गाझा येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले आहेत. या हल्ल्याचा आरोप इस्रायलवर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेत विस्थापित निर्वासितांनी आश्रय घेतला होता. इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांनी हमासच्या कमांड सेंटरला लक्ष्य केले आहे.
गाझा शहरातील अल-सहबा भागातील अल-तबायिन शाळेला लक्ष्य करून हा हल्ला झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. गाझा राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लोक फजरची नमाज अदा करत असताना निर्वासितांना इस्रायलच्या हवाई हल्ल्याने लक्ष्य करण्यात आले.' या हल्ल्यात 40 जण ठार तर डझनभर जखमी झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र, नंतर मृतांचा आकडा 100 च्या पुढे गेला.
गेल्या काही दिवसांत इस्रायलने गाझा आणि हमासच्या नेत्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी गोलान हाइट्स या इस्त्रायलच्या ताब्यात असलेल्या भागात हिजबुल्लाहने केलेल्या रॉकेट हल्ल्यात 12 मुले ठार झाली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने बेरूतमध्ये हिजबुल्लाच्या सर्वोच्च कमांडरला ठार केले. त्यानंतर अवघ्या 24 तासांनंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हानिया यांचीही हत्या करण्यात आली. यासाठी इस्रायललाही दोषी ठरवण्यात आले. हानियाच्या हत्येनंतर इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढला असून इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.