पंतप्रधान मोदींकडून देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- राहुल गांधी

मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (09:49 IST)
"देशाच्या शत्रूंनी या देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. देशातील शत्रूंना देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे अशक्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते काम करून दाखवले," अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
 
"भारतमातेच्या आवाजाला, विद्यार्थ्यांना, माध्यमांना, न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न कराल तर देश तुम्हाला याचे जबरदस्त उत्तर देईल," असंही त्यांनी म्हटलं. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
 
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात काँग्रेसनं राजघाटावर देशव्यापी आंदोलन आयोजित केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी तसंच पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.
 
"जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीमार, गोळीबार करता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुम्ही माध्यमांना धमकावता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज शांत करता. कोट्यवधी तरुणांचा रोजगार गेला आहे हाही आवाज बंद करण्याचा प्रकार आहे," असं राहुल यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती