना हा इतर सामान्यांपेक्षा खूप वेगळा असतो.
अत्यंत मोक्याच्या क्षणी कोणता संघ डोकं शांत ठेवून खेळतो, कोणते खेळाडू स्वतःवर जबाबदारी घेऊन संघाला विजयी करू शकतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.