बुधवारी उड्डाणानंतर अवघ्या १४ सेकंदात पृथ्वीवरून अवकाशात पोहोचण्याचा प्रयत्न करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला रॉकेट कोसळला. 'गिलमोर स्पेस टेक्नॉलॉजीज'ने प्रक्षेपित केलेले एरिस हे रॉकेट ऑस्ट्रेलियामध्ये डिझाइन केलेले आणि बनवलेले पहिले ऑर्बिटल लाँच रॉकेट होते, जे देशातून प्रक्षेपित करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार क्वीन्सलँड प्रांताच्या उत्तरेकडील बोवेन जवळील एका अंतराळ केंद्रातून चाचणी उड्डाणात ते प्रक्षेपित करण्यात आले. ऑस्ट्रेलियन वृत्त माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये, २३ मीटर उंच रॉकेट प्रक्षेपण टॉवरवरून वर येताना दिसले आणि नंतर ते गायब झाले. घटनास्थळावरून धुराचे ढग उठताना दिसले. या दरम्यान कोणीही जखमी झाले नाही 'गिलमोर स्पेस टेक्नॉलॉजीज'ने प्रथम मे महिन्यात आणि नंतर या महिन्याच्या सुरुवातीला रॉकेटच्या प्रक्षेपणाची योजना आखली होती, परंतु तांत्रिक समस्या आणि खराब हवामानामुळे ती कामे रद्द करण्यात आली.