काही प्रमाणात लस फुकट जाणं स्वाभाविक आहे. मालावी नावाच्या देशात लशींचे हजारो डोस टाकून देण्यात आले.
मालावी देशाने लशीसंदर्भात पारदर्शकता दाखवत कोव्हिड-19 लसीचे 20,000 डोस नष्ट केले. मालावीच्या आरोग्य प्रशासनाने सांगितलं की त्यांनी अॅस्ट्राझेनका लशीचे 19,610 डोस नष्ट केले. लोकांना देण्यात येणारी लस सुरक्षित असावी यावर भर देण्यात येत आहे.
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के जनतेचं लसीकरण झालं आहे. अशा परिस्थितीत लस टाकून देणं कितपत व्यवहार्य आहे?
बहुतांश लशी वाया जात नाहीत, असं युकेतल्या लिव्हरपूल इथल्या जॉन मूर्स विद्यापीठात सप्लाय चेन मॅनेजमेंट विषयाच्या ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. सारा स्किफलिंग यांनी सांगितलं.
कोव्हिड लशीसंदर्भात सर्वसमावेशक आकडेवारी आमच्या हातात नाही. त्यामुळे एक्सपायरी डेट संदर्भात आम्ही पारंपरिक पवित्रा स्वीकारला आहे. लशीचं आयुषमान अल्पावधीचं असतं. लस लवकरात लवकर दिली जाणं अपेक्षित आहे.
मालावीला 102,000 अॅस्ट्राझेनकाचे डोस 26 मार्च रोजी देण्यात आले. या लशीची एक्सपायरी डेट 13 एप्रिल होती. मालावीने 80 टक्के लस उपयोगात आणत जास्तीतजास्त नागरिकांना लस दिली.
लस का नष्ट करावी लागते?
लस टाकून द्यावी लागणं हे खरोखरंच खूप वाईट आहे असं डॉ.स्निफलिंग सांगतात. मला यामागचं कारण कळू शकतं. मालावीमध्ये लशीला खूप विरोध आहे. लोक लस घ्यायला तयार नाहीत.
मालावीच्या मुख्य आरोग्य सचिवांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "लस टाकून देणं दुर्देवी आहे. पण लस टाकून दिली यामागची कारणं समजून घेतली तर लस नष्ट का केली हे समजू शकेल".
निर्धारित तारीख उलटून गेलेली लस आम्ही देत आहोत हे लोकांना समजलं तेव्हा लस घ्यायला लोकांचा प्रतिकार दिसू लागला, असं डॉ. चार्ल्स वासांबो यांनी सांगितलं.
आम्ही लस नष्ट केली नाही तर त्यांना असं वाटेल की आम्ही एक्सपायरी डेट उलटून गेलेली लस त्यांना देत आहोत. लस घेण्यासाठी नागरिक आले नाहीत तर त्यांना कोरोना होण्याचा मोठा धोका आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी निर्धारित तारखेपर्यंत लस वापरली नाही याचं कारण म्हणजे लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणं कठीण आहे. लोक लसीकरण केंद्रात येऊन लस घ्यायला तयारच नाहीत, असं डॉ. वासांबो सांगतात.
दक्षिण सुदानमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. आफ्रिकन युनियनच्या माध्यमातून सुदानला लशीचा पुरवठा करण्यात आला. निर्धारित तारीख उलटून गेलेल्या लशीचे 59,000 डोस दक्षिण सुदानकडे होते.
जागतिक आरोग्य संघटनेने सुरुवातीला तारीख उलटून गेलेल्या लशींचे डोस ठेवा असं सांगितलं. वापराची तारीख वाढवता येऊ शकते याची चाचपणी करण्यात आली, मात्र आता या लशींचे डोस नष्ट करा असा आदेश देण्यात आला आहे.
लस नष्ट करावी लागणं हा लशीकरण मोहिमेतला सगळ्यात दुर्देवी भाग आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार तारीख उलटून गेलेल्या लशींचे डोस सुरक्षितरीत्या नष्ट करायला हवेत.
कोव्हॅक्स योजनेअंतर्गत लशीच्या पुरवठ्याचं समन्वयन 'गावी' कडे होतं. अॅस्ट्राझेनकाला मंजुरी मिळाल्यानंतर उत्पादकांनी लशीचं घाऊक उत्पादन घेतलं आणि जेवढ्या लशींचा साठा करता येईल तेवढा केला. यामुळे निर्धारित तारीख फारच जवळ आलेल्या लशींचे डोस बाजारात आले. यामुळे त्यांचं आयुष्यमान कमी होतं.
कोव्हॅक्स योजनेचे लाभार्थी देशांना लशीच्या निर्धारित तारखेसंदर्भात कल्पना देण्यात आली. देशांची लस देण्याची पूर्ण तयारी झाल्यानंतरच त्यांना लशीचा पुरवठा करण्यात आला, असं गावीच्या प्रवक्त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
स्टॅबिलिटी डेटा उपलब्ध झाल्याने लशींची निर्धारित तारीख वाढवली जाणंही शक्य होऊ लागलं. यासंदर्भात झालेल्या निर्णयाची माहिती संबंधित देशाच्या राष्ट्रीय नियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात येईल.मात्र लशींची नासाडी फक्त आफ्रिकेतील देशांमध्ये होत नाहीये.
कशामुळे लस फुकट जाते?
केएनएच, या अमेरिकास्थित आरोग्य वृत्त संस्थेने तयार केलेल्या अहवालानुसार, अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांच्याकडून 182, 874 लशींचे डोस मार्च महिन्यात टाकून देण्यात आले. जानेवारीत अमेरिकेत लसीकरणाला सुरुवात झाली.फ्रान्समध्ये एक डॉक्टर अॅस्ट्राझेनकाची लस नष्ट करत असतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
डॉ. पॅट्रिक व्होग्ट यांनी सांगितलं, "कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तूर्तास तरी लस हाच सर्वोत्तम पर्याय आहे. पण आता या लशीच्या वापराची निर्धारित तारीख उलटून गेली आहे त्यामुळे या लशींचे डोस नष्ट करण्यावाचून माझ्याकडे पर्याय नाही. त्यामुळे ऐन कोरोना संकटात कोरोना लशींचे डोस मी नष्ट करतो आहे. कारण आता हे कोणी वापरू शकत नाही."
डॉ. लिझ ब्रीन यांच्या मते लस वाया जाण्यात काहीच नवीन नाही. ब्रॅडफोर्ड विद्यापीठात सप्लाय चेन मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणून त्या काम करतात. कोरोना पसरण्याआधी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दैनंदिन वापरात येणाऱ्या लशी 50 टक्के वाया जातात. मात्र कोरोनासारख्या विशिष्ट लशींच्या बाबतीत हे प्रमाण खूपच कमी असतं.
लशींचे डोस वाया जातातच. त्याचं प्रमाण कमीत कमी कसं ठेवता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. यासाठी लशींच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. लस देण्याचं आणि घेण्याचं योग्य प्रशिक्षण हेही आवश्यक आहे. मात्र असं असलं तरी लशीचे डोस वाया का जातात हे समजणं अवघड आहे.
कोरोना लशींचे नेमके किती डोस वाया जातात याची नेमकी आकडेवारी देणं अवघड आहे. कदाचित प्रदीर्घ काळानंतर लशींच्या नष्ट होण्याबाबत ठोस आकडेवारी आपल्यासमोर येईल असं डॉ. ब्रीन यांनी सांगितलं.
कोरोना काळात लशीला प्रचंड मागणी आहे. अशावेळी लशींचे डोस वाया गेले किंवा टाकून देण्यात आले असं कोणालाच ऐकायला आवडत नाही. लशींचा साठा करण्यात आला आहे असं काही कानी येणं वातावरण भडकावू शकतं.
सरकार आणि संबंधित संस्थांसाठीही लशीचा अपव्यय होणं उचित नाही. मालावीत जे घडलं ते अतिशय पारदर्शक होतं. मालावीप्रमाणे अन्य देशांमध्येही असं घडलेलं असू शकतं. आमच्या इथे लशींचे डोस टाकून देण्यात आले असं खुलेपणाने कोणी सांगणार नाही, कारण त्यामुळे समाजात भीतीचं, गोंधळाचं वातावरण पसरू शकतं.
खुला अपव्यय
ओपन वायल वेस्ट अशी परिस्थिती फ्रान्समध्ये उदभवली होती. लशींचे डोस खुले करण्यात आले मात्र सगळ्यांचा वापर करण्यात आला नाही.
कोरोनावरच्या लशी मल्टी डोस व्हायल अर्थात बहुविध कुप्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. मांडणी आणि वाहतुकीच्या दृष्टीने तसंच आर्थिकदृष्ट्या ते सोयीचं होतं. सध्या फायझर लस पाच डोसांची एक कुपी अशी दिली जाते. अस्ट्राझेनकाच्या एका कुपीत आठ ते दहा लशींचे डोस असतात. मॉडर्ना लशीच्या कुपीत दहा डोस असतात.लशींचे उत्पादक एका कुपीत जास्तीत जास्त डोस भरतात. कमीत कमी लशींचे डोस वाया जावेत यासाठी हे केलं जातं.
अमेरिका, युरोप आणि युकेतील वैद्यकीय संघटनांनी आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. फायझर लशीच्या एका कुपीत सहा लशीचे डोस असू शकतात जेणेकरून अपव्यय टाळता येईल.
सायन्स मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेत लशींची नासाडी होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे अचूक आकाराची सीरिंज उपलब्ध न होणं.
डॉ. स्निफलिंग यांना हा गंभीर मुद्दा वाटत नाही. नागरिकांना लस टोचली जाईपर्यंतच्या प्रक्रियेत खूप गोष्टींमध्ये गडबड होऊ शकते. कोल्ड चेन स्टोरेज, निर्धारित तारीख उलटून जाणं, मागणी-पुरवठा प्रमाण व्यस्त होणं- लस घेण्यासाठी एखाद्या केंद्रावर किती लोक आले आणि किती लोकांसाठी लस उपलब्ध आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात.
मी लस घेण्यासाठी वेळ नोंदवली आहे असं केंद्रात आलेल्या प्रत्येकाने सांगायला हवं. अनेकदा कुपीतून लशींचे डोस उघडले जातात. उघडल्या गेलेल्या लशींचे डोस देणे आवश्यक असतं. अशावेळी घाईघाईने काही लोकांना बोलावलं जातं.
क्लोज्ड वायल वेस्ट
मालावीमध्ये लशींचा वापर होण्याआधीच त्यांची निर्धारित तारीख उलटून गेली होती. हे क्लोज्ड वायल वेस्टचं उदाहरण आहे. कोल्ड चेन म्हणजे शीतकपाटात लस साठवली जाते ती सुविधा खंडित झाली तर फटका बसू शकतो. वायल्स वाहतुकीदरम्यान तसंच साठवणुकीदरम्यान योग्य तापमानात ठेवल्या जात नाहीत.
लशींच्या पुरवठ्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा आवश्यक आहेत असं डॉ.स्निफलिंग यांना वाटतं. इस्रायल, बहरीन, युएई या देशांनी यशस्वी लसीकरण मोहिमा राबवल्या. यशाचं श्रेय या देशांमधील अतिशय सुसज्ज अशा पायाभूत यंत्रणेला जातं. वाहतुकीरदरम्यान लशीची काळजी घ्यावी लागते. या देशांनी त्याबाबत जागरुकता दाखवली आहे.
आफ्रिका, इंडोनेशिया यासारख्या भागांमध्ये दुर्गम प्रदेश असल्याने पायाभूत सुविधा हा लशींच्या साठवणुकीतला आणि वाहतुकीमधला अडसर ठरू शकतो. लशीसाठी आवश्यक तापमान राखणं अवघड आहे.
मालावीसारखं अन्य देशांमध्येही घडू शकतं म्हणजेच लशींचे डोस देण्याआधीच त्यांची निर्धारित तारीख उलटून गेलेली असू शकते.
अॅस्ट्राझेनका लस साध्या फ्रीजमध्ये सहा महिन्यांपर्यंत ठेवता येते. आफ्रिकन युनियनने फेब्रुवारीत पाठवलेल्या लशींची निर्धारित तारीख 13 एप्रिल होती. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने या लशींचा वापर करायचा नाही असं ठरवलं. त्या देशात कोरोनाच्या व्हेरियंटविरोधात ही लस पुरेसं संरक्षण देऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मार्च महिन्यात लशीचे एक दशलक्ष डोस आफ्रिकन युनियनला देण्यात आले होते.दक्षिण सुदानने मात्र लशींच्या निर्धारित तारखेविषयी माहीत नसल्याचं सांगितलं.
अतिरिक्त लशींच्या डोसचं करायचं काय?
कोरोना लसीकरण मोहीम ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे असं डॉ.स्निफलिंग यांनी सांगितलं.आपण काही शे कोटी डोसांबाबत चर्चा करत आहोत. लशींचा अपव्यय होणं साहजिक आहे.
कोरोनासारख्या संकटात देशांनी मागणी-पुरवठा व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर दयावा. काही देशांच्या हे लक्षात आलंय अतिरिक्त डोसचा उपयोग करून शकणार नाही ते हे डोस अन्य देशांना देत आहेत.
आम्हाला लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र आम्ही सगळा साठा वापरू शकत नाही, असं नायजेरियाने स्पष्ट करत अतिरिक्त साठा टोगो आणि घाना या देशांना दिला. काहींनी तर जमैकालाही लशींचे अतिरिक्त डोस पुरवले.
द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोला अॅस्ट्राझेनका लशीचे 1.7 दशलक्ष डोस मिळाले आहेत. आम्ही एवढ्या लशीचा उपयोग करू शकत नाही, असं काँगोने स्पष्ट केलं आहे. ग्लोबल कोव्हॅक्स योजनेअंतर्गत त्यांना लशीचा पुरवठा करण्यात आला होता.
एप्रिलच्या अखेरीपर्यंत जेमतेम हजार डोसचा वापर काँगोने केला होता. 24 जून निर्धारित तारीख असलेले हे डोस घाना आणि मादागास्कर या देशांना देण्यात आले.
'गावी'च्या प्रवक्त्याने सांगितलं की, निर्धारित तारखेच्या मुद्यामुळे लशींचे अतिरिक्त डोस लवकरात लवकर अन्य देशात पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. लस वाया जाऊ नये यासाठी लस ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
लोकांचा लसीकरण मोहिमेवरचा विश्वास कायम राहावा यादृष्टीने मालावी देशाने लशींचे डोस नष्ट करण्याची कृती योग्यच होती, असं जाणकारांना वाटतं.
निर्धारित तारीख उलटून गेलेल्या लशींच्या नष्ट होण्याबाबत जनतेला कळणं निराशाजनक आणि अस्वस्थ करणारं आहे असं डॉ. ब्रीन यांनी सांगितलं. अॅस्ट्राझेनका लशीची लोकप्रियता यामुळे कमी झाली आणि विश्वासाला धक्का बसला.
निर्धारित तारीख उलटून गेलेली लस आपल्याला देण्यात येईल या भीतीनेही लोक लस घेण्याला प्रतिकार करत असतील. पण ही शक्यता खूपच धूसर आहे.
डॉ.स्निफलिंग सांगतात की निर्धारित तारीख उलटून गेल्यानंतर लशीमध्ये मोठा बदल घडत नाही. अशी लस घेतल्याने माणसाचा मृत्यू वगैरे होत नाही. मात्र त्यांची परिणामकारकता कमी होते. एखाद्या व्यक्तीला अशी निर्धारित तारीख उलटून गेलेली लस देण्यात आली, त्या माणसाला नंतर कोरोना झाला, त्याच्या माध्यमातून आणखी कोणाला तरी संसर्ग झाला तर विश्वास कमी होतो.
लशीचे डोस नष्ट होण्याबाबत पारदर्शकता अभावानेच आढळते, मात्र प्रचंड अशा व्यापक लसीकरण मोहिमेत लशीचा अपव्यय साहजिक आहे.हे धक्कादायक आणि दु:खद आहे परंतु हे खरं आहे असं डॉ. स्निफलिंग सांगतात.