यासिन मलिकची पत्नी झाली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची विशेष सहाय्यक

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (14:31 IST)
यासिन मलिकची पत्नी मिशाल हुसैन मलिकला पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वरुल हक काकड यांच्या विशेष सहायकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांना मानवाधिकार आणि महिला सशक्तीकरण प्रकरणांसाठी विशेष सहाय्यक बनवण्यात आलं आहे. मिशाल पाकिस्तानच्या नागरिकर असून त्या तिथंच राहातात.
 
यासिन मलिक कोण आहेत?
दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आरोपाखाली यासिन मलिक यांना दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
तसंच त्यांना 10 लाखांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला आहे.
 
NIAच्या एका विशेष न्यायालयाने काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिक यांना दहशतवादी कारवयांना पैसा पुरवल्याबद्दल दोषी ठरवलं होतं.
 
यासीन मलिक जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटचे ((JKLF) अध्यक्ष होतेच, पण त्यासोबतच JKLFच्या संस्थापकांपैकीही एक होते.
 
या संघटनेनं 1989 आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये काश्मिर खोऱ्यात सशस्त्र कट्टरतावादाचं नेतृत्व केलं होतं. यासीन मलिक जम्मू आणि काश्मीरला भारत आणि पाकिस्तान दोन्हींपासून स्वतंत्र ठेवण्याचं समर्थन करायचे.
 
त्यानंतर त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून चर्चेचा मार्ग अनुसरला.
 
1966 मध्ये श्रीनगरमध्ये जन्मलेले यापूर्वीही अनेकदा जेलमध्ये गेले होते. त्यांना पहिल्यांदा जेव्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं, तेव्हा त्यांचं वय केवळ 17 वर्षंच होतं.
 
1980 मध्ये भारतीय सुरक्षा दलांनी केलेला हिंसाचार पाहिल्यानंतर हत्यार हातात घेतल्याचं यासिन मलिक यांनी सांगितलं होतं.
 
1983 मध्ये श्रीनगरमध्ये वेस्ट इंडिजविरोधात होऊ घातलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अडचण आणण्याच्या प्रयत्नांनतर पहिल्यांदा यासिन मलिक हे नाव काश्मिर खोऱ्यातल्या लोकांसमोर आलं.
 
यासीन मलिक यांच्या पत्नीने काय म्हटलं?
एक काळ असाही होता जेव्हा यासीन मलिकने पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भेट घेतली होती आणि 2005 साली एका शिष्टमंडळासोबत पाकिस्तानचा दौरा केला होता.
 
यासीन मलिक यांची पत्नी मशाल हुसैन मलिक ही पाकिस्तानची आहे आणि तिथेच राहते. त्या ट्वीटरवर आपले पती निर्दोष असल्याचं सांगत असतात.
 
यासिन मलिक यांना दोषी ठरविणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी एक ट्वीट करून म्हटलं, "मोदी, तुम्ही यासीन मलिकला मात नाही देऊ शकत. त्यांचं दुसरं नावच 'आझादी' आहे. न्यायिक दहशतवादाच्या प्रत्येक चुकीच्या पावलाचा भारताला पश्चाताप होईल."
 
असा आहे यासिन मलिकचा इतिहास
 
1991 साली मी रिपोर्टिंगसाठी श्रीनगरला गेलो होतो, दुपारच्या वेळेला गर्दीच्या ठिकाणी जात होतो आणि अचानक चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. लोक त्यांची सायकल, चप्पल, बुट सोडून पळत होते. चारी बाजूंनी गोळीबार सुरू होता. जीव वाचवणं कठीण झालं होतं. मात्र हा गोंधळ जितका अचानक सुरू झाला तितकाच अचानक बंदही झाला. जनजीवन मूळपदावर आलं होतं.
 
मी बीएसएफच्या एका बंकरमध्ये घुसलो. बीएसएफच्या लोकांनी मला सांगितलं की जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि हिजबूल मुजाहिद्दीनमध्ये होत असलेल्या चकमक आहे आणि ती रोज होत असते.
 
तो काळ म्हणजे फुटीरतावादी आंदोलनाच्या निर्णायक वळणाचा होता. तेव्हा JKLF च्या लोकांना हिजबुल मुजाहिद्दीनचे लोक मारत होते किंवा त्यांच्या संघटनेत सामील होत होते किंवा पळून जात होते.
 
हिजबूल मुजाहिद्दीनला पाकिस्तानचं समर्थन होतं. त्यांचे लोक फक्त इस्लामच्या नावावर लढत होतेच पण पाकिस्तानला काश्मीरमध्ये सामील करावं या मागणीसाठी मैदानात उतरले होते. हिजबुल मुजाहिद्दीन त्यावेळची सर्वांत शक्तिशाली कट्टरवादी संघटना झाली होती.
 
JKLF या संघटनेचं मात्र मोठं नुकसान झालं होतं. शेवटी त्यांनी 1994 मध्ये शस्त्रत्याग केला आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याची घोषणा केली.
 
त्यावेळी या स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी JKLF चं नेतृत्व यासिन मलिकच्या हातात होतं. मुजाहिद्दीनचं नेतृत्व सैय्यद सलाहुद्दीन पाकिस्तानहून करत होते.
 
दोघंही एकेकाळी एकमेकांबरोबर होते. 1987 च्या विधानसभा निवडणुकीत सैयद सलाहुद्दीन (खरं नाव सय्यद युसुफ शाह) विधानसभेला उभे होते आणि यासिन मलिक त्यांचे निवडणूक एजंट होते.
 
JKLF चे श्रीनगर भागातले माजी कमांडर सैफुल्लाह सुद्धा निवडणूक एजंट होते. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "यासीन मलिक माझा लहानपणाचा मित्र आहे. तो सलाहुद्दीनचा निवडणूक एजंट होता आणि ती निवडणूक आम्ही 35000 मतांनी जिंकली होतीच मात्र आमचा पराभव केला गेला आणि आम्हाला अटक करण्यात आली."
 
यासिन मलिकला दोषी ठरवलं आहे. त्यामुळे सैफुल्लाह खूश आहेत. सैफुल्लाह यांनी यासीन यांच्यावर हत्येचा आरोप लावला आणि म्हणाले की यासिनने आमच्या अनेक साथीदारांचा काटा काढला. ते भारताचे एजंट आहेत, असं त्याने तेव्हा सांगितलं होतं.
 
आज अल्लाहने त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिली आहे. आज माझा भाऊ उम्र खान, शब्बीर हुसैन आणि रियाज आणि इतर मरण पावलेलेल साथीदार हे सगळं वरून पाहत असतील, असंही ते पुढे म्हणाले.
 
"1994 मध्ये यासीन मलिकने भारताबरोबर शांती प्रकिया सुरू करण्याच्या नावावर संघर्ष विराम करण्याची घोषणा केली." असं सैफुल्लाह म्हणाले.
 
काश्मीर पंडितांचं पलायन
काश्मिरी पंडितांनी 1990 पासून काश्मीर खोऱ्यातून पलायन करायला सुरुवात केली. या पलायन JKLF आघाडीवर होती अशी धारणा होती. मात्र काश्मीर पंडितांच्या पलायनाला आम्ही सगळे जबाबदार आहोत, असं ते म्हणाले.
 
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटात बिट्टा कराटे आणि यासीन मलिक या दोघांना पलायनाला जबाबदार ठरवण्यात आलं होतं.
 
गुरुवारी NIA ने 2017 साली कट्टरवादी कारवायांना अर्थसहाय्य केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. मलिकने या आरोपांना आव्हान दिलेलं नाही.
 
त्यांनी या 'स्वातंत्र्य संग्रामासाठी' जम्मू काश्मीरमध्ये कट्टरवादी आणि इतर बेकायदा कृत्यांसाठी पैसा जमवण्याच्या उद्देशाने एक विस्तृत यंत्रणा स्थापन केली होती असाही आरोप आहे.
 
1983 मध्ये श्रीनगर मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून यासिन मलिक चर्चेत आहेत. त्यावेळी त्यांना अटक केली आणि चार महिन्यात सुटका करण्यात आली होती.
 
यासीन मलिक यांची काश्मीरमध्ये किती पकड?
ज्येष्ठ काश्मिरी पत्रकार संजय काव यांनी यासीन मलिक यांच्या कारवाया खूप जवळून अनुभवल्या आहेत. त्यांनी दिल्लीमधल्या तिलक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तरूण यासीन मलिकचा फोटोही घेतला होता.
 
ते सांगतात, "शब्बीर शाह आणि दिवंगत सय्यद अली शाह गिलानीसारख्या फुटीरतावादी नेत्यांप्रमाणे मलिक यांना सर्वांकडून समर्थन नव्हतं. काश्मिरमधल्या काही मर्यादित भागांमधूनच त्यांना लोकांचं समर्थन होतं. याचं मुख्य कारण म्हणजे काश्मिर खोऱ्यातले लोक त्यांच्याकडे 'डबल एजंट' म्हणून पाहायचे. ते भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या निमित्ताने स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी काम करतात, असं लोकांना वाटायचं."
 
यासीन मलिक यांना स्वातंत्र्य हवं होतं, मात्र चर्चेतून.
 
संजय काव सांगतात, "1990 च्या दशकात जेव्हा एकदा दिल्ली पोलिसांची चैकशी संपवून ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं की, काश्मीर की समस्या सोडविण्यासाठी सर्वांची एकत्र बैठक घेत चर्चेला सुरूवात करायला हवी."
 
पाकिस्तानची प्रतिक्रिया
पाकिस्तानने यासिन मलिकला पाठिंबा दिला आहे. यासिन मलिकच्या शिक्षेला विरोधक करताना त्याच्यावर भारताने खोटे खटले भरल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तसंच मानवाधिकारांच भारतानं उल्लंघन केल्याचा आरोपसुद्धा पाकिस्तानने केला आहे.
 
यासिन मलिकसाठी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांनी ट्वीट केलं आहे.
 
"मानवाधिकरांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा भारताचा प्रयत्न फोल ठरत आहे. यासिन मलिकवर ठेवण्यात आलेले आरोप खोटे आहेत. त्यातून ते काश्मीरच्या स्वतंत्र्याचा संघर्ष रोखू शकत नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी यामध्ये लक्ष घालावं," असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
 
आफ्रिदी यांच्या ट्वीटला भारतीय क्रिकेटर अमित मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "यासिन मलिक कोर्टात दोषी सिद्ध झाला आहे. तुमच्या जन्म तारखे प्रमाणे सर्व गोष्टी दिशाभूल करणाऱ्या नसतात," असं ट्वीट मिश्रा यांनी केलं आहे.
 




Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती