मोहम्मद देफ : हमासचा कमांडर मारला गेल्याचा इस्रायलचा दावा, अनेक दशकांपासून सुरू होता शोध
गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (19:30 IST)
हमासचा लष्करी कमांडर मोहम्मद देफ मारला गेला असल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. खान युनिस भागात इस्रायलनं 13 जुलैला केलेल्या हल्ल्यात मुख्य लक्ष्य तोच होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे.
इस्रायलच्या लष्करानं या हल्ल्यामध्ये गाझा शहरातील खान युनिसमधील एका कंपाऊंडला लक्ष्य केलं होतं. देफ त्यावेळी तिथंच होता, असं म्हटलं जात आहे.
या हल्ल्यात आणखी एक हमास कमांडर राफा सलामाह मारला गेल्याची माहिती इस्रायलच्या लष्करानं त्यावेळी दिली होती. पण देफच्या मृत्यूला मात्र तेव्हा इस्रायलनं दुजोरा दिला नव्हता.
सलामाह 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याच्या मास्टर माइंडपैकी एक होता, असं इस्रायलच्या लष्कराचं म्हणणं होतं.
इस्रायल एका मोठ्या नरसंहाराच्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हमासनं केला आहे.
मात्र, त्याठिकाणी फक्त हमासचे दहशतवादी होते कोणीही सामान्य नागरिक नव्हते असा दावा इस्रालयच्या लष्करानं केल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
पण गाझामध्ये हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार, इस्रायलनं खान युनिसच्या अल-मवासी परिसरात बॉम्ब हल्ले केले.
या हल्ल्यात सुमारे एक डझन लोक मारले गेले आणि ते सगळे निर्वासितांच्या छावणीत राहत होते, असा दावाही मंत्रालयानं केला आहे.
अनेक दशकांपासून होता शोध
मोहम्मद देफ अल-कासीम ब्रिगेडचा प्रमुख होता. इस्रायलच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये दीर्घकाळापासून त्याचा समावेश होता. देफने अनेक सैनिक आणि सामान्य नागरिकांची हत्या केली होती असा आरोप देफने केला होता.
देफचं खरं नाव मोहम्मद दियाब अल-मासरी होतं. त्याचा जन्म 1965 मध्ये खान युनिसमधील निर्वासितांच्या छावणीत झाला होता.
देफ एका गरीब कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झाला. वडिलांबरोबर तो काम करायचा. नंतर देफनं एक पोल्ट्री फार्म सुरू केलं. नंतर त्यांनी काही काळ ड्रायव्हर म्हणूनही काम केलं.
देफ या नावाचा अर्थ पाहुणा असा होतो. इस्रायलच्या लष्करापासून वाचण्यासाठी तो कधीच एका ठिकाणी थांबत नव्हता. त्यामुळं नावातूनच तसे संकेत मिळायचे.
त्याने इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझामधून विज्ञानात पदवीही घेतली होती. युनिव्हर्सिटीच्या मनोरंजन समितीचे तो प्रमुख होता. तसंच त्याने स्टेजवर अनेक विनोदी नाटकांतही सहभाग घेतला होता.
शिक्षण सुरू असतानाच देफनी मुस्लीम ब्रदरहूड जॉइन केलं होतं.
1987 मध्ये इस्रायलच्या विरोधात लढण्यासाठी हमासची स्थापना झाली होती. देफ त्यात सहभागी झाला होता.
इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी 1989 मध्ये देफला अटक केली होती. त्यावेळी तो 16 महिने तुरुंगात राहिला. त्याच्यावर हमासच्या मिलिट्री विंगसाठी काम करण्याचा आरोप होता.
देफ हा हमासची मिलिट्री विंग अल-कासीमच्या सह-संस्थापकांपैकी एक होता.
वेस्ट बँकमध्ये असलेल्या कासीम ब्रिगेडच्या शाखेचंही काम तो पाहायचा.
2002 मध्ये हमासच्या संस्थापकांपैकी एक आणि त्यांच्या मिलिट्री विंगचे प्रमुख सलाह शेहदेह यांचा इस्रायलच्या एका हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर देफ अल-कासीम ब्रिगेडचे प्रमुख बनला.
2015 मध्ये अमेरिकेनं त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केलं होतं.
युरोपीय संघानंही डिसेंबर 2023 मध्ये दहशतवाद्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट केलं होतं.
हत्येचा प्रयत्न
इस्रायलमध्ये 1996 मध्ये झालेल्या बसमधील बॉम्ब स्फोटांच्या दुर्घटनेमागं असल्याचा आरोप देफवर होता. त्या हल्ल्यांत अनेकांचा मृत्यू झाला होता. नव्वदच्या दशकात तीन इस्रायली सैनिकांना मारल्याचा आरोपही त्याच्यावर होता.
इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यात याह्या सिनवार यांच्यासह दिएफही मास्टरमाइंड असल्याचा आरोपही त्याच्यावर होता.
हमासचं प्रमुख शस्त्रं कासीम रॉकेटमागंही तोच असल्याचं म्हटलं जातं.
गाझामध्ये असलेल्या जमिनीखालील सुरुंगांच्या जाळ्यामागंही त्याची प्रमुख भूमिका होती.
देफ यांनी त्यांच्या जीवनातील बहुतांश काळ या सुरुंगांमध्येच घालवला, असंही म्हटलं जातं.
सात वेळा बचावले
देफ यांच्याबाबत फार काही माहिती उपलब्ध नाही. पण पॅलिस्टिनी त्यांच्याकडं मास्टरमाइंड म्हणून पाहायचे. इस्रायलच्या नजरेत मात्र ते वारंवार जीव वाचवण्यात यशस्वी होणारे व्यक्ती होते.
2001 पासून आतापर्यंत देफला मारण्यासाठी सात वेळा प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळी तो बचावण्यात यशस्वी झाला असं म्हटलं जातं.
यापैकी 2002 मध्ये झालेला हल्ला त्यांच्यासाठी सर्वांत घातक होता. त्या हल्ल्यातून देफ बचावला असला तरी त्यात त्याने एक डोळा गमावला होता.
देफला एक पाय आणि एक हातही नव्हता तसंच त्याला बोलण्यातही अडचण येत होती, असंही इस्रायलचं म्हणणं आहे.
2014 मध्येही इस्रायलच्या सुरक्षादलांनी देफला मारण्याचा प्रयत्न केला होता. गाझा पट्टीमध्ये झालेल्या या हल्ल्यातून देफ बचावला पण त्याची पत्नी आणि दोन मुलांचा यात जीव गेला होता.
त्यानंतर मात्र, देफबाबत फारशी माहिती मिळत नाही. त्याचे आतापर्यंतचे फक्त तीन फोटो समोर आले आहेत.
एका फोटोची तारीख माहिती आहे. दुसऱ्यामध्ये त्याचा चेहरा झाकलेला आहे तर तिसऱ्यात फक्त त्याची सावली दिसते.