फिलीपिन्समध्ये लष्कराच्या विमानाला अपघात, मृतांची संख्या 15 वर पोहोचली
रविवार, 4 जुलै 2021 (13:10 IST)
दक्षिण फिलीपिन्समध्ये लष्कराचं विमान कोसळलं. या विमानात 85 जण होते. फिलीपिन्स लष्करप्रमुखांनी या घटनेची माहिती दिली.
नरल सिरिलिटो सोबेजाना यांनी AFP या वृत्तसेवा संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, C-130 हे विमान सुलु प्रांताच्या जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळलं.
विमान कोसळल्यानंतर आग लागली.
आतापर्यंत या दुर्घटनेत 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 40 जणांना वाचवण्यात यश आलंय.
सोबेजाना यांनी सांगितलं की, बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानातील लोकांना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
AFP च्या वृत्तानुसार, नुकतीच लष्करी प्रशिक्षणाची पदवी प्राप्त केलेले सैनिक या विमानात होते. मुस्लीमबहुल अशांत क्षेत्रात कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी त्यांना तैनात केलं जाणार होतं.
दक्षिण फिलीपिन्समध्ये अनेक कट्टरतावादी गट आहेत. त्यामुळे तिथं मोठ्या संख्येत सैनिक तैनात असतात.