मधमाशांसाठीच्या जगातील पहिल्या लशीला अमेरिकेची मान्यता
सोमवार, 9 जानेवारी 2023 (21:59 IST)
मधमाशांसाठी जगातील पहिली लस वापरण्यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या बायोटेक कंपनीनुसार, अमेरिकन कृषी विभागाने या लशीला मंजूरी दिली आहे.
मधमाशांमध्ये होणाऱ्या फाऊलब्रूड आजारामुळे मधमाश्यांच्या अळ्यांवर जीवाणूजन्य हल्ला झाल्याने त्यांच्या वसाहती कमकुवत होतात. या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूपासून संरक्षण देण्यासाठी ही लस तयार केली गेली.
मधमाशा पर्यावरणाच्या अनेक पैलूंमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
ही लस मधमाशांचं संरक्षण करेल असा दावा दालान अनीमल हेल्थचे संस्थाचालक अनेट क्लिजर यांनी केला आहे.
राणी मधमाशीला खाण्यासाठी देण्यात येणाऱ्या रॉयल जेलीमध्ये निष्क्रिय बॅक्टेरिया सादर करत ही प्रक्रिया पार पडते. यामुळे नंतर अळ्या प्रतिकारशक्ती मिळवतात.
अमेरिकेच्या कृषी विभागानुसार, 2006 पासून मधमाशांच्या वसाहतींमध्ये घट झाली आहे. त्यांच्यानुसार, किटक, रोग अशा अनेक कारणांमुळे मधमाशांना धोका निर्माण होतो. तसंच कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर या प्रकारात कामकरी मधमाश्या पोळे सोडत राणीला मागे सोडतात.
मधमाश्या, पक्षी आणि वटवाघूळ जगाच्या सुमारे एक तृतीयांश पीक उत्पादनासाठी जबाबदार आहेत असं संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हटलं आहे.
परंतु अमेरिकन फाऊलब्रूड हा आजार मधमाशा पाळणाऱ्यांसाठी मोठं आव्हान आहे कारण हा आजार अत्यंत संसर्गजन्य असून त्यावर कोणताही इलाज नाही.
संक्रमित मधमाशांच्या वसाहतींना उपकरणांसह जाळणं आणि आसपासच्या वसाहतींचा उपचार अँटीबॉडीजने करणं ही एकच उपचार पद्धती आहे.
दालान अनीमल हेल्थनुसार, नवीन लशीमध्ये बॅक्टेरियाची निष्क्रिय आवृत्ती आहे, ज्यामुळे अमेरिकन फाऊलब्रूड आणि पेनिबॅसिलस लार्व्हा होतो.
कामकरी माशांनी राणी मधमाशीला दिलेल्या रॉयल जेलीमध्ये हा बॅक्टेरिया समाविष्ट केला जातो. काही लस मधमाशीच्या अंडाशयात ठेवतात.
किटकांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक्षमता या विषयात तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बायोटेक कंपनीनुसार, या लशीमुळे मधमाश्यांना रोगप्रतिकारशक्ती मिळते. यामुळे आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी होतं.
कॅलिफोर्नियातील बीकीपर संघटनेचे सदस्य ट्रेव्हर टॉझर यांनी म्हटलंय की, नवीन लस मधमाशा पाळणाऱ्यांसाठी रोमांचक पाऊल आहे.
ते म्हणाले, “मधमाश्यांच्या पोळ्यांमध्ये होणारा संसर्ग आपण रोखला तर आपण महाग उपचार टाळू शकतो आणि मधमाश्यांना निरोगी ठेवण्याच्या इतर पद्धतींकडे अधिक लक्ष देऊ शकतो.”
ही लस सध्या व्यावसायिक मधमाश्या पाळणाऱ्यांना वितरित करण्याची योजना आहे. तसंच यावर्षीपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल, असंही दालान म्हणाले.