कोरोना लॉकडाऊन: युरोपात कशाप्रकारे उठवला जात आहे लॉकडाऊन?
सोमवार, 28 जून 2021 (15:33 IST)
युरोपमध्ये कोव्हिड-19 लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळं अनेक देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण घटत चाललं आहे.
उन्हाळी पर्यटकांचा हंगाम जवळ येत असल्यामुळं आता हळुहळू लॉकडाऊनही उठवायला सुरुवात झाली आहे. तसंच 1 जुलैपर्यंत सपूर्ण युरोपमध्ये डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र दिलं जाण्याचीही शक्यता आहे.
फ्रान्स
देशभरात लागू करण्यात आलेला कर्फ्यू 20 जून रोजी उठवण्यात आला. नियोजित कालावधीपेक्षाही 10 दिवस आधीच कर्फ्यू हटला आहे. तसंच बाहेर फिरण्यासाठी मास्क परिधान करणंही इथं अनिवार्य नाही.
रेस्तरॉं, कॅफे आणि बार आता ग्राहकांना सेवा देऊ शकतील. त्यासाठी क्षमतेच्या 50 टक्के आणि प्रत्येक टेबलवर जास्तीत जास्त सहा व्यक्ती अशी मर्यादा आहे.
सार्वजिनक कार्यक्रम 30 जूनपासून सुरू होतील आणि नाईट क्लब हे 9 जुलैपासून (75% क्षमतेसह) सुरू होणार आहेत. याठिकाणी उपस्थित राहण्यासाठी पूर्ण लसीकरण झाल्याचा आरोग्य पास किंवा 72 तासांतील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट याची आवश्यकता असेल. यापूर्वी कोरोनाची लागण होऊन गेली असेल त्यांनाही प्रवेश दिला जाईल.
जर्मनी
जर्मनीमध्ये रेस्तरॉं, बार, बीअर गार्डन, संग्रहालयं, हॉटेल आणि कॉन्सर्ट हॉल खुले झाले आहेत.
दुकानं आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान मास्क परिधान करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
संसर्गाचं प्रमाण वाढलेल्या भागात स्थानिक प्रशासनाला कठोर नियम लावण्याचे अधिकार आहेत.
30 जूनपासून वर्क फ्रॉम होम अनिवार्य नसेल.
इटली
21 जूनला इटलीमधील कर्फ्यू हटवण्यात आला आहे. येथील उत्तर पश्चिम भागातल्या व्हॅले डिओस्ता वगळता संपूर्ण देश सर्वांत कमी धोकादायक पातळी "व्हाईट झोन" (white zone)मध्ये आला आहे.
सोशल डिस्टन्सिंग (1मीटर), मास्क परिधान करणं प्रामुख्यानं इनडोअर परिसरात (गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणीही) आणि मोठ्या गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम तसंच हाऊस पार्ट्यांवरील बंदी, असे काही निर्बंध अजूनही लागू आहेत.
नाईटक्लब्स आणि डिस्कोदेखील बंद आहेत.
डेन्मार्क
नाईटक्लब वगळता इतर सर्व इनडोअर व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.
सरकारनं एप्रिल महिन्यात कोरोना पास सुरू केले. युरोपात असं करणारा डेन्मार्क पहिला देश ठरला.
तुमचं लसीकरण झालेलं असेल, तुम्हाला यापूर्वी कोरोना होऊन गेला असेल किंवा 72 तासांत तुमची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा उल्लेख त्या पासमध्ये असतो. हा फोनवर किंवा प्रिंटही दाखवता येईल.
सिनेमागृह, संग्रहालयं, सलूनमध्ये किंवा इनडोअर डायनिंगसाठी प्रवेशापूर्वी हा पास दाखवावा लागतो.
ग्रीस
सरकार याठिकाणी अनेक देशांतील पर्यटकांचं स्वागत करत आहे. त्यासाठी कोरोनाचं पूर्ण लसीकरण किंवा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागतो.
सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणं अनिवार्य आहे. रात्री 01:30-05:00 वाजेदरम्यान कर्फ्यू कायम आहे. पण बार, रेस्तरॉ, संग्रहालयं आणि ऐतिहासिक (पुरातत्व) स्थळ सर्व सुरू आहे.
पोलंड
सिनेमागृह, नाट्यगृह, संग्रहालयं आणि रेस्तरॉ 50% क्षमतेसह सुरू करण्यात आली आहेत. 26 जूनपासून ही क्षमता 75% केली जाणार आहे.
नाईटक्लब आणि डिस्कोदेखील 150 जणांच्या मर्यादेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बंद हॉल किंवा अशा ठिकाणी मास्क परिधान करणं अनिवार्य असून 1.5 मीटरचं सोशल डिस्टन्स गरजेचं असेल.
स्पेन
दुकानं, बार, रेस्तरॉं आणि संग्रहालयं सुरू करण्यात आली आहेत. मात्र बहुतांश सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणं अनिवार्य आहे.
स्पेनच्या ज्या भागात संसर्गाचं प्रमाण कमी आहे, तिथं नाईटक्लब पुन्हा सुरू करायला परवानगी दिली जात आहे.
बार्सिलोनामध्ये 50% क्षमतेची मर्यादा घालण्यात आली असून रात्री 03:30 पर्यंत नाईटक्लब खुले राहतील. डान्सर्सना मास्क परिधान करावे लागेल.
स्पेनमध्ये लसीकरण झालेल्या नागरिकांना 7 जून पासून प्रवेश दिला जात आहे. बहुतांश प्रवाशांना अजूनही कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवणं गरजेचं आहे.
बेल्जियम
याठिकाणी दुकानं, सिनेमागृहं, जिम आणि रेस्तरॉ काही निर्बंधांसह सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना चार जणांपर्यंत मित्र, पाहुण्यांना घरी बोलावता येईल.
परिस्थितीत सुधारणा होत राहिली तर 1 जुलैपासून वर्क फ्रॉम होमची अट शिथिल केली जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम, शो, क्रीडा स्पर्धा यांनादेखील मर्यादीत संख्येसह परवानगी देण्यात येत आहे. तसंच विवाह, इतर सोहळे आणि पार्ट्यांसाठी उपस्थितांच्या संख्येच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
पोर्तुगाल
पोर्तुगालमध्येही बहुतांश निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र इनडोअर परिसरात आणि काही ठिकाणी बाहेरही मास्क परिधान करणं अनिवार्य असेल.
बार आणि नाईटक्लबला अद्याप परवानगी दिलेली नाही. तसंच सार्वजिनक ठिकाणी मद्यपान करणं अवैध ठरवण्यात आलं आहे. कॅफे आणि रेस्तरॉमध्ये मात्र मद्यपान करता येईल.
रात्री 9 नंतर मद्यविक्री करता येणार नाही. खाद्यपदार्थ किंवा जेवणाबरोबर मात्र मद्याची विक्री करता येईल.
रेस्तरॉं, कॅफे आणि सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 1 वाजता बंद करावे लागतील. प्रवेशाच्या संख्येवरही मर्यादा आहेत.
लिस्बनमध्ये वीकेंडला प्रवासावर बंदी घातली आहे. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी 3 वाजेपासून ही बंदी सुरू होते. नागरिकांना केवळ अनिवार्य कारणांसाठी प्रवासाची परवानगी दिली जात आहे.
लिस्बन आणि अल्बुफेरी (अल्ग्रेव्ह) मध्ये कॅफे, रेस्तरॉं आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं वीकेंडला दुपारी 03.30 वाजता आणि इतर दिवशी रात्री 22:30 वाजता बंद करण्याचे आदेश आहेत.
नेदरलँड
इथंही रेस्तरॉं, कॅफे आणि ऐतिहासिक वास्तूदेखील सुरू करण्यात आल्या आहेत. याठिकाणी मर्यादीत संख्येत प्रवेश दिला जात आहे.
26 जूनपासून काही निर्बंध उठवण्यास सुरुवात झाली आहे.
दारुची विक्री रात्री 10 नंतरही करता येत असून नाईट क्लबदेखील सुरू झाले आहेत. याठिकाणी प्रवेशासाठी पासची पद्धत असेल.
सिनेमागृह, सभागृह अशा ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या अटी असतील.
सार्जनिक वाहतूक, विमानतळं आणि शाळा वगळता इतर ठिकाणी मास्कची अटदेखील रद्द केली आहे.
आयर्लंड
रेस्तरॉं आणि बारमधली सेवा जून महिन्यात सुरू करण्यात आली आहे. थीम पार्क, फन फेअर, सिनेमागृहं, जिम, जलतरण तलावदेखील सुरू करण्यात आले आहेत.
5 जुलैपासून बार आणि रेस्तरॉंमध्ये ग्राहकांना इनडोअर सेवाही देता येईल. विवाह आणि इतर कार्यक्रमात 50 लोकांसह परवानगी असेल. इतर ठिकाणच्या कार्यक्रमासाठी मर्यादा वाढवली जाणार आहे.
स्वीडन
जून महिन्यापासून रात्री 10.30 पर्यंत पब सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच क्रीडा स्पर्धा, सार्वजनिक कार्यक्रम, सिनेमागृह, बाजारपेठा याठिकाणी प्रवेशाच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे.
1 जुलैपासून खासगी कार्यक्रमातील संख्येची मर्यादा वाढवली जाणार आहे. तसंच इतर बंधनंही हटवली जाणार आहेत.
त्यानंतर 15 जुलै आणि पुढे सप्टेंबरमद्ये निर्बंध आणखी शिथिल करण्याची योजना आहे.