विजयी लय कायम राखण्याचा चेन्नई-राजस्थानचा प्रयत्न

सोमवार, 19 एप्रिल 2021 (14:40 IST)
चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स आपल्या पहिल्या विजयानंतर सोमवारी होणार्या आयपीएलच्या सामन्यात ज्यावेळी एकमेकांपुढे उभे राहतील, त्यावेळी दोन्ही संघांचा प्रयत्न आपली विजयी लय कायम राखण्याचा असेल. दोन्ही संघांनी सलामीच्या लढती गमावल्यानंतर पुनरागमन करताना दुसर्याच सामन्यात विजय नोंदविला आहे. मात्र, त्यांची प्रतिस्पर्धंना पराभूत करण्याची पध्दत वेगवेगळी होती.
 
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने जिथे पंजाब किंग्जविरूध्द सोपा विजय नोंदविला. तिथे राजस्थानने अंतिम षटकात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत दोन गुण प्राप्त केले. त्यामुळे दोन्ही संघ आपले विजयी अभियान पुढे नेण्याबरोबरच दुसर्या  विजयासाठी प्रयत्नशील असतील.
 
या सामन्यात दीपक चाहरकडून धोनीला मागील सामन्यातील  कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा असेल. त्यासोबतच सॅम कुरेन व शार्दुल ठाकूर यांच्यासह अन्य गोलंदाजांनीही योगदान देण्याची चेन्नईला अपेक्षा आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याचा क्वारंटाइन कालावधी संपल्याने तो अंतिम अकरात सामील होऊ शकतो.
 
मोईन अली गोलंदाजी व फलंदाजीतही आपला प्रभाव पाडत आहे. मात्र, फाफ डु प्लेसिस आपली सर्वश्रेष्ट कामगिरी नोंदविण्यास अद्याप यशस्वी झालेला नाही. तर सुरेश रैनाच्या उपस्थितीने चेन्नईची फलंदाजी मजबूत झाली आहे. दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने सुरूवातीच्या सामन्यात शतक झळकाविल्याने तो चांगल्या लयीत दिसत आहे. त्याच्याशिवाय जोस बटलर व डेव्हिड मिलेर यांचा फॉर्म स्पर्धेसाठी राजस्थानला खूपच महत्त्वाचा असेल. राजस्थानला त्यांच्या फलंदाजांकडून सांघिक कामगिरीची अपेक्षा आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट, युवा चेतन सकारिया, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रेहान यांना चेन्नईच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखावे लागेल. तरच दोन्ही संघांचे यष्टिरक्षकाकडे नेतृत्व असलेला सामना रोमांचक होईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती