IPL 2022: पहिलाच हंगाम, पहिलेच कर्णधारपद ; हार्दिक पंड्याने कोरले ट्रॉफीवर नाव..

सोमवार, 30 मे 2022 (09:16 IST)
कर्णधार हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर गुजरात टायटन्सने पहिल्यावहिल्या हंगामात आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं.
 
अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर लाखभर लोकांच्या उपस्थितीत रंगलेल्या अंतिम लढतीत गुजरातने राजस्थानवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. 3 विकेट्स आणि 34 धावांसह हार्दिक पंड्या फायनलचा शिलेदार ठरला.
 
नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. गुजरातने शिस्तबद्ध गोलंदाजी करत राजस्थानला 130 धावातच रोखलं. विजयासाठी मिळालेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही पण मधल्या फळीने पडझड थांबवली आणि भागीदाऱ्या रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 
आयपीएलच्या 15व्या हंगामात अंतिम लढतीत गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने 17 धावांत 3 विकेट्स घेत राजस्थानला अडचणीत टाकलं. शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर गुजरातने राजस्थानला 130 धावांतच रोखलं.
 
राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात जेतेपदावर नाव कोरलं होतं. शेन वॉर्नच्या नेतृत्वात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या राजस्थान संघाने अद्भुत कामगिरी करत जेतेपदाची कमाई केली होती.
 
दुसरीकडे गुजरात टायटन्ससाठी पहिला हंगाम स्वप्नवत ठरला आहे. यंदाच्या हंगामात पदार्पण करणाऱ्या गुजरातने दमदार खेळाच्या बळावर अंतिम फेरी गाठली. हार्दिक पंड्याने दुखापतीतून सावरत गुजरातचं यशस्वी नेतृत्व केलं आहे.
 
प्राथमिक फेरीत या दोन संघांमध्ये झालेल्या लढतीत गुजरातनेच विजय मिळवला होता. अंतिम लढतीसाठी राजस्थानने प्लेऑफ लढतीतला संघ कायम ठेवला तर गुजरातने अल्झारी जोसेफऐवजी लॉकी फर्ग्युसलनला संघात समाविष्ट केलं.
 
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. आम्ही गोलंदाजीच केली असती असं गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितलं.
 
शस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी 31 धावांची सलामी दिली. यश दयाळच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साईकिशोरच्या हातात जाऊन विसावला.
 
यंदाच्या हंगामात अविश्वसनीय फॉर्मात असणाऱ्या बटलरने कर्णधार संजू सॅमसनसह धावफलक हलता ठेवला. बटलरने यंदाच्या हंगामात चार शतकं झळकावली आहेत. बटलरच्या शतकाच्या बळावरच राजस्थानने अंतिम फेरीत धडक मारली होती.
 
संजू सॅमसनला पंड्यानेच बाद केलं. संपूर्ण हंगामात धावांसाठी झगडणाऱ्या संजूला अंतिम लढतीतही सूर गवसला नाही. त्याने 14 धावा केल्या. सलामीऐवजी मधल्या फळीत खेळणाऱ्या देवदत्त पड्डीकलला रशीद खानने माघारी धाडलं. 10 चेंडूत 2 धावांमुळे राजस्थानच्या अन्य फलंदाजांवरचं दडपण वाढलं.
 
परपल कॅपचा मानकरी होणार असलेल्या जोस बटलरला हार्दिकने बाद करत राजस्थानला सगळ्यात मोठा धक्का दिला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या बटलरला बाद करत हार्दिकने सामन्याचं पारडं गुजरातच्या बाजूने फिरवलं. बटलरने 5 चौकारांसह 39 धावांची खेळी केली.
 
बटलर बाद झाल्यानंतर शिमोरन हेटमायरकडून राजस्थानला अपेक्षा होत्या मात्र हार्दिक पंड्यानेच त्याला तंबूत परतावलं. त्याने 11 धावा केल्या. यंदाच्या हंगामात आपल्या बॅटनेही कमाल दाखवणाऱ्या रवीचंद्रन अश्विनला अंतिम लढतीत विशेष चमक दाखवता आली नाही. तो साई किशोरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
 
रायन परागने 15 तर ट्रेंट बोल्टने 11 धावा केल्या यामुळे राजस्थानने 130 धावांचा टप्पा गाठला. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने 17 धावांत 3विकेट्स घेत राजस्थानच्या डावाला खिंडार पाडले. साईकिशोरने 2 तर मोहम्मद शमी, यश दयाळ, रशीद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
छोट्या पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात डळमळीत झाली. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या चौथ्या चेंडूवर शुबमन गिलचा सोपा झेल युझवेंद्र चहलने सोडला.
 
वृद्धिमान साहा 5 धावा करून तंबूत परतला. मॅथ्यू वेडही त्याच्यापाठोपाठ माघारी परतला. त्याने 8 धावा केल्या. मॅचचं पारडं आपल्याकडे वळवण्यासाठी राजस्थानला झटपट विकेट्स मिळवणं आवश्यक होतं. गुजरातची स्थिती 23/2 अशी होती. शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी गुजरातचा डाव सावरला.
 
या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलने हार्दिकला बाद केलं. त्याने 30 चेंडूत 34 धावांची खेळी केली. हार्दिक बाद झाल्यानंतर गिल-मिलर जोडीने एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार-षटकार यांचा सुरेख मिलाफ साधला.
 
गिलने नाबाद 45 तर मिलरने नाबाद 32 धावांची खेळी केली.
 
आयपीएल विजेते संघ
2008- राजस्थान रॉयल्स
 
2009-डेक्कन चार्जर्स
 
2010-चेन्नई सुपर किंग्स
 
2011-चेन्नई सुपर किंग्स
 
2012-कोलकाता नाईट रायडर्स
 
2013-मुंबई इंडियन्स
 
2014-कोलकाता नाईट रायडर्स
 
2015-मुंबई इंडियन्स
 
2016-सनरायझर्स हैदराबाद
 
2017-मुंबई इंडियन्स
 
2018-चेन्नई सुपर किंग्स
 
2019-मुंबई इंडियन्स
 
2020-मुंबई इंडियन्स
 
2021-चेन्नई सुपर किंग्स
 
2022- गुजरात टायटन्स
 
......................................................
 
ऑरेंज कॅप
2008-शॉन मार्श
 
2009-मॅथ्यू हेडन
 
2010-सचिन तेंडुलकर
 
2011-ख्रिस गेल
 
2012-ख्रिस गेल
 
2013-माईक हसी
 
2014-रॉबिन उथप्पा
 
2015-डेव्हिड वॉर्नर
 
2016-विराट कोहली
 
2017-डेव्हिड वॉर्नर
 
2018-केन विल्यमसन
 
2019-डेव्हिड वॉर्नर
 
2020-के.एल.राहुल
 
2021-ऋतुराज गायकवाड
 
2022- जोस बटलर
 
....................................
 
परपल कॅप
2008-सोहेल तन्वीर
 
2009-आरपी सिंग
 
2010-प्रग्यान ओझा
 
2011-लसिथ मलिंगा
 
2012-मॉर्ने मॉर्केल
 
2013-ड्वेन ब्राव्हो
 
2014-मोहित शर्मा
 
2015-ड्वेन ब्राव्हो
 
2016-भुवनेश्वर कुमार
 
2017-भुवनेश्वर कुमार
 
2018-अँड्यू टाय
 
2019-इम्रान ताहीर
 
2020-कागिसो रबाडा
 
2021-हर्षल पटेल
 
2022-युझवेंद्र चहल
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती