पाकिस्तानात ननकाना साहिब गुरुद्वारेवर दगडफेक

शनिवार, 4 जानेवारी 2020 (11:11 IST)
शिखांसाठी पवित्र असलेल्या ननकाना साहिब या पाकिस्तानातल्या गुरुद्वारेवर दगडफेक झाली आहे. प्राथमिक रिपोर्टनुसार संतप्त जमावानं या गुरुद्वारेला घेरलं होतं.
 
जगभरातल्या शिखांसाठी ही गुरुद्वार अत्यंत पवित्र आहे. गुरुनानक यांचं हे जन्मस्थान आहे. हे ठिकाण लाहोरपासून दिड तासांच्या अंतरावर आहे. हजारोंच्या संख्येनं शिख भाविक इथं दर्शनासाठी जात असतात.
 
एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहिती नुसार एका तरुणाच्या नेतृत्वाखाली त्याच्या कुटुबियांनी आणि इतरांनी ही दगडफेक केली. या तरुणावर गुरुद्वारेतल्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीच्या अपहरणाचे आरोप आहेत.
 
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अपिल केलं आहे.
 
"मी इम्रान खान यांना अपिल करतो की त्यांनी या घटनेची तातडीनं दखल घ्यावी. तिथं अडकून पडलेल्या भाविकांना सुखरूप बाहेर काढावं. तसंच या ऐतिहास गुरुद्वारेचं रक्षण करावं," असं ट्वीट अमरिंदर सिंह यांनी केलं आहे.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच या घटनेची निंदा केली आहे.
 
अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह यांनी या घटनेचा एक व्हीडिओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये काही लोक या गुरुद्वारेबाहेर शिखांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती