ISIS : इराकमध्ये कट्टरतावाद पुन्हा डोकं वर काढत आहे?
ओर्ला गुरीन
इराकमध्ये इस्लामिक स्टेट (आयएस) पुन्हा संघटना बांधणी करत असल्याचे संकेत मिळत आहेत. दोनच वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेटनं इराकमधल्या आपल्या वर्चस्वातील शेवटचा प्रांतही गमावला होता.
कुर्दीश आणि वेस्टर्न इंटेलिजिन्सच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं, की आयसिसचं इराकमधलं आताचं अस्तित्व म्हणजे अत्याधुनिक बंडखोरीसारखं आहे. शिवाय, आयसिसचे हल्लेही वाढत आहेत.
कुर्दीश दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख लाहूर तालाबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-कायदापेक्षा आताचे कट्टरतावादी अधिक कौशल्यपूर्ण आणि अधिक विघातक आहेत.
"त्यांच्याकडे उत्तमोत्तम तंत्र, डावपेच आणि त्यासाठी पुरेसा पैसाही आहे. ते वाहनं, शस्त्र, अन्न आणि साहित्य खरेदी करण्यास सक्षम आहेत. ते तंत्रज्ञानातही तरबेज आहेत. त्यांना बाहेर काढणं अधिक कठीण आहे. ते अल्-कायदासारखेच आहेत," असंही लाहूर तालाबानी सांगतात.
टर्कीविरुद्ध लढण्यासाठी आता कुर्दांनी केला सीरियासोबत करार
टर्की आणि सीरियामधल्या संघर्षाचं कारण तरी काय आहे?
उत्तर इराकच्या कुर्दीस्तान प्रदेशातल्या डोंगरांमध्ये सुलामेनियामध्ये वाढत असलेल्या एका संघटनेबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. या संघटनेनं गेल्या वर्षभरात पुन्हा एकदा आपल्या खिलाफतीचं पुनरुज्जीवन करायला सुरूवात केलीये.
तालाबानी यांनी सांगितलं, "कारवाया वाढल्याचं दिसतंय. त्यांचा संघटना पुनर्बांधणीचा टप्पा पूर्ण झाला असावा, असं आम्हाला वाटतंय."
"ही आयसिस आधीपेक्षा वेगळी आहे. थेट संघर्ष टाळण्यासाठी ते कोणत्याही भागाचा ताबा मिळवणं टाळत आहेत. त्याऐवजी ते इराकमधल्या हॅमरिन पर्वतरांगांमध्ये भूमिगत होऊन अल्-कायदाप्रमाणे कारवाया करत आहेत," असं तालाबानी सांगतात.
हेच आता आयसिसचं केंद्र बनल्याचंही तालाबानी यांनी म्हटलं. ते सांगतात, "हॅमरीनच्या पर्वतरांगा खूप दूरवर पसरल्या आहेत आणि इराकच्या लष्कराला इथं नियंत्रण ठेवण्यास कठीण जातं. तिथं लपण्यासाठी खूप जागा आहेत, शिवाय गुहा सुद्धा आहेत.
इराकची राजधानी बगदादमधील सध्याची अशांतता आयसिसच्या पथ्थ्यावर पडेल आणि अल्पसंख्यांक सुन्नी मुस्लिमांमधल्या परकेपणाच्या भावनेचा ते फायदा करुन घेतील. इराकमध्ये ही रक्तरंजित पद्धत नेहमीची बनलीये.
राजकीय अशांतता म्हणजे आयसिससाठी पर्वणीच असल्याचं तालाबानी यांचं म्हणणं आहे.
2017 मध्ये कुर्दीश स्वातंत्र्यासाठी घेण्यात आलेल्या सार्वमतानंतर बगदाद आणि कुर्दिस्तानातील सरकार यांच्यामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांचाही कट्टरतावाद्यांना फायदा होतोय.
कुर्दीश पेशमर्गा सिक्युरिटी फोर्स आणि त्यांच्या इराकी प्रतिस्पर्ध्यांमध्ये उत्तर इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर 'नो मॅन्स लँड' आहे. या भागात आयसिसकडून मात्र गस्त घातली जाते.
ग्वेर शहराच्या डोंगरावरील चौकीवर असणारे मेजर जनरल सिरवान बार्झानी या 'नो मॅन्स लँड'बद्दल काळजी व्यक्त करतात. त्यांनी म्हटलं, "या अनियंत्रित क्षेत्रावर आयसिसनं आता स्वतंत्रपणे नियंत्रण मिळवलं आहे."
"ग्रेटा झॅब आणि टायग्रिस नद्यांच्या मधल्या भागात ते आहेत. टायग्रिस नदीजवळ तर आयसिसच्या अनेक कारवाया सुरु आहेत. दिवसागणिक आयसिसच्या कारवाया आपण पाहू शकतो," असं ते सांगतात.
पेशमर्गा इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, आयसिसनं या भागात सिरियाची सीमा ओलांडून आलेल्या 100 सैनिकांना तैनात केलंय.
ऑगस्ट 2014 मध्ये ग्वेरच्या डोंगरावरूनच पेशमर्गांनी आयसिसविरोधात मोहीम उघडली. मेजर जनरल बार्झानींसह इतर सर्वच म्हणतात की, इतिहासाची आता पुनरावृत्ती होतीये.
"मी 2019 आणि 2012 ची तुलना करु शकतो. तेव्हा त्यांची सुरुवात झाली होती, ते संघटना बांधत होते आणि लोकांपासून कर वसूल करत होते. ही परिस्थिती अशीच राहिली, तर 2020 मध्ये ते अधिक संघटित होतील, अधिक ताकदवान होतील आणि अधिक हल्ले करतील," असं बार्झानी सांगतात.
कुर्दीश इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, इराकमध्ये आयसिसचे 10 हजार सैनिक आहेत. त्यात चार ते पाच हजार लढाऊ सैनिक आहेत. शिवाय, याच संख्येत स्लिपर सेल्स आणि सहानुभूतीदार आहेत.
"जगानं याची चिंता करायला हवी," असं लाहूर तालाबानी म्हणतात, "आयसिस इथं अधिक बिनधास्त आहेत. इराक आणि सीरियाच्या बाहेर कारवायांसाठीही ते विचार करतील."
इराकमध्ये तैनात असणाऱ्या अमेरिकन लष्करी कमांडरच्या मते, आयसिस स्वत:ची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यावेळी त्यांना इराकी आणि कुर्दीश सुरक्षादलांचा वेगवेगळा सामना करावा लागत आहे.
इराकच्या टास्क फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनरल विल्यम सिली यांच्या म्हणण्यानुसार, 2014 साली आयसिसनं इराकमधील बराचसा भाग आणि मोसुलवर नियंत्रण मिळवलं होतं. त्यापेक्षा ते आता अधिक सज्ज दिसत आहेत.
इराकी सिक्युरिटी फोर्स (आयएसएफ) आणि पेशमर्गा त्यावेळी एकत्र नव्हत्या, असं ब्रिगेडियर सिली यांनी सांगितलं.
ते म्हणतात, "आम्ही त्यांच्या प्रशिक्षणात सहभागी झालो. आयसिसविरोधातल्या कारवाईची गती कायम ठेवण्यासाठी आता आयएसएफ लक्ष देतेय."
ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत आयएसएफनं 170 ऑपरेशन्स केले आणि जवळपास स्फोटकांसाठीच्या उपकरणांचे 1700 घटक उद्ध्वस्त केले.
"आयसिसचे सैनिक आता गुहांमध्ये लपत आहेत. ते मोठ्या संख्येनं फिरुही शकत नाहीत. गेल्या सहा महिन्यात मी 15 जण फक्त पाहिले असतील. आयसिसचा एक सैनिकही आता खूप झालाय," असं ते सांगतात.
आयसिसचे सैनिक आता 'हिट अँड रन' हल्ल्यांसाठी रात्रीचे बाहेर पडतात. मात्र, इराकनं याआधीही आयसिसची सुरुवात पाहिलीये. त्यामुळं इथल्या अनेक जणांना या येऊ पाहणाऱ्या नव्या धोक्याची भीती आहे.