इकडे बाबा जन्मदाखला घ्यायला आले, तिकडे नवजात जुळ्या मुलांचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात

बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (13:26 IST)
एक बाबा... आपल्या नुकत्याच जन्मलेल्या जुळ्या बालकांची नोंद करायला स्थानिक सरकारी ऑफिसात गेले. एकीकडे त्यांची नोंद होऊन जन्मदाखले मिळत असतानाच तिकडे त्यांच्या मुलांनी अखेरचा श्वास घेतला. हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना घडलीय गाझामध्ये. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात या जुळ्यांचा मृत्यू झाला आहे.

गाझातल्या युद्धाचे ढग अधिकाधिक गडद होत असताना मोहम्मद अबू अल कमसान यांना असर हा मुलगा आणि अयसेल ही मुलगी झाली. या जुळ्या बालकांचा चारच दिवसांपूर्वी जन्म झाला. त्यांच्या जन्माचे दाखले घेण्यासाठी मोहम्मद सरकारी कार्यालयात गेले होते.
ते घेऊन घरी परत असतानाच त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना बातमी सांगितली. ती म्हणजे तुमच्या घरावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तुमची दोन्ही मुलं, तुमची बायको आणि बाळांची आजी मृत्युमुखी पडलीय असं त्यांनी सांगितलं.
या घटनेनं हादरुन गेलेले मोहम्मद सांगतात, 'घरावर हल्ला झालाय एवढं समजलं, बाकी कळलंच नाही, मला मुलं झाल्याचा आनंदही साजरा करता आला नाही.'
या युद्धात आतापर्यंत 115 नवजात बालकं मृत्युमुखी पडल्याची माहिती हमास चालवत असलेल्या आरोग्य खात्यानं दिली आहे.
असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गाझा शहरात हल्ले करत असल्याची इस्रायलने सूचना दिली होती आणि गाझापट्टीतील मध्यभागात स्थलांतर करण्याची सूचना दिली होती. या सुचनेचं पालन या कुटुंबानं केलं होतं.
 
या हल्ल्यावर बीबीसीनं इस्रायलच्या लष्कराकडे प्रतिक्रिया मागितली आहे, ती अद्याप मिळालेली नाही.
 
आपण सामान्य नागरिकांवर हल्ले करणं टाळतो असा इस्रायल दावा करत आहे, तसेच हमास अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात कार्यरत आहे आणि रहिवाशी इमारतींचा वापर आश्रय़ घेण्यासाठी करत असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.
 
पण अशा एकेक सुट्या हल्ल्यांवर इस्रायलचे अधिकारी बोलत नाहीत.
गेल्या काही आठवड्यात अशा अनेक आश्रयस्थळांवर हल्ले झाले आहेत.
 
शनिवारी इस्रायलने गाझातल्या एका शाळेवर हल्ला केला. यात 70 लोकांचे प्राण गेले असं तेथिल रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितलंं आहे.
 
या शाळेचा उपयोग हमास आणि इस्लामिक जिहादी लष्करी कारवायांसाठी होत होता असा दावा इस्रायलने केला, हमासने हा दावा फेटाळून लावला आहे.
 
नक्की किती लोक मारले गेले यावर इस्रायलचे मत वेगळे आहे, तसेच बीबीसीनेही या आकड्याची स्वतंत्रपणे खातरजमा केलेली नाही.
इस्रायलवर हमासच्या शस्त्रधारी लोकांनी गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी हल्ला केला यात 1200 लोकांचे प्राण गेले आणि 251 लोकांना हमासने ओलीस ठेवले.
 
यानंतर इस्रायल आणि गाझातील हमास यांच्यात मोठं युद्ध सुरू झालं. या युद्धात 39,790 पॅलेस्टिनी नागरिक मेल्याचं सांगण्यात येत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती