रशिया-युक्रेन संघर्ष : रशियाच्या लष्कराला बंडखोरांच्या प्रदेशात प्रवेशाचा आदेश
मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (21:04 IST)
पूर्व युक्रेनमधल्या बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात प्रवेशाचे आदेश रशियाच्या लष्कराला देण्यात आले आहेत. रशियाने बंडखोरांनी व्यापलेल्या प्रदेशाला स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता दिली होती.
रशियाचं लष्कर युक्रेनच्या सीमेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं व्हीडिओ फुटेजमधून स्पष्ट झालं आहे.
बंडखोरांच्या प्रदेशातून मार्गक्रमण करत असताना रशियाचं लष्कर शांततेचं पालन करेल असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे.
शांतता पालनकर्ते म्हणणं हे बिनबुडाचं असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. युद्धसदृश परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप अमेरिकने रशियावर केला आहे. दरम्यान आम्ही कशालाही आणि कोणालाही घाबरत नसल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.
सोमवारी रात्री उशिरा राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष व्होल्डोमेर झेलेन्स्की यांनी मित्र देशांकडून ठोस पाठिंबा मिळेल अशी आशा व्यक्त केली. "कोणते देश आमचे खरे मित्र आहेत, कोणाची आम्हाला साथ आहे, कोण निव्वळ शाब्दिक पद्धतीने रशियाला रोखण्याची भाषा करत आहेत ते कळेल", असं झेलेन्स्की म्हणाले.
युकेसह अनेक देश रशियावर निर्बंध घालण्याची शक्यता आहे.
दरम्यान रशिया आणि युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं एक विशेष विमान रवाना झालं आहे. तर युक्रेनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठांच्या सूचनेसाठी थांबून न राहता देश सोडावा असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.
युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी देश सोडावा असं यापूर्वीही सांगण्यात आलं होतं.
आज पुन्हा एकदा कीव्हमधल्या भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना सूचना दिली आहे.
यामध्ये म्हटलंय, "वैद्यकीय विद्यापीठं ऑनलाईन क्लासेस घेणार का याविषयी विचारणा करणारे अनेक कॉल्स भारतीय दूतावासात येत आहेत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भारतीय विद्यार्थ्यांसाठीची शिक्षणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी दूतावास संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. विद्यापीठांकडून अधिकृत मान्यता मिळण्याची वाट बघत थांबण्याऐवजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करत युक्रेन तात्पुरता सोडवा. याविषयीचे अपडेट्स वेळोवेळी दिले जातील."
युक्रेन सोडण्याचा असाच सल्ला तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाने दिला होता. भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या फ्लाईट्सची माहितीही कीव्हमधल्या दूतावासाने ट्वीट केली आहे.
पण ही विमानं म्हणजे नागरिकांना परत आणण्यासाठी देशाने पाठवलेली Evacuation Flights म्हणजे सुटकेसाठीची विमानं नसून प्रवासी विमानं आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीयांना तिकीटं विकत घेऊन भारतात परतावं लागेल.
अनेक विमान कंपन्यांनी युक्रेनमधून सेवा बंद केलेली आहे. त्यामुळे एअर इंडियाची ही विशेष विमानं युक्रेनला जाणार आहेत.
एअर इंडियाच्या हवाल्याने ANI वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे की, युक्रेनमधून भारतात येणाऱे नागरिक एअर इंडियाच्या बुकिंग ऑफिस, वेबसाइट, कॉल सेंटर किंवा अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून बुकिंग करू शकतात.
एअर इंडियाचं पहिलं विमान आज (22 फेब्रुवारी) सकाळी युक्रेनला रवाना झालं. हे ड्रीम लायनर बी-787 विमान आहे. हे विशेष कामगिरीसाठीच वापरलं जातं. या विमानात 200 हून अधिक आसनं असतात.
सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने काय सांगितलं?
सगळ्याच बाजूंनी या प्रश्नावर संयत भूमिका घ्यावी असं भारताने युक्रेन संकटावरच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत म्हटलंय.