मुलाखतीला जाताना....

ND
* नोकरीसाठी मुलाखतीला जाताना चांगली तयारी करुन गेले पाहिजे. स्वच्छ व इस्त्री केलेले चांगल्या रंगसंगतीचे फॉर्मल कपडे परिधान करून जावे. काही जण जीन्स, टीशर्ट तसेच लांब केस अशा अवतारात मुलाखतीला जातात आणि स्वत:हून पायावर धोंडा मारून घेतात. कारण तुमच्या विचित्र अवताराचा समोरच्यावर चुकीचा प्रभाव पडतो आणि तुम्ही मुलाखतीत अपयशी ठरता.

* मुलाखतीस जात असलेल्या संस्थेच्या एचआर डिपार्टमेंटमधील कोणत्या व्यक्तीला ओळखत असाल तर आधी हे जाणून घ्या की, मुलाखतीच्या पॅनलवर कोणकोणते अधिकारी आहेत. त्यानुसार तयारी करून गेले तर ते तुमच्या फायद्याचे ठरू शकेल.

* विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक दिले पाहिजे. उत्तर देताना गडबडून जावू नका अथवा घाबरून चुकीचे उत्तर देऊ नका. मुलाखतीस जाताना तुमचे शिक्षण, तुम्हाला असलेला अनुभव व तुम्हाला कामातील असलेली रूची आदी गोष्टी एका कागदावर सुवाच्च अक्षरात लिहून जा अथवा त्याची संगणक प्रत जवळ ठेवा. त्यामुळे वेळ पडल्यास तुम्हाला पॅनलसमोर ती प्रत ठेवता येईल.

* तुमची मुलाखत जो कोणी घेणार आहे, त्याचे निदान नाव लक्षात ठेवा. मुलाखतीस कॅबीनमध्ये जाताना नम्रपणे त्यांना नावाने आदरपूर्वक अभिवादन करून आत जा.

* एचआरमधील व्यक्तीकडून कंपनीची धोरणे समजून घेण्याचा प्रयत्‍न करावा. अथवा कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रश्नाचे उत्तर देताना ज्या कंपनीत नोकरीसाठी आला आहात त्याच कंपनीच्या संदर्भात एखादे उदाहरण वापरावे. पण त्याविषयी तुम्हाला परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

* मुलाखतीत एखादे वाक्य इंग्रजी बोलत असाल तर ते देखील अचूक बोला नाहीतर स्वत:चा पोपट करून घेऊ नका. चुकीचे बोलून तुमच्या विषयीचे मत नकारात्मक होऊ देऊ नका

* मुलाखतीला बसल्यावर आपल्या देहबोलीवरही लक्ष असू द्या. तुमच्या बोलण्यात व तुमच्या शाररिक हलचाली यांच्यात तफावत आढळता कामा नये.

* मार्केटिंग स्ट्रॅटेजी चांगल्या पध्दतीने समजून घ्या. कारण तुमच्या कामातून तुम्ही कंपनीच्या प्रोग्रेससाठी काय काय करणार आहेत हे मुलाखत पॅनलला सांगण्याची गरज पडू शकते.

वेबदुनिया वर वाचा